30 November, 2008

नामसाधना - ६ (अंतिम)

नामसाधना - ६ (शेवटचा भाग)
आतापर्यंत नामस्मरण कसे, तसेच अति दक्षतेने करणे का आवश्यक आहे हा विचार झाला. पण नामस्मरण कशासाठी करायचे ? मोक्षप्राप्ती साठी, मुक्तिसाठी, परमेश्वर प्राप्तीसाठी आनंदप्राप्तिसाठी वगैरे म्हणतात. पण मोक्ष, मुक्ति, परमेश्वर प्राप्ती, नित्य आनंद स्थिती म्हणजे नेमके काय ?
वेदांतात चार सूत्रे 'महावाक्ये' म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रज्ञानं ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म, तत् त्वं असि, अहं ब्रह्मास्मि, ही ती चार वाक्ये होत. ब्रह्म हे सर्व दृष्य जगताचे अधिष्ठानरूप आहे, प्रत्येक चेतन व जड वस्तूमध्ये ब्रह्म ओतप्रोत भरलेले आहे म्हणून 'सर्वं खलु इदं ब्रह्म' असे म्हणतात. जड आणि चेतन असे वेगळे वेगळे काही नाहीच, सर्वज ऊर्जा आहे, प्रत्येक वस्तू एका ऊर्जेचाच आविष्कार आहे, तर सर्वं दृष्यं जगत् खलु इदं ऊर्जा एव असे म्हणायला हरकत नाही. पण तेच ब्रह्म प्रत्येक प्राणीमात्राच्या हृदयात 'अंगुष्ठमात्रं तिष्ठति' असे म्हणतात. अर्थात् 'हृदयात अंगठ्या एवढ्या रूपाने राहतो' हे काल्पनिक आहे, physical नव्हे. त्याचा भावार्थ असा की तेथे तो साक्षीभावाने वास करतो. साक्षीभावाने म्हणजे ? म्हणजे या दृष्यमय जगताचे , या दृष्य ब्रह्माचे अदृष्य असणारे अधिष्ठान - the prime support. पण त्याला ब्रह्म म्हणत नाहीत. त्याला आत्मा म्हणतात. आता बाहेर जगत् रूपाने दिसते ते ब्रह्म आणि या दृष्य जगताचा, या ब्रह्माचा, हृदयात साक्षीरूपाने पाहणारा असतो तो आत्मा हे दोन्ही एकच आहे. पण बाहेरचे ते ब्रह्म आणि आंतला तो आत्मा, असे एकाच वस्तूला दोन नावांनी संबोधण्याचे convention आहे इतकेच. गोंधळ होतोय ना ? त्या ब्रह्माने जेव्हां 'एकोऽहं, बहुस्याम्' असा संकल्प केला [पहा ऐतरेय उपनिषद] तेव्हां आपल्या क्रीडेसाठी ८४ लक्ष योनी (शरीरे) निर्माण करून त्यात साक्षीरूपाने तो वास करता झाला. ह्या सर्व योनी म्हणजे जीव. हा जीव जेव्हां आपल्या शरीराशी तादात्म्य पावतो, तेथे अहंभावाने व्यवहार करतो तेव्हां त्याला आपल्या नित्य सत् चित् आनंद स्थितीचे विस्मरण होते आणि त्याची स्वस्वरूप जी ज्ञान स्थिती असते त्यावर अज्ञानाचे आवरण येते. त्याक्षणीच जीवाची संसार कहाणी आरंभ झाली. तो एकम् एव अद्वितीय असूनही आपल्या बुद्धीनेच, कल्पनेनेच आपले जगत् निर्माण करतो आणि आपल्या जगतात आपल्याहून भिन्न अशा अनेक वस्तू निर्माण करतो. आणि त्या वस्तूंपासून सुख मिळविण्याचा प्रयत्‍न करीत राहतो. [इथे म्हटले आहे की 'प्रत्येक जीव आपले एक जगत् निर्माण करतो’. पण माझ्या जगतातील कितीतरी गोष्टी इतर अनेक जीवांच्या जगतात, त्यांच्या ओळखीच्या असतात, हे कसे ? ह्याचे स्पष्टीकरण विस्तारभयास्तव अशक्य आहे. परत कधीतरी त्यावर चर्चा करता येईल. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी योगवासिष्ठ, निर्वाणप्रकरण (पूर्वार्ध), सर्ग ५२ पाहावा]. द्वैतात सुख नसल्यामुळे तो जीव कधीच सुखरूप होऊ शकत नाही. मग पुनरपि जननं पुनरपि मरणं करीत अनेक जन्मात दुःखच दुःख पावल्यामुळे एक दिवस असा उजाडतो की थकला भागलेला जीव चिरंतन आनंदाचा शोध घ्यायला लागतो. मी कोण चा शोध घेत घेत जेव्हां त्याने पसरलेले हे जगत् म्हणजेच इदं सर्वं अहं असा ठाम निश्चय होऊन त्याच्याशी जेव्हां एकरूप होतो, थोडक्यात आपल्या हृदि स्थित असलेल्या आत्म्याला ओळखतो तेव्हां त्याला त्याच्या मूळ स्वस्वरूप सत् चित् आनंदाची अनुभूति होते. पण हे 'ओळखतो' म्हणजे काय होते ? तो ओळखतो तेव्हां त्याची कोणती स्थिती असते ? तूर्त एवढेच समजायचे की आपण ज्याला जाग्रत् म्हणतो तीही जीवाची ज्ञानप्राप्ती पूर्वीची स्वप्न स्थिती आहे. ज्ञानप्राप्ती नंतरची स्थिती म्हणजे तुर्यावस्था. विस्तारभयास्तव ह्याचे स्पष्टीकरण येथे देणे अवघड आहे. ऐतरेय उपनिषदात ह्याचा उहापोह आहे. थोडक्यात आपण ज्याला जाग्रत् अवस्था समजतो त्या स्वप्नमय, आभासरूपी जगतातून बाहेर पडून खर्‍या अर्थाने जागे होणे म्हणजेच 'मी' ला ओळखणे. म्हणजे आपण सर्व झोपेत आहोत आणि स्वप्न बघतो आहोत असे आहे का ? होय, असेच आहे. म्हणून तर भगवंत गीतेच्या दुसर्‍या अध्यायात (२/६९) म्हणतात - या निशा सर्व भूतानां तस्यां जागर्ति संयमी । यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥ ज्या आत्म्याच्या बाबतीत मनुष्ये निजलेली, म्हणजे अज्ञानी असतात, त्या बाबतीत स्थिरबुद्धि योगी जागरूक असतो, तसेच ज्या प्रपंच्याच्या बाबतीत मनुष्ये जागरूक असतात, त्या बाबतीत योगी निजलेला, म्हणजे त्यापासून निवृत्त असतो. म्हणूनच श्री शंकराचार्य याला 'मिथ्या जगत्' म्हणतात.
आपल्या अंतरंगात जो आत्मा आहे तो मीच. गुरू आपल्याला 'तत् त्वं असि', म्हणजे तो जो आत्मा तो तूच आहेस असे सांगतात. त्याची अनुभूति आल्यावर जीव म्हणतो ओ हो, आता समजले. मग तो म्हणतो 'अहं ब्रह्मास्मि' , तो मीच आहे. 'तो मीच होय' अशी अनुभूति म्हणजेच मोक्ष, मुक्ति, परमात्मप्राप्ति, आनंदप्राप्ति वगैरे वगैरे. म्हणजे 'तो आत्मा मी आहे' ही वेदांताची central theme आहे असे म्हणायला हरकत नाही. मग कोणतीही साधना असो, 'मी' चा शोध, परमेश्वर प्राप्ति, मुक्ति, मोक्ष ह्या सर्वांचे मर्म 'तो मीच होय' असे जाणणे, उमजणे आहे. परमार्थात जर हे ध्रुपद बाजूला सारले तर बाकी काहीच शिल्लक राहात नाही. ह्याव्यतिरिक्त परमार्थ संबंधी जे काही आपण करू ती नुसतीच बौद्धिक कसरतच म्हणावी लागेल. साधनेचे पर्यवसन, मग तो ॐ, तो राम, तो परमात्मा दुसरा तिसरा कोणी नसून ’मीच तो' अशा प्रकारे होईपर्यंत साधना करणे, नाम घेणे नितांत आवश्यक आहे. आणि नुसतेच नाम घेत राहणेही पुरेसे नाही. त्यालाही साधन चतुष्टयाची जोड देखील नितांत आवश्यक आहे. आणि त्याकरिता साधनेत quantity तर पाहिजेच पण ती ज्या quality ने युक्त असेल त्या प्रमाणात गति लाभेल असे मला वाटते. मित्रांनो, आतापर्यंतच्या माझ्या लिखाणावरून वाटेल की, श्रीमहाराजांनी अगदी सोपे म्हणून जे सांगितले ते मी इतके क्लिष्ट, इतके भयावह करून का सांगतो आहे ? पण मला वाटत नाही की श्रीमहाराजांनी खरोखरच सांगितले की 'ते खरंच फार फार सोपे आहे' आपण जर सर्वच प्रवचनांचा आढावा घेऊन त्यावर चिंतन केले तर आढळेल की प्रपंच निवृत्ति आणि परमार्थ प्रवृत्ति जागी करण्याची गोडी लागावी ह्यासाठीच महाराजांनी सर्व खटाटोप केलाय. आणि एकदा का गोडी लागली, एकदा का मनुष्य मार्गी लागला तर मग कष्ट हे कष्ट राहात नाहीत. मनाच्या या स्वभावाबद्दल श्रीज्ञानेश्वरांच्या दोन छान ओव्या आहेत -
परि वैराग्याचेनि आधारें । जरी लाविलें अभ्यासाचिये मोहरें ।
तरी केतुलेनि एके अवसरें । स्थिरावेल ॥ ६/४१९ ॥
कां जें यया मनाचें एक निकें ।जें देखिलें गोडीचिया ठाया सोके ।
म्हणौनि अनुभवसुखचि कवतिकें । दावीत जाइजे ॥ ६/४२० ॥
आणि परमार्थ खरंच जर सोपा असता तर श्रीतुकारामांना - परमार्थ नोहे लेकुरांच्या गोष्टी - असे म्हणण्याची काय आवश्यकता होती ?
समाप्तः
एकोहम् 

No comments: