22 June, 2008

मानसमणिमाला (९)

मानसमणिमाला (९)

हिंदी दोहा : बंदऊँ संत समान चित हित अनहित नहिं कोइ ।
अंजलि-गत सुभ सुमन जिमि सम सुगंध कर दोइ ॥ बालकाण्ड ३
मराठी : वंदे संत समान मन हित अनहित ना कोणि ।
अंजलिगत शुभ सुमन जशिं सम सुगंध कर दोनि ॥ प्रज्ञानानंद

अर्थ : ओंजळीतील सुगंधी, पवित्र फुले आपला सुगंध दोन्ही हातांस सारखाच देतात व त्या हातांना सुगंधित करतात. त्याचप्रमाणे संताचे समचित्त, समभाव असल्याने शत्रू मित्र (अनहित-हित) यांच्याशी ते समानतेनेच वागतात. त्यांना दुजाभाव नसतोच. अशा संतांना मी वंदन करतो.

संतांच्या अंतःकरणांत शत्रू मित्र, आप पर, उच्च नीच, गरीब श्रीमंत असे भेदभाव कधीच नसतात. त्यामुळे त्यांची कृपा सर्वांवर सारखीच असते. फुलांना आपल्याजवळील सुगंध सर्वत्र विखुरणे इतकेच माहीत असते. आपण पवित्र देवघरांत आहोत कीं स्मशानभूमीत आहोत याचा विचार फुलांजवळ नाही. आपल्या जवळील सुगंधाचे सुख समाधान जो त्यांच्या जवळ येईल त्याला द्यायचे अशीच त्यांची सहजस्थिती असते. त्यांत डावे उजवे त्यांना माहीत नसते. तसाच संतांचा सहजभाव असतो. आपण इतरांवर कृपा केली असेही भान त्यांना नसते, तर ज्यांचेवर कृपा झाली त्यांच्यात चांगले वाईट, योग्य अयोग्य पाहणे तर लांबच असते. " ना तरी इक्षुदंडु । पाळितया गोडु । गाळीतया कडु । नोहेचि जेवी ॥ अरिमित्रीं जैसा । अर्जुना जया भावो ऐसा । मानापमानी । सरिसा पाडु ॥ (ज्ञानेश्वरी १२.२००-२०१) "
इतकेच नव्हे तर केलेल्या उपकारांची, कृपेची अगर सहाय्याची परतफेड कुणी अपमानकारक रीतीने केली, त्याची जाणीव ठेवली नाही, तरीही संतांचे मन सम शांतच राहते. अगदी जणुं सुमनच ! फुलांनी दिलेल्या सुगंधाबद्दल, दृष्टि सौख्याबद्दल ना कुणाच्या मनांत कृतज्ञभाव निर्माण होत नाही, ना उपकाराची भावना ! दुसर्‍या दिवशी त्यांची रवानगी होते निर्माल्यांत. पण फुलांची कांहीच तक्रार नसते. आपल्या कर्तव्यपूर्तीच्या समाधानांत त्यांचे जीवन पूर्णतेला जाते. संतांचेही अगदी तसेच असते. आपले प्रत्येक कर्म ते 'ईश्वर पूजा' याच भावनेने करत असतात. त्यामुळे लौकिकांतील चांगल्या वाईट गोष्टी, व्यक्ति यांचेबद्दल विचार करायला त्यांचे मन मोकळे नसतेच. ते आपल्याच आनंदाने आनंदित झालेले असतात व त्याचा सुगंध, त्याचे समाधान इतरांनाही मिळतेच. 'तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्म कुसुमांची वीरा । पूजा केली होय अपारा । तोषालागी ॥ (ज्ञाने. १८.९१७)
तुलसीदास म्हणतात, अशा संतांना मी कृतज्ञतेने वंदन करतो आणि हे वंदन त्यांनी अगदी बालभावाने केलेले आहे. बालकाचा जसा आपल्या आईवर दृढ विश्वास असतो व अनन्य प्रेम असते तसाच विश्वास ते संतांचे ठिकाणी ठेवतात व त्यांना प्रार्थना करतात कीं त्या संतांसारखेच आपल्यालाही प्रभु रामचंद्रांच्या ठिकाणी अनन्य प्रेम, निरपेक्ष भक्ति प्राप्त होवो.


डॉ. सौ. उषा गुणे.

No comments: