15 September, 2009

विष्णुसहस्रनाम : श्लोक ३


विष्णुसहस्रनाम : श्लोक ३
योगो योगविंदा नेता प्रधान पुरूषेश्वरः ।

नारसिंहवपुः श्रीमान केशवः पुरूषोत्तमः ।।

(१८) योगः : - ज्याचे ज्ञान अगर अनुभुती योग मार्गाने होवू शकते तो श्रीविष्णु. आपापल्या व्यापारक्षेत्रातून इंद्रिये आवरून घेवून योगसाधक जेंव्हा आपले मन स्थिर करतो तेंव्हा त्याची जाणीव एका उच्च पातळीवर उचलली जाते व त्याला सत्याची प्रचीती येते म्हणजेच योग साध्य होतो. प्रशांत मन व बुद्धिची साम्यावस्था झाली असतां योगस्थिती प्राप्त होते. समत्वं योग उच्युते (गीता २-४८). योगामधून त्याचे ज्ञान होते म्हणून त्यालाच योग असे म्हटले आहे.


(१९) योगविंदा नेता : - योग जाणणार्‍या सर्व व्यक्तिंना (योगविंत) त्यांच्या सर्व कर्मामध्ये जो मार्गदर्शन करतो तो. सिद्धावस्थेस प्राप्त झालेल्या सर्व मनुष्यांचे एकच ध्येय असते व ते म्हणजे पूर्णब्रह्म परमात्मा.


आपल्यासारख्या सामान्य माणसांची सर्व कर्मे अहंकार व स्वार्थ प्रेरित असतात तर साक्षात्कारी व्यक्तिंच्या हृदयातील परमेश्वरच त्यांच्या सर्व कृतींना प्रेरणा देत असतो. ह्या अनुभवस्तरालाच ' महाविष्णु ' असे म्हटले आहे. ही ? कल्पना गीतेमध्येहि अत्यंत भावपूर्ण शब्दाने विशद केली आहे. (अनन्याश्चिंतयंतो मां ये जनाः पर्युपासते । तेषांनित्याभियुक्तांनां योगक्षेमं वहाम्यहम् ।। गीता - ९-२२) भगवान् म्हणतात. '' जे अनन्यभावाने सतत माझेच चिंतन करतात त्याच्या सर्व व्यवहारिक दैनंदिन गरजा व पारमार्थिक साधना दोनीही मी पूर्ण करतो'.


(२०) प्रधानपुरूषेश्वरः : - जो प्रधान व पुरूष या दोन्हींचा स्वामी आहे तो श्रीविष्णु. प्रधान या शब्दाचा अर्थ आहे 'माया' जी या संपूर्ण विश्वाचे कारण आहे. पुरूष शब्दाने आपल्यातील आत्म्याचा निर्देश केला आहे. तोच जीव होय. व ईश्वर म्हणजे स्वामी (ईशते इति ईश्वरः ) तो माया व पुरूष या दोन्हींचा स्वामी आहे. त्यांच्याचमुळे माया व जीव यांना अस्तित्व आहे व ते कार्यरत आहेत. माया,जीव व त्यांचा स्वामी ह्या तिन्हीतूनहि जे परमतत्व व्यक्त होते ते म्हणजेच श्रीविष्णु.


(२१) नारसिंह वपुः : - ज्याची आकृती अर्धमानव व अर्धसिंह अशास्वरूपाची आहे तो. श्रीविष्णुने आपल्या चवथ्या अवतारामध्ये अशी आकृती धारण केली. नास्तिक व उन्मत्त झालेल्या हिरण्यकश्यपुचा नाश करून भक्त प्रल्हादावर त्याने कृपा केली.


(२२) श्रीमान् : - जो नित्य श्रीसहित आहे तो. श्री म्हणजेच माता लक्ष्मी. पुराणवचनांप्रमाणे मातालक्ष्मी ही सर्वगुण व सर्वशक्तींचे प्रतिक आहे. सर्वशक्तिमान् परमेश्वरामधील व्यक्त दशेस येणारी शक्ति म्हणजेच श्रीलक्ष्मी. ही शक्ति त्याचे जवळ सतत असते म्हणून त्याला श्रीमान् असे संबोधिले आहे.


(२३) केशवः : - ज्याचे केश सौदर्ययुक्त व प्रशंसनीय (व) आहेत तो आपणास परीचित असलेला श्रीकृष्ण म्हणजेच ? श्रीविष्णु होय. (प्रशस्ताः केशाः सन्त्यस्येति केशवः । ) या संज्ञेचा दूसरा अर्थ होतो.- कंसाने पाठवलेल्या 'केशी ' राक्षसाचा वध करणारा तो 'बालकृष्ण', अशा तर्‍हेचे विवेचन विष्णुपुराणांत आले आहे. (यस्मात् त्वयैव दुष्टात्मा हृतः केशी जनार्दन । तस्मात् 'केशव'नाम्ना त्वं लोके ज्ञेयो भविष्यसि ।। विष्णु.पु. ५-१६-२३ )


(२४) पुरूषोत्तमः : - जीव कल्पनेचे आपण जेंव्हा विवरण करू लागतो तेंव्हा आपल्याला दिसते किं नाशवंत प्रकृती व अविनाशी आत्मा ह्या दोहोंनी मिळून जे व्यक्तित्व विकसीत होते त्यालाच 'जीव ' असे म्हटले जाते. पाण्याच्या पृष्ठभागावर नर्तन करतांना दिसणारी चंद्राची आकृती म्हणजे आकाशातील चंद्राचे प्रतिबिंब असते. ज्याप्रमाणे चंद्र हा पाण्याचा पृष्ठभाग व प्रतिबिंब या पासून पूर्णतः वेगळा आहे त्याचप्रमाणे परमात्मा हा शुद्धावस्थेत नाशवंत प्रकृती व अविनाशी आत्मा (जीवात्मा) ह्या दोन्हीपासून भिन्न असतो. पण तो प्रकृतीमधून व्यक्त होत असतो. म्हणूनच ते परात्पर सत्य 'पुरुषोत्तम' या नांवाने संबोधिले जाते.


डॉ. सौ. उषा गुणे.

No comments: