05 July, 2008

अनंत रूपें अनंत वेषें

अनंत रूपें अनंत वेषें

ज्ञानदेवादि सगळे भागवत सांप्रदायातील वैष्णव हे बहुतांशी अद्वैती आहेत. त्यांना सगुणाचे प्रेम आहे व निर्गुणाचे ज्ञान आहे. सगुण आणि निर्गुण एकच आहे असा त्यांचा दृढ विश्वास आहे व अनुभव पण आहे.
चराचर सृष्टिला व्यापून असणार्‍या चेतन तत्त्वावर/चैतन्यावर त्यांची नितांत निष्ठा आहे. या चेतन तत्त्वालाच प्राचीन तत्त्ववेत्यांनी ब्रह्म, आत्मा, परमात्मा, परतत्त्व वगैरे नामांनी संबोधले आहे. ह्या विश्वाच्या अणुरेणूत असलेल्या चेतनाला अनुस्मरूनच 'देव' ही संकल्पना आकाराला आली.
भक्तगणांनी आपल्या आवडीनुसार या देवाला नानाविध रूपे आणि नावे दिली आहेत. पण मुळात देव ही वस्तू त्या एका अरूप अशा परतत्त्वाचीच दर्शक आहे. हा देव सर्वत्र आहे. म्हणूनच "जे जे भेटिजे भूत । ते ते मानिजे भगवंत ॥" ही भागवत धर्माची शिकवण उपनिषद तत्त्वाला अनुसरणारीच आहे.
त्याच बरोबर भूतमात्र आणि भगवंत यांच्यातील परस्पर असणारा अन्योन्य संबंध हा एक अखंड असा चिंतनाचा विषय झाला आहे. अगदी अनादि कालापासून. आपल्या अवती भवतीच्या चराचर सृष्टीला नाम-रूप आहे. परतत्त्व ब्रह्म मात्र अरूप आहे. तरीही त्यांच्या परस्परांत आंतरीक नाते आहे. हे ब्रह्मच जगदाकाराने आकाराला येते. भक्तांसाठी हे आत्मतत्त्वच भगवंत म्हणून सगुण साकार होते. म्हणजे आता ब्रह्म, भगवंत आणि विश्व दिसावयास वेगळी असली तरी तत्त्वतः एकच एक आहेत. ह्यांच्यातील नाते शोधणे, ओळखणे, अनुभवणे आणि जपणे म्हणजेच भक्तीसाधना होय.
अध्यात्म शास्त्रकार जीवमात्राच्या ठायी असणार्‍या आत्मरूप चेतनतत्त्वाला "जीवात्मा", तर सर्वव्यापी अशा त्याच एक तत्वाला, मूलभूत तत्वाला "परमात्मा" असं म्हणतात. अगदी अनादि कालापासून जीवात्म्याला परमात्म्याची ओढ लागलेली आहे. या तीव्र ओढीतूनच अनेक साधनमार्ग निर्माण झाले. हे मार्ग आत्मज्ञानाने उजळले जातात. त्याचे राजमार्ग होतात. मग वाटचाल सोपी होते. सगळ्या संतांनी या मार्गावरून चालता चालता मुक्काम तर गाठलाच, पण त्याचबरोबर पायवाट सोपी केली. नुसती सोपीच नाही तर राजमार्ग केला, आणि हा राजमार्ग म्हणजे नामसाधना. भक्तिप्रेमयुक्त नामस्मरण.
आपल्या अवती भवतीचे विश्व दृश्य आहे, साकार आहे. त्याला एक विशिष्ट रूप आहे. तात्कालिक आहे. अस्थायी आहे. पण या विश्वामागील चेतन शक्तितत्त्व मात्र दृश्य नाही. त्याला रूप रंग आकार नाही. पण तरी ते चिरंतन आहे, स्थायी आहे. असे ते शाश्वत, अविनाशी आहे. म्हणून हा विश्वव्यापार अखंड अव्याहत सुरू आहे. कोणतीही शक्ति म्हटली की तिला रूप रंग आकार नसतोच. ती अरूप असते, अदृश्य असते. मात्र तिचा प्रभाव तेवढा सातत्याने जाणवत असतो. तिचे कार्य प्रत्यक्षात दिसत असते. त्यावरून दिसत नसली तरी तिचे अस्तित्व मानावेच लागते. या शक्तीचा अनुभव आपल्याला जाणवतो. या शक्तीला माध्यम लागते. महाभागवत, महावैष्णव, महात्म्यांच्या माध्यमांतून ही शक्तीच कार्यान्वित होते, कार्य करत असते.
सगळ्या संतांना विश्वामागील या चेतनाशक्तीचे सतत स्मरण असते. महामानवांची समग्र जाणीवच या चेतनाशक्तीने व्यापलेली असते. त्यांना या शक्तीचा अखंड ध्यास असतो. त्यामुळे तिचा अविरत शोध घेणं, घेत राहाणं, आणि शोध लागल्यावर सुद्धां अखंड स्मरणात राहाणं हेच त्यांचे जीवन आहे. हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे. याच "अरूप" चेतनतत्त्वाची, शक्तीचीच रूपे, अनंत रूपे ते आपल्या अवती भवती न्याहाळत असतात. ज्ञानराज सांगतात, "अनंत रूपें अनंत वेषें देखिले म्या त्यांसी । बाप रखुमा देवीवरु, खूण बाणली कैशी ॥". अनंत रूपांनी, आकारांनी, नामांनी, वेषांनी एच भगवंत नटला आहे. तो नटनाट्य कुशल कान्हा आहे.
अण्णा -

No comments: