26 June, 2008

"मी" कोण ?

"मी" कोण ?

आपल्या सर्वांच्या ठिकाणी "मी" म्हणून जे स्फुरण होते, त्यालाच शास्त्रकार जीव असे म्हणतात. या जीवाला "मी म्हणजे कोण" हे यथार्थ समजत नाही. "मी" म्हणजे देहस्वरूप, कर्मकर्ता, सुख-दुःखवादी फलभोक्ता, अज्ञानी, अपूर्ण, शब्दादी (विषय) भोगावर ज्याचे सुख अवलंबून आहे असा, जन्म-मरण भोगणारा, असे आपल्याला समजत असतो. त्याचे हे सर्वच ज्ञान विपरीत असून स्व-स्वरूपाचा यथार्थ विचार न केल्यामुळे आहे. आपल्याला आपल्या स्व-स्वरूपाचा यथार्थ योग्य विचार नसणे यालाच अज्ञान असे म्हणतात.
पण श्रुती-संतांनी दाखविलेल्या सन्मार्गांनी विचार केला तर जीवाचे हे स्वरुपाचे अज्ञान नाहीसे होऊन त्याला, आपल्या स्व-स्वरूपाचे यथार्थ ज्ञान होते.
विषय, देह, इंद्रिये, प्राण, मन, बुद्धी, अहंकार या सर्वांचा देहात समावेश आहे. मी म्हटल्याबरोबर विचार न करता, मनुष्य आपल्या देहाकडे बोट दाखवून जरी "मी" असे म्हणत असला तरी तो आपल्याला अनेकानेक प्रसंगी देहाहून निराळा समजतो असे दिसून येते.
"माझा देह" असा जेव्हा तो आपल्या देहाचा उल्लेख करतो, तेव्हां तो आपल्याला देहाहून अगदी निराळा समजत असतो. तो 'मी डोळा' असे म्हणत नाही, तर माझा डोळा, माझे मन, माझी बुद्धी असेच म्हणत असतो. कारण 'माझा' ही षष्ठी विभक्ति आपल्याहून सर्वथैव भिन्न असलेल्या पदार्थाचा आपल्याशी काही संबंध दाखवायचा असल्यासच उपयोगात आणली जाते.
जागेपणी ज्या देहाचा आपण "मी" म्हणून निर्देश करतो, तो देह ज्यावेळी अंथरुणावर पडलेला असतो तेव्हा आपण त्या देहावर मीपणा ठेवीत नाही. सुषुप्तीत तर देहाला आपण विसरतोच. म्हणूनच "मी म्हणजे देह" असे समजणे हे काही स्व-स्वरूपाचे यथार्थ ज्ञान नव्हे, तर ते अगदी विपरीत ज्ञान [म्हणजे अज्ञान] आहे.
देहाच्या बाहेरील गोष्टीशी व्यवहारीक संबंध आला असता, मनुष्य देहावर मीपणा ठेवून व्यवहार करतो. बाहेरील गोष्टींशी व्यवहार बंद पडला की मग देहावरचा मीपणा आत असलेल्या इंद्रियांवर येऊन थडकतो. तरी तो मीपणा देहावरचा नसतो (यथार्थतः), कारण या सर्व पदार्थांचा "माझे" म्हणून आपण निर्देश करत असतो. "मी" म्हणून त्यांचा निर्देश करूच शकत नाही. जसे मी डोळा, मी कान, मी मन, मी बुद्धी असे आपण म्हणत नाही याचे कारण हेच की "मी" म्हणणारा जीव या सर्वांहून अगदी निराळाच आहे.
या प्रमाणे जीव हा या सर्व गोष्टींपासून अगदी निराळा आहे. जीव हा स्वसंवेद्य असून अन्याला जाणत असतो. पणे दुसरे पदार्थ आपल्या स्वतःला जाणत तर नाहीतच पण दुसर्‍यालाही जाणू शकत नाहीत. जसे घोडा "मी घोडा" आहे असे जाणत नाही व अन्यालाही जाणत नाही. पण जीव जाणतो. म्हणून जीव ज्ञानस्वरूप आहे. ज्ञानाला उत्पत्ती नाश असू शकत नाहीत. कारण उत्पत्ती-नाश जाणण्याकरितां ज्ञान पाहिजेच ना ? "मला काही कळत नाही ?" हे कळण्यासही ज्ञानच लागते.
म्हणजेच ज्ञानरूप जीव उत्पत्ती-नाश रहित असा अविनाशीच आहे. अशा जीवाला अत्यंत दुःखरहित व अविनाशी सुखाची इच्छा असते. असे सुखच जर नसते तर ही सुखाची इच्छाच दुरापास्त. असे अविनाशी अखंड सुख जीवाहून जर वेगळे असते तर ते सुख अविनाशी म्हणताच येणार नाही. सुखाला अखंड तेव्हांच म्हणता येईल की जेव्हां ते नव्हते किंवा प्राप्त नव्हते असा अनुभव येणार नाही. असा अखंड सुखाचा अनुभव घेता येतो; कां तर जीव मुळातच सुखस्वरूप आहे.
सृष्टीतील एक नियम आहे - 'कोणतीही वस्तू आपल्या स्वरूपभूत धर्मांचा त्याग करू इच्छित नाही, किंवा तिला त्या धर्माचा कधी कंटाळा येत नाही'. जीवाला ज्या आनंदाची अपेक्षा आहे तो जीव मुळातच असा सत्-चित्-आनंद स्वरूप आहे. ह्या आपल्या सच्चिदानंद स्वरूपाची अनुभूती श्रीगुरुकृपेने नामस्मरणाच्या द्वारा येते.

अण्णा -

No comments: