30 June, 2008

मानसमणिमाला (१०)

मानसमणिमाला (१०)

हिंदी : बहुरि बन्दि खल गन सति भाएँ ।
जे बिनु काज दाहिनेहु बाएँ ॥ १ ॥
परहित हानि लाभ जिन्ह केरे ।
उजरें हरष बिषाद बसेरें ॥ बालकाण्ड ३.२ ॥
मराठी : अथ वन्दे सद्‌भावे खलगण ।
दक्षिणास जे वाम अकारण ॥ १ ॥
परहित-हानि लाभ त्यां वाटत ।
हर्ष विनाशिं विषादहिं नांदत ॥ प्रज्ञानानंद
अर्थ : आतां खलगणांसही शुद्ध भावनेने मी वंदन करीत आहे. अगदी निष्कारण ते आपल्या हितकर्त्याशींही विरोध करतात. दुसर्‍यांचे हित झाले तर त्यांना स्वतःची हानी झाल्यासारखे वाटते आणि दुसर्‍याची हानी हाच त्यांना लाभ वाटतो. दुसर्‍याचा विध्वंस झाला तर त्यांना हर्ष होतो आणि इतर सुखाने नांदू लागले तर त्यांना दुःख होते.

जगमध्ये जसे सज्जन आहेत तसे दुर्जनही आहेत. दैवी गुण संपत्तीनें सुशोभित असे संतसज्जन नेहमीच जगाचे हित-मंगल चिंतत असतात व ते घडवून आणण्याकरितां सातत्याने प्रयत्‍न करतात. आपल्या सरळ, निष्कपट भावाने जगाच्या आनंदात स्वतः आनंदित होतात. याच्याबरोबर उलट मनोवृत्ती दुर्जनांच्या ठिकाणी असते. एकतर ते अगदी निष्कारण कोणाशीही वैरभाव, शत्रुत्व धारण करतात. इतकेच नव्हे तर जे त्यांचे हितकर्ते आहेत, त्यांच्याशीही ते कृतघ्नतेने वागतात. ज्या पृथ्वीराज चव्हाणानें महंमद घोरीला उदार अंतःकरणाने सात वेळा जीवदान दिले त्याच पृथ्वीराज चव्हाणाचा या दुष्ट महंमद घोरीने कृतघ्नतेने घात केला. इतिहासात व आजूबाजूला असंख्य उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. आपल्या हितैषी आईवडीलांशी, आपल्याला सांभाळून घेणार्‍या कुटुंबियांशी, मित्रांशीही निष्कारण वैर धरणारी माणसे आपल्याला पदोपदी भेटतात. त्यामध्ये वस्तुतः कांहीच फायदा नसतो. झाले तर अनहितच असते. परंतु केवळ गैरसमज, संशय, स्वतःची क्षुद्र लहर या पायी ते असले वैर जोपासतात व इतरांना त्रास देतात. त्यांचे मन व बुद्धी इतकी क्षुद्र व दुष्ट असते कीं इतरांची हानी झाली, संकटे आली तर त्यातच त्यांना आपला लाभ झाल्याचा आनंद होतो. रामचंद्रांना वनवासाच्या हाल‍अपेष्टा सहन करायला लावण्यांतच मंथरेला स्वतःला आसूरी आनंद वाटत होता नां ? आणि आपल्या अडचणींवर मात करून आपले राज्य इंद्रप्रस्थाला स्थापून आनंदाने जगू पाहणार्‍या पांडवांचे सुख दुर्योधनाच्या डोळ्यांत खुपू लागले व त्याने पांडवांना उध्वस्थ करण्याचा कपटी डाव अगदी हिकमतीने घडवून आणला.
तुलसीदास म्हणतात - सज्जनांप्रमाणेच मी दुर्जनांनाही वंदन करतो व तेही अगदी शुद्ध भावनेनं ! कारण त्यांचीही निर्मिती भगवत्‌ इच्छेतूनच झाली आहे नां ! त्यामुळे त्यांचे अस्तित्व मान्य करायलाच हवे. परंतु इतकेच म्हणता येईल कीं -
" खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रति वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचे ॥ "

डॉ. सौ. उषा गुणे.

No comments: