12 December, 2008

मानसमणिमाला (१३)

मानसमणिमाला (१३)
:

हिंदी : गुन अवगुन जानत सब कोई । जो जेहि भावनीक तोहि सोई ॥ बा. कां. १.४.९

मराठी : गुण अवगुण सगळेच जाणती । जो ज्या रुचे श्रेष्ठ तो गणती ॥

अर्थ : गुण किंवा अवगुण कशाला म्हणायचे हे सर्वजण जाणतात. परंतु ज्याला यातील जे चांगले वाटते तेच तो योग्य वा श्रेष्ठ मानतो व स्वीकारतो.

साधारणतः समजूत अशी असते कीं लहान मुलाला चांगले वाईट, खरे खोटे यांतला फरक फारसा चांगला समजत नाही तसाच अडाणी अज्ञ व्यक्तीसही चांगले वाईट गुण अवगुण यातील फरक किंवा गुण कोणते अवगुण कोणते हे नीट कळत नसावे. म्हणूनच त्यांच्या हातून अनेक चुका होतात. पण ही समजूत खरी नाही. सर्व माणसांना परमेश्वराने सत्‌ असत्‌ विवेकबुद्धि दिलेली असते, व त्यामुळे गुण कशाला म्हणतात, योग्य काय अयोग्य काय, अवगुण कोणते हे सर्वांना समजते. परंतु त्याच ज्ञानाचा स्वतःच्या बाबतीत उपयोग करायची वेळ आली की भल्याभल्यांची फसगत होते व चुकीचे निर्णय घेतले जातात.

स्मर्थ म्हणतात : सकळ अवगुणांमध्ये अवगुण । आपले अवगुण वाटती गुण ।

मोठे पाप करंटपण । चुकेना की ॥ दासबोध १९.८.८

रागीट स्वभाव हा दुर्गुण समजला जातो, पण तो इतरांचा ! आपल्या रागीटपणाचे आपण नेहमी किती प्रकाराने समर्थन करतो, त्याची आवश्यकता स्वतःला आणि इतरांनाही पटवून देतो ! त्यामुळे तो रागीटपणा सोडून देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यालाच समर्थांनी 'करंटेपणा' म्हटले आहे. कारण सुधारण्याची तिथे आशाच राहात नाही. आपल्या दुर्गुणांचे दुर्गुणत्व बोचत नाहीच, उलट ती एक अभिमानाचीच गोष्ट आहे असे वाटते. "पहा बरं, माझा स्वभाव फार रागीट आहे, तेव्हां तुम्हीच जपून वागा !' म्हणजे मी कांहीही सुधारणा कधीच करणार नाही ही गर्भित धमकी.

याचे उलट ज्याचे जवळ कांही सद्‌गुण आहेत त्यालाही त्या सद्‌गुणांचे महत्त्व चांगलेच समजलेले असते त्यामुळे ते वाढीला कसे लागतील याचा तो अगदे आवडीने प्रयत्‍न करतो, पण त्यालाही त्याचा थोडासा अभिमान असतोच. समर्थ सहजपणे सुचवितात - 'मूर्ख मूर्खपणे भरंगळती । ज्ञाते ज्ञातेपणे कलहो करिती । होते दोहोकडे फजिती । लोकांमध्ये ॥ दा. १९.७.२९

आपले किंवा इतरांचे सद्‌गुण किंवा अवगुण योग्य तऱ्हेने जाणून घेऊन त्याचे उपयोग अगर समर्थन करावे अन्यथा लोकांमध्ये आपली फजिती होणार हे ठरलेलेच आहे.

डॉ. सौ. उषा गुणे.




No comments: