20 September, 2009

बद्ध - मुक्त लक्षणे - (५) (भागवत स्कंध ११ अध्याय ११)

बद्ध - मुक्त लक्षणे - (५)
(भागवत स्कंध ११ अध्याय ११)


५. अनवद्य - मन निर्दोष, निष्कपट, निश्छल असणे अर्थात् मनाची सरलता. असणे आणि ठेवणे यात बराच फरक आहे. बर्‍याच तपस्येनंतर असे ’असणे’ साध्य होऊ शकते. "मनःप्रसादः सौमत्वं. स्थैर्यं आत्मविनिग्रहः । भावसंशुद्धि इत्येतत् तपो मानसं उच्यते ॥" मन प्रसन्न ठेवणे, सौम्यता, मुनिप्रमाणे वृत्ति असणे, मनोनिग्रह आणि शुद्ध भावना यांस मानस तप म्हणतात.

६. समभाव - सर्वत्र समबुद्धि व सर्वांवर समान भावनेने उपकर करणारा. सामान्य दृष्टीस सर्वत्र कळ्या लावत फिरणारे नारदमुनि असुरांनाही अंतिमतः त्यांचे कल्याण साधण्याच्या हेतुनेच ’कळी’ लावण्याचा उपक्रम करताना आढळतात. साधूच्या ठिकाणी विषमता नाही. समुद्रात मिठाचा खडा टाकला की विरघळून जावा त्याप्रमाणे साधूच्या अंतःकरणात विषमता पूर्णपणे नष्ट झालेली असते.

७. परोपकार - वृक्ष त्याचे संगोपन करणार्‍यावर वा घाव घालून तोडणार्‍यावर सारखीच छाया व फळे देतो. चंद्र विश्वाचा ताप करताना ’माझे चांदणे फक्त चकोरांसाठीच आहे’ असे म्हणत नाही. तसेंच साधूही काया-वाचा-मनेंकरून उपकारा करितांच असतात. दुष्ट लोक त्यांचा छळ करतात आणि भक्त सत्संगाचा लाभ घेतात पण साधु दोघांवर उपकारच करीत असतो.

८. अकामता - ’निजानंदे तृप्त’ असल्यामुळे प्राप्तव्य असे काहीच नाही. मनात कसलीच कामना नसल्यामुळे बुद्धि कधी विषयात रमत नाही. अगदी ऊर्वशी शय्येवर आली तरी कामविकार क्षुब्ध होत नाही.

९. इंद्रियदमन - साधु संत मनाचे नियमन करून इंद्रियांवर विजय मिळवितात.अशा प्रकारे इंद्रियदमन म्हणजे वास्तविक मनोजय. मनोवृत्तीचे जे नियमन तेच बाह्येंद्रियांचे नियमन. इंद्रिये आपले विषयच विसरून गेलेली असतात. अशा स्थितीत जे कर्म घडते ते निःसंशय निष्काम असेच असते.

१०. मृदु - गोड स्वभावाचा, पवित्र आणि चुकूनही कधी कठोर भाषण न करणे. कठोर भाषण करताना आढळले तरी ती कठोरता गळ्याच्या वरच दिसून येते. पोटातून वा हृदयातून नव्हे. (कारण कठोरतेचा केवळ आभासच निर्माण केलेला असतो). गंगेच पाणी कधी अवखळ भासले तरी गाय व वाघ दोघांची तृषा शमन करणारे. तसेच साधूचे हृदय मृदु, म्हणजे कोमल असते.

११. शुचि - काय-वाचा-मने सदा निर्मळ. ही निर्मलता भगवद्‌भक्तिमुळे प्राप्त होते. कुंभाराने चाकावरून मडके उतरविल्यावरही चाक जसे फिरत राहते तसे व्रत, तप, ज्ञानादि पूर्व संस्कारामुळे साधु वृत्तिशून्य राहात असतो. म्हणून त्यचे सर्व कर्मे देखील शुद्ध व पवित्र असतात.

१२. अकिंचन (अपरिग्रह) - देहाची वा घरादाराची सुद्धा संगति न धरणे हीच ’अकिंचनता’. कोठेही गुंतलेलाच नव्हे. राजा जनक राज्य करीत असतांही अकिंचन होता म्हणून तर शुक नारदही त्याला मान देत असत. ’उद्या’ चा विचार (चिंता) मनी नसल्यामुळे स्वाभाविकतः संग्रहाची आवश्यकता वाटत नाही असा परिग्रहासंबंधी उदास.

१३. अनिहा - ईहा म्हणजे इच्छा. ही कामाची स्त्री. आणि अहं व मम (ममता) या तिच्या बहिणी. या तीन कुठे नाहीत असे स्थान दुर्मिळच (अर्थात् संसारात). अनीहेला (म्हणजे ईहेच्या वैरिणीला) सर्वच झिडकारून हाकलून लावतात. मग संतांशिवाय तिला आधारच नाही. संतांनी तिला (अनीहेला) स्वहितासाठी थारा दिल्यामुळे त्यांच्या चित्तातून काम, अहं व ममत्व यांना मरण आले. अनीहा, निरीच्छता यामुळे काम्यकर्म नाही. म्हणून कर्ता नाही, मग कर्मफळ कुठले ? शांतिच शांति.

१४. मित्‌भूक - साधु जिव्हेच्या इच्छेला बांधलेला नसतो. अन्नाची इच्छा प्राण करतो. साधुने तर मनोजयाबरोबर प्राणजयही केलेला असतो. रसना, क्षुधा त्याला कधी पीडित करीत नाहीत. अन्नाला भोग्य पदार्थ मानीत नसल्यामुळे कधी ’हादडणे’ हा प्रकार घडत नाही. आहार हा केवळ आहारासाठीच. रोग्यासाठी जसे पथ्य, तसा. अगदी जरूरीपुरताच.

१५. स्थिरबुद्धिः - कुठे स्थीर ? तर महाविष्णु, श्रीहरि, परमात्म्याचे ठिकाणी. साधु व्यवहारकरिता मात्र शरीरधारी. पण निजांतरी स्वस्वरूप झालेला म्हणून स्थिर.

१६. शांत - कोणत्याही अवस्थेत मोह, ममता दाटत नाही, वर्तमान वा भूतकाळातील कोणतीही आठवण चित्तात चलबचलता निर्माण करीत नाही, असे झाले तर, तसे झाले तर अशा भविष्यकाळातील चिंता उद्‌भवत नाहीत, तो शांत.

१७. मत् शरणं - साधु परमेश्वराला अनन्य शरण झालेला असतो तेव्हां त्याच्या मनी एका परमेश्वराशिवाय त्याचे वेगळे असे अस्तित्वच नसते. नदी आपल्या मूळ स्थानापासून वेगळी असते तोवरच तिचे वेगळेपण, तिची चंचलता, तिचे अवखळणे. एकदा का ती समुद्रास शरण झाली सागराप्रमाणे की अगाध झाली, विशाल झाली. तीच आता समुद्र झाली. Total surrender चा प्रभाव.

१८. मुनि - सदा भगवद्‌गुणांचे मननात रमणारा तो मुनि.वेदशास्त्राचे निरूपण, गुरुवाक्याचे निरूपण, अद्वैताचे श्रवण - हे सर्व करीत असता विवेकाच्या युक्तिने मनाशी ’मनन’ करणार तो मुनि. मनन करता करता मन आत्मरूप होते आणि परमात्म्याचे ठिकाणे स्थिर, अचल बनते.

१९. अप्रमत्तो - प्रमाद हा तामस गुणाच्या अंशामुळे घडतो. साधुचे ठिकाणी सत्त्वगुणांची अधिकता असल्यामुळे आळस व प्रमाद यांचा पूर्णतः अभाव असतो. जो पर्यंत मन वृत्तिशून्य होत नाही तो पर्यंत भले भले ज्ञानीजन देखील प्रमादाच्या भोंवर्‍यात सापडतात. ज्ञानी दुर्वासाचे मनांत क्षणोक्षंई क्षोभ उत्पन्न होतो. नारदाकडून किंचित् प्रमाद घडला तर तो क्षणात ’नारदी’ झाला. जोवर वृत्तीचे दमन होत नाही तोव मन काय काय प्रमाद करायला लावेल हे सांगणे अवघडच. वृत्ति सत्त्वगुणाच्या आश्रयाने देखील मनाला क्षुब्ध करून ’मी मुक्त’ असा अभिमान निर्माण करते. मग यावर उपाय काय ? ’अखंड सावधानता’ कोठपर्यंत ? हाती धरलेल्या सर्पाचे तोंड कुठवर आवळून धरावे लागते ? तो मरेपर्यंत. हात जरा ढिला पडला तर सर्वनाशच. तद्‌वत मनाचे संपूर्णतया निर्दाळण होईपर्यंत आत्मज्ञानाने सदा सावधान असणे नितांत गरजेचे. मन-वृत्ति एकदा वश झाली की काम झाले. चित्तवृत्ति निरोधः. योग्याभ्यासाची ही पहिली पायरीच इतकी महत्त्वाची असताना बरेच ठिकाणी भक्तिचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी योगमार्ग, कर्ममार्ग या संबंधी कुत्सित वक्तव्ये आढळतात या चे कारण समजत नाही.

२०. गभिरात्मा - विषयांचा मनाशी संपर्कच नाही. समुद्र उन्हाळ्याने आटत नाही की पर्जन्याने फुगत नाही. तसा साधु धनप्राप्ति, कीर्ति, मान याने कधी उल्हसित होत नाही की निर्धन झाला, अवमान झाला तरी दीन होत नाही. विकार कितीही उभाळले तरी त्यामध्ये अढळ असणे म्हणजेच गंभीर असणे.

२१. धृतिमान् - वृत्ति इकडे तिकडे भरकटवूं न देता ती निश्चयाने आत्मज्ञानाकडे लावणे यासाठी प्रचंड धैर्याची आवश्यकता असते. विशेषतः आपत् काळी याची अत्यंत आवश्यकता असतेच. मन, बुद्धि, इंद्रिये, प्राण हे सर्व आपापली कर्मे करीत असतांना त्या सर्वांना धैर्याने आवरून धरणे, त्यामुळे प्राप्त होणारी सुख दुःखे यांना शरीराकडे येऊं न देणे, या प्रमाणे जो मन आणि शरीर यांना कधी संलग्न होऊं देत नाही तो धृतिमान.

२२. जितषडगुणः - भूक तहान (आधिभौतिक), जरा मृत्यु (आधिदैविक) व शोक मोह (अध्यात्मिक) या सहाही विकारांवर मात केलेला. साधूला हे विकार कधी उद्‌भवत नाहीत असे नव्हे. पण त्यामुळे कधी क्षोभ उत्पन्न होत नाही, त्यापासून तो कधी त्रासून जात नाही. मनाची प्रसन्नता अबाधित राहते.

२३. अमानी - मानाची इच्छा अपेक्षा तर नाहीच. पण जरी कोणी केला तरी तो मनाला शिवत नाही. आज मान करणारा उद्या अवमानही करू शकतो - मग मान मिळाल्यास हुरळून जाण्यात कोणते स्वारस्य ?

२४. मानदः - पण इतरांचा मात्र मान करतो. सर्वांविषयी सदा आदर भावच असतो. जैसें उंचीं उदक पडिलें । ते तळवटवरी ये उगेलें । तैसें नमिजे भूतजात देखिलें । ऐसा स्वभावोचि तयांचा ॥ २२४ ॥ कां फळलिया तरूची शाखा । सहजें भूमीसी उतरे देखा । तैसें जीवमात्रां अशेखां । खालावती ते ॥ २२५ ॥ अखंड अगर्वता होऊनि असती । तयांची विनय हेचि संपत्ती ।

२५. कल्पौ - ज्ञान विवरणात निष्णात असणे. शिष्याला प्रबोधन करताना कसलाही आडपडदा नाही, कसली अपेक्षा नाही. "शब्दज्ञानें पारंगत । जो ब्रह्मानंदें सदा डुल्लत । शिष्यप्रबोधनीं समर्थ । तो मूर्तिमंत स्वरूप माझें ॥११.१०२८॥ "

२६. मैत्रः - सर्वांचा सुहृद, सर्वांचा जिवलग - सख्यभाव असा की किती पुराणा मित्र असावा. परम मैत्री अशी की जशी दुधाची पाण्याशी.

२७. कारुणिकः - सर्वांविषयी करुणभाव धारण केलेला. हा गुण सर्वप्रथम, म्हणजे (१) मध्ये आलेलाच आहे.

२८. कविः - वेदशास्त्रांचा मथितार्थ ज्याला हाती असलेल्या आवळ्याप्रमाणे, निस्संग्दिग्ध, स्पष्ट कळतो तो कवि. काव्य करणारा कवि नव्हे. इथे अभिप्रेत असलेला कवि म्हणजे द्रष्टा.

क्रमशः
एकोहम्

No comments: