12 July, 2008

तुझा विसर न व्हावा.

तुझा विसर न व्हावा.
भक्ति म्हणजे भगवंताविषयी परमप्रेम भाव. ही भक्तिप्रेमभावना मोठी उत्कट हवी. अखंड आणि क्षण प्रतिक्षण वर्धमान होत जाणारी अशी 'भक्तिप्रेम भावधारा' असली पाहिजे. थोडासा भाव, थोडेसेच पूजन, भजन , वाचन, श्रवण एवढ्याने भागत नाही. तर मग किती हवा तो भाव ? तर सर्वच्या सर्व अंतःकरणच या भक्तिप्रेम भावाने अंतर्बाह्य व्यापून गेले पाहिजे. आणि त्याच बरोबर आपले मन-बुद्धि ह्या एका भगवंताच्याच विचारात आत्मीयतेने रस घेणारी झाली पाहिजे. असे होण्यासाठी त्या सावळ्या सुकुमार, आनंदचिद्‌घन भगवंताबद्दल परम आदर, तसाच निःस्वार्थी निष्काम 'भक्ति-प्रेम-अनुराग' असणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर काय होईल ? तर सुरुवातीच्या चार दिवसानंतर उत्साह, ओढ, अधिरता, तळमळ, उत्कटता पार सर्वच मावळून जाईल. श्रीज्ञानोबाराय म्हणतात, "वर्षाकाळी सरिता । जैसी चढो लागे पंडुसुता । तैसी निच नवी भजता । श्रद्धा दिसे ॥" नारद म्हणतात, "प्रतिक्षणं वर्धमानम्‌" भगवद्‌भक्ति प्रेमयुक्त झाल्यावाचून उत्कट, एकाग्र, अव्यभिचारी आणि चिरस्थायी होऊंच शकत नाही, आणि अशी भक्ति झाल्यावर ती अत्यंत उत्कट प्रेमभक्ति ही एक त्या भगवंताची/परमेश्वराची शक्तिरूपा होते. मग अशा भाग्यवान थोर महाभागवाताच्या निकट कृपाकटाक्षात, छायेत, आश्रयाला जे जे येतील ते ते सुद्धा मोठेच भगवद्‌भक्त होतात.
भक्ति ही दिव्य, भव्य आणि उदात्त आहे. कोणतेही लाभ हेतु अथवा लौकिक आशा अपेक्षा न ठेवता श्रीहरीची निष्काम, उत्कट, मधुरभक्ति सातत्याने चढत्या वाढत्या प्रमाणात करणे हेच निष्कलंक, निरागस, निरामय भक्तीचे द्योतक आहे.
ही अत्यंत विशुद्ध निष्काम भक्ति सदा सर्वदा अहैतुकी असते. जरासाही लाभ हेतू न ठेवता, अंतःकरणापासूनच उसळणार्‍या अकृत्रिम भक्तिप्रेमा पोटीच ती प्रकटते, आकाराला येते आणि क्रियारूप होते.
अशा भक्ताला दर्शनावाचून अन्य काहीच कामना नसते. एकच कामना - 'तो मज व्हावा, तो मज व्हावा । वेळोवेळा व्हावा पांडुरंग । 'नृसिंह भगवंताने जेव्हा प्रसन्न होऊन भक्त प्रह्लादास कोणताही वर मागण्यास सांगितले, तेव्हा त्याने तत्काळ चोख उत्तर दिले "स्वामिन्‌ कृतार्थोस्मि, वरं न याचे ॥ " तो म्हणाला, "हे प्रभो, आपल्या (इतरांना अलभ्य अशा) दर्शनानेच मी कृतार्थ् व पूर्णतृप्त झालो आहे, आता आपल्या पुण्यस्मरणावाचून अन्य कोणतेही वरदान मला नको. आपले तुकोबाराय हेच सांगतात "हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥"
अशा निरपेक्ष, निर्मम, निर्मळ भक्तीनेच तो मोठा जगदीश्वर परमात्मा प्रसन्न होऊ शकतो. अशा भक्ति प्रेम योगात एक केवळ एक त्या आनंदघन रामाचेच चिंतन उरते. अखंड एकमेव भगवत्‌ चिंतनासाठी मन एकाग्र व्हावयास हवे. आणि भगवत्‌ स्वरूपावर मन एकाग्र करणे, त्या केवळ आनंद स्वरूपाचेच चिंतन करणे किती कठीण् आहे याची कल्पना नाम-चिंतन करावयास सुरुवात केली म्हणजेच कळते, की ते किती भरकटते ? कोठे कोठे जाते ? कशा कशाचे चिंतन करते ?
मग यावर उपाय काय ? मन स्थिर करण्यासाठी योग व ज्ञान या मार्गात अनेक उपाय कथन केले आहेत, पण ते सर्वच्या सर्व अति रुक्ष आहेत. भक्तिमार्गात एकच उपाय आहे, व तो मोठा रम्य आणि अमोघ आहे. भगवंताची दृढ उपासना म्हणजे त्याचे नामस्मरण.
भक्तिमार्गात, तत्त्वचर्चा व शास्त्राभ्यास यापेक्षा आचारावर व भावनाप्रवाहावर अधिकाधिक भर दिला आहे. उपासकाने, भक्ताने आपल्या सर्वच्या सर्व भाव भावना भगवत्‌ केंद्रित, श्रीगुरुकेंद्रित व संबंधित करावयाच्या. मग सगळ्याच्या सगळा आचार श्रीहरि प्रित्यर्थ, त्या आनंदकंदासाठीच करावयाचा अशा सर्व भावभावना व सर्व आचार भगवत्‌ केंद्रित् होणे हीच भक्ति होय.
अशा प्रकारे चित्त, भाव, भावना आचार अतूटपणे वासुदेवाच्याच ठिकाणी जोडले जाणे, आसक्त होणे हाच श्रेष्ठ असा भक्तियोग आहे. हा साध्य झाला की मग पूर्ण वैराग्य, भगवंताचे समग्रज्ञान, त्याचे दर्शन व अचल अशी वासुदेव स्वरूपता या सर्व गोष्टी सहजच प्राप्त होतात आणि भक्त हा भगवंताशी मूळच्या तन्मयतेला, तदाकारतेला, तद्‌रूपतेला तल्लीनतेला प्राप्त होतो.

अण्णा -

No comments: