29 July, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ५४

सोमपोऽमृतपः सोमः पुरुजित्पुरुसत्तमः 
विनयो जयः सत्यसन्घो दाशार्हः सात्वतांपतिः  ।।
(५०) सोमपः :  - यज्ञामध्ये यज्ञकर्त्याचे आवाहनास प्रतिसाद देऊन इष्ट देवता रूपाने प्रकट होऊन जो सोमपान करतो तो सोमप श्रीविष्णु. सर्व यज्ञामधील, सर्व हवि स्विकारणारा श्रीनारायण सर्व देवतांचे वतीने, प्रतिनिधीरूपाने आमंत्रित केला जातो म्हणून तो सोमप होय.
(५०) अमृतपः :  - जो अमृताचे पान करतो तो. तो परमसत्य स्वरूप असल्याने नित्य अमरत्वाचा आनंद उपभोगतो. यासंज्ञेला दुसराही पौराणिक अर्थ आहे व तो असा की ' क्षीर सागराचे मंथन केल्यानंतर अमृताची प्राप्ती झाली तेव्हा ते अमृत असूरांनी पळवून नेले. त्यावेळी नारायणाने स्वतः अपूर्व सौंदर्यवती मनोहारिणी मोहिनीच्या रूपानें त्यांच्याकडून ते परत मिळविले आणि सर्व देवांना दान केले व देवांचे बरोबर स्वतःही अमृतपान केले म्हणून तो अमृतपः श्रीविष्णु.
(५०) सोमः :  - जो 'चन्द्र' ह्या स्वरूपांत आपल्या प्रकाशानें वनस्पती सृष्टितील औषधींच्या रसगुणांचे संवर्धन करतो तो सोम श्रीविष्णु होय. हिंदु धर्मग्रंथात अनेक ठिकाणी उल्लेखिलेल्या प्रमाणे चंद्र आपल्या प्रकाशाने सर्व वनस्पती, फळ फूल,धान्यांमधील अन्नगुणांचे संवर्धन करतो. भगवत् गीतेतही भगवंत सांगतात, 'मी चंद्र प्रकाश स्वरूपानें सर्व वनस्पतींचे पोषण करतो.'[1]  ह्या संज्ञेचा दुसरा अर्थ होतो भगवान् शिव - जो उमेसहित असतो तो सोम - श्री शंकर.
(५०) पुरुजित् :  - ज्याने अनेक शत्रूंना जिंकले आहे असा. इथे 'पुरु' शद्बाचा अर्थ अनेक असा होतो.
(५०) पुरुसत्तमः :  - सर्व श्रेष्ठांमध्येही श्रेष्ठ असा. याठिकाणी 'पुरु' शद्बाचा अर्थ होतो श्रेष्ठ व सत्तम म्हणजे उत्तम. कांही ठिकाणी पुरुसत्तम या शब्दाऐवजी 'पुरुषोत्तम' असाही पाठभेद आढळतो. त्या संज्ञेचा अर्थ होईल नित्य ’पुरूष’ - नित्य असणारा; - उत्तम - परमसत्य.
(५०) विनयः :  - सरळ अर्थ होतो जो अत्यंत नम्र आहे असा. परंतु दुसरा अर्थ होइल जो अधर्मी दुष्टांना नमवितो असा व तिसरा अर्थ होईल जो साधकांना निरंतर योग्य तर्‍हेने सत्याच्या व धर्माच्या मार्गाने नेतो (वि-नय) तो श्रीविष्णु.
(५०) जयः :  - जो नित्य विजयी असतो असा. ज्याने सर्व जडावर विजय मिळवला आहे असा. ह्याचाच अर्थ असा होतो की आपल्याला आत्मदर्शन करून घ्यावयाचे असेल तर आपणही स्थूल प्रकृती व तिच्या सर्व घटकांचेवर विजय मिळवला पाहिजे. [2]ज्याने ब्रह्मज्ञान प्राप्त केले तो स्वतः ब्रह्मस्वरूपच होतो व त्यावेळी त्याने सर्व जिंकलेले असते.
(५०) सत्यसन्धः :  - ज्याचे संकल्प सत्य स्वरूप असतात तो. तो परमात्मा आपल्या समग्रतेने परिपूर्ण असल्याने त्याचे संकल्प, विचार, भावना, शब्द व विकृती नेहमी सत्यच असतात. त्यामध्ये कधीही तडजोड नसते त्यामुळे ते संकल्प निश्चितपणे फलद्रूप होतात. पुराणे सांगतात, 'स्वर्ग खाली गडगडेल, पृथ्वी कोसळेल, हिमालयाचे चूर्ण होईल किवा समुद्र आटून जातील परंतु माझे शद्ब कधीच फोल ठरणार नाहीत.'
(५१) दाशार्हः :  - दशार्ह कुळात जन्म घेतल्याने तो श्रीकृष्णाचे नाव दाशार्ह आहे. या संज्ञेचा दुसरा अर्थ होईल यज्ञामध्ये साधकांनी त्याग भावनेनें दिलेले दान स्विकारण्यास अत्यंत योग्य तो श्रीविष्णु दाशार्ह आहे.
(५१) सात्वतांपतिः :  - सात्वतांचा स्वामी. 'सात्वत' नावाच्या तंत्राचे अनुसरण करणार्‍या लोकांचा स्वामी सात्वत नावाच्या तंत्रमार्गाच्या ग्रंथांचे अनुसरण करणारे लोक साधारणतः सात्विकच असतात म्हणून त्यांना ’सात्वत’ म्हणतात व त्यांचा स्वामी श्री विष्णू आहे. सात्वत पंथाची अत्यावश्यक साधना म्हणजे भक्तिपूर्ण अंतःकरणाने व अत्यंत एकाग्रतेने भगवान् विष्णूच्या स्वरूपाचे ध्यान करणे.
 डॉ. सौ. उषा गुणे.



[1]    पुष्णामिश्चोषधी सर्वाः सोमोभूत्वा रसात्मकः
[2] ब्रह्मवित् ब्रह्मैव भवति ।

No comments: