30 July, 2008

आसक्ति - आनंदकंदाची

आसक्ति - आनंदकंदाची


आपल्या हृदयातील भक्तिप्रेम भावनेचा परमोच्च भाव म्हणजेच एकांतभक्ति होय. हिलाच कोणी अद्वैतभक्ति अथवा पराभक्ति असेही म्हणतात. अशी भक्ति करता करता मग भक्ताला सर्व लौकिक सुखे, सुखकल्पना व जीवनव्यवहार नीरस वाटू लागतो. एका भगवंतावाचून दुसरे काहीही आवडेनासे होते. भक्त मग आपला सर्व जीव प्राण एकवटून हरि प्राप्तीसाठी झटतो, तळमळतो. जरा एक क्षणभरसुद्धा श्रीहरीचे विस्मरण झाले तर तो कासावीस होतो, अगदी व्याकूळ होतो.
"ना अरत्र ना परत्र" म्हणजे लौकिक व्यवहाराविषयी उदासीनता आणि श्रीहरि प्राप्ति तर अद्याप झालेली नाही अशा, 'ना हा कांठ ना तो' अशा अवस्थेत दिवस कष्टाने कंठित असताही जो हरिस्मरण एक क्षणभरही सोडीत नाही, अशा भक्तास अचानकपणे आवडत्या देवाच्या स्वरूपात साक्षातकार होतो.
ईश्वरस्वरूप भक्ताला तृप्त करून, त्याच्यावर आनंदघनाचा अमृतवर्षाव करून अप्ल काळात अंतर्धान पावतो, आणि नंतर त्या सच्चिदानंदकंद परमात्म्याचा प्रत्यय चराचर स्वरूपांत सृष्टींत अणूरेणूत अव्यक्तपणे येऊ लागतो. ज्ञानदृष्टीने ही ब्राह्मीस्थिती, तर भक्तियोगाच्या दृष्टीने हीच एकांतभक्ति, पराभक्ति, अद्वैतभक्ति होय. या अनुभवाच्या स्थितीत भक्त व देव यंतील अंतरच लोपते. त्यांचे मुलभूत ऐक्य प्रकटते, विलसूं लागते. ही परमोच्च भक्ति प्रत्येक भक्ताने आत्मसात करावी असा नारदासारख्या भक्ताचार्यांचा प्रेमळ आग्रह आहे.
भक्तीचा अपार महिमा येवढ्याने संपत नाही बघ. ही परमप्रेमस्वरूपा भक्ति, कर्म, योग व ज्ञान या अध्यात्म मार्गापेक्षा अधिकतरा आहे. आता ही अधिकतरा कोणत्या बाबतील आहे ? तर परमविरहावस्था आणि विरोधी भक्ति.
पराभक्तीच्या प्रकर्षाने प्रकट होणार्‍या, आणि अखिल जीवन व्यापणार्‍या एका स्थिर प्रत्ययी महाभावाला - आनंदभावाला भक्तिशास्त्रकारांनी एक वेगळेच विशेषण जाणीवपूर्वक योजले आहे. ते म्हणजे आसक्ति. सक्त म्हणजे जोडले जाणे, वज्रलेप होणे. या व्युत्पत्तीनुसार आसक्ति म्हणजे "आपल्या आवडत्या विषयाबद्दल मनास वाटणारी अनिवार्य ओढ, आणि या ओढीमुळे मनुष्य त्या विषयाशी विचारांनी व भावनांनी आसक्त होणे." प्रत्येक मनुष्यमात्राचा आवडता विषय वेगळा वेगळा असतो. अनन्य भक्ताचा एक आनंदकंद भगवंतच आवडता विषय असतो. म्हणजे आसक्ति ही भगवंताशी जोडली गेल्यावर तिचे सुद्धा उन्नयन होते. तो श्रीहरीशी अतूटपणे जोडला जातो.
नाहीतरी एरव्ही साधारणपणे वाईट गोष्टींची सवय दर्शविण्यासाठी 'आसक्ति' हा शब्द योजला जातो. जसा व्यसनासक्ति, द्युतासक्ति, धनासक्ति, सत्तासक्ति इत्यदि. अशा माणसाला आपल्या आवडीच्या गोष्टीबद्दल आत्यंतिक ओढा असतो. तत्पूर्ततेसाठी तो वाटेल तेवढे कष्ट व साहस सोसतो. परंतु भगवंत हाच एक मात्र आवडीचा (आनंदाचा) विषय होतो व त्याच बरोबर परमभक्ति प्रेमाने ओथंबलेली अत्युत्कट भावधारा हृदयांत सतत उचंबळते, तेव्हा त्याच आसक्तिस मान्यप्रद "भक्ति" असे म्हणतात.
भगवंतच्या ठिकाणी चित्त आसक्त होणे ही गोष्ट भक्तिशास्त्राने अत्यंत प्रशंसनीय म्हणून वर्णिलेली आहे. ती भक्तिप्रेमाची एक अत्युच्च कोटी आहे. सामान्य आसक्त मनुष्याच्या ठिकाणी स्व-आवडीबद्दल, व्यसनाबद्दल जी एकनिष्ठता, क्रियाशीलता, तडफ, उत्साह इतकंच काय जशी निर्लज्जता असते, अगदी तशीच एकाग्रता, प्रयत्‍नशीलता भगवत्‌ प्राप्तीसाठी भक्ताच्या ठिकाणी असावी हेच "आसक्ति" या शब्दामागील प्रयोजन भक्तिशास्त्रकारांना अभिप्रेत आहे.
असे झाल्यावर भक्ताची काय अवस्था होते पहा - "आता मज एक विठ्ठलाचा छंद । लौकिक संबंध दूर ठेला ॥ विठ्ठलावाचून न बोले वचन । न देखे नयन दुजे काही ॥ मज रात्रंदिन विठ्ठलाचे ध्यान । वाटे जीवप्राण विठ्ठलचि ॥"
ब्राह्मीभाव प्राप्त झाल्यावर, ज्या सर्वात्मभावात ज्ञानी, योगी पुरुष असतो, त्याच शिखरोच्च अवस्थेत भक्त भक्तियोगाने, प्रेमाने अवस्थित असतो. पण त्यानंतर सुद्धा "आई मला निर्विकल्प समाधीचा निश्चेष्टपणा नको, तर मला तुझ्या सृष्टीत मुक्तपणे नाचूं दे, गाऊं दे, भजन पूजन करूं दे" असेच श्रीरामकृष्ण परमहंस विनवीत असत. अशा देवभक्त सापेक्ष द्वैतभावाला बाळगून तो भक्त काही विशेष्ट स्नेहसंबंध विविध नातेसंबंध स्विकारून त्या आनंदघनाशी आमरण अतूट नाते जोडतो.

अण्णा

No comments: