18 June, 2008

आचार्य आणि संत

आचार्य आणि संत

संतांनी समाजाला धर्म, तत्त्वज्ञान आणि परमार्थ शिकविण्यासाठी वर्णप्राधान्य, आश्रमप्राधान्य इतकंच नाही तर वेषप्राधान्य ह्याला गौणत्व दिले. त्याचे पूर्ण खंडनही केले नाही, तसाच त्याचा आग्रहही धरला नाही. वेदमार्गाला कुठेही यत्‍किंचित बाध येऊं न देता, त्यांनी समाज आणि परमार्थाचे प्रबोधन करणारे आचार्यपद यांतील अंतर कमी केले.
आचार्यांनी समाज प्रबोधन केले, पण आपल्या स्थानावरून, आसनावरून. त्यामुळे काय होत होते ? काय झाले ? तर समाजातील व त्यांच्यातील अंतर यात एक कायमची दरी - दुरावा राहिला. याच्या नेमके उलट संतांनी खूप खाली उतरून, जन सामान्यात मिसळून - "तुम्ही आम्ही खेळीमेळी । गदारोळी आनंदे ॥" असे वागून समाजाला वर उचलले, व यामुळे समाजातील व संतांमधील अंतर कमी झाले.
ऋषी, मुनी, आचार्य ह्यांच्यात व समाजात अंतर वाटते. आजही "श्रीशंकराचार्य" म्हटले की आपल्यात व त्यांच्यात एक अंतर वाटते. आचार्य परंपरेत, त्या त्या काळात, काळानुसार ते अंतर गरजेचे - योग्य होते. पण संतपरंपरेतील संत आपल्याला अगदी जवळचे वाटतात. उदाहरण द्यावयाचे तर ऋषी, मुनी आचार्य लेकराला पित्यासारखे तर संतमहात्मे माय-माऊली सारखे वाटतात. शंकराचार्य माऊली असं कुणी भजन करत नाही, पण "श्रीगुरुज्ञानेश्वरमाऊली" म्हणून हांक मारतांना, भजन करतांना एक मायेची, प्रेमाची अत्यंत जवळीक भावते.
पूर्वी ऋषी, मुनी, आचार्य यांच्या अधिकाराच्या कक्षा असायच्या. कुणीही आपल्याला एकदम ऋषी, मुनी अगर आचार्य म्हणवू शकत नव्हते. शंकराच्यार्यांच्या पीठावरील व्यक्ती संन्याशीच असावी लागते असे काटेकोर बंधन. आणि ह्या बंधनामुळे, कक्षेमुळे काय झाले ? तर "ह्या दृष्टीने आपण अनधिकारी आहोत" असा न्यूनगंड समाजात निर्माण होऊन समाज परमार्थापासून, साधनमार्गापासून, आत्मज्ञानापासून वंचित व दूर राहिला. ही जाणीव नेमकी संतांना आली. आणि म्हणूनच संतांनी सर्व देशात, सर्व कालात, सर्व समाजात, वर्णात, आश्रमात, जाती जमातीत, धर्म पंथात, स्त्री पुरुष अशा सगळ्याच्या सगळ्या स्तरांत अवतार घेतले.
यामुळे काय झाले ? संतांनी सामान्य, तळागाळातल्या समाजाशी इतकी कांही जवळीक केली, तीपण केवळ समाजाच्या कल्याणासाठीच, की सामाज मानसांत संतांबद्दल एक वेगळीच अंतरीची, जिव्हाळ्याची आपलेपणाची ओढ निर्माण झाली. समाजानी त्यांना ऋषी, मुनी, आचार्य इतकेच काय पण देवापेक्षाही 'आपल्या गळ्यातले ताईत बनवले'.
जरा संतचरित्रे वाचली तर अगदी सहज असं लक्षात येईल कीं, कोणत्याही अनुकूल प्रतिकूल बाह्य परीस्थितीत ते संत झाले. अशी एक परीस्थिती माणसाला बोट करून दाखविताच येणार नाही की 'काय करावे, माझी परीस्थिती "तशी" नसल्याने मला संत होता येत नाही'.
अत्यंत श्रीमंत सत्ताधीश, एका किल्ल्याचे किल्लेदार अशा, जनार्दन स्वामींसारखे राहून संत होता येतं. नाथांचे गृहवैभव संतत्त्वाच्या आड येत नाही. "तुम्हा घरी गायी म्हशी । आम्हा घरी उंदीर घुशी ॥" अशी आपल्या श्रीतुकोबारायांची गरीबी, तरी ते संत झाले. त्यांनी असं नामस्मरण व भजन केलं की त्यांचे 'सदेह' वैकुंठगमन झाले. संतत्त्वासाठी वय, वर्ण, लिंग, आश्रम कांही आड येत नाही, आलं नाही, आणि येणार पण नाही.
अशा प्रकारे सर्व देश, काल, परीस्थिती, वय आणि स्तर यात परमार्थ करता येतो, संत होता येते हे संतांनी आपल्या जीवनांत प्रत्यक्ष आचरून दाखविले. आम्ही मात्र (खोटी) कारणं सांगत बसतो. संतांनी आपल्याला आहे त्या परीस्थितीतून परमार्थ करून भगवंताकडे जायला शिकविले. त्यामुळे समाजाला संत जन्मदात्या मातेपेक्षाही जवळचे वाटतात.

अण्णा -

No comments: