05 March, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक १७

उपेन्द्रो वामनः प्रांशुरमोघः शुचिरूर्जितः ।
अतीन्द्रः संग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः 
(१५१) उपेन्द्रः :  - इंद्राचा धाकटा भाऊ. 'वामनावतारामध्ये श्रीविष्णूने अदितीच्या उदरी जन्म घेतला. ती इंद्राचीही माता होती त्यामुळे इंद्राचा धाकटा भाऊ उपेन्द्र असे श्रीविष्णुचे नामकरण झाले. संस्कृतमध्ये उप ह्या उपसर्गाचा अर्थ वर किंवा श्रेष्ठ असाही होतो. म्हणून उपेन्द्र ह्या नामाचा अर्थ ' जो इंन्द्रापेक्षाही श्रेष्ठ आहे तो.' असाही हो शकतो. हरीवंशामध्ये अशाच तर्‍हेचे स्पष्टीकरण आले आहे. (७६-४७) शरीरामध्ये इंद्रियांचा राजा 'इन्द्र' म्हणजे मन होय. जाणीव अगर ज्ञानस्वरूप आत्म्याच्याच शक्तिने मन कार्यशील होवूं शकते. अर्थात आत्मशक्तिच मनाचे नियंत्रण करते म्हणूनच ती मनापेक्षा श्रेष्ठ आहे. (उपेन्द्र) ही जीवनशक्ती - आत्मा म्हणजेच श्रीविष्णु.
(१५२) वामनः :  - श्रीविष्णूच्या दशावतारातील पांचवा अवतार म्हणजेच 'वामन' होय व ही संज्ञाच असे सुचविते की ज्याचे शरीर लहान आहे तो वामन. एका लहान मुलाचे बटुचे शरीर त्याने धारण केले. (बटु - गुरूकुलामध्ये राहून शिक्षण घेणारा लहान मुलगा) हा बटु वामन आपल्या लहानशा तीन पावलांनी व्यापेल इतकी भूमी मागण्याकरतां धर्मशील सम्राट महाबलीकडे गेला. पण त्या वामनरूपी परमेश्वराने आपल्या तीनच पावलांनी पृथ्वी, आकाश, व स्वर्ग ह्या तीनही लोकांना व्यापून टाकले. अशातर्‍हेनें त्याने बलीवर विजय मिळविला. बळी राजाला झालेल्या गर्वाचे त्याने दमन केले (वामयति इति वामनः) म्हणून बटुरूप धारण करणार्‍या त्या परमेश्वराला संज्ञा मिळाली 'वामन'.
     वामन शब्दाचा दुसरा अर्थ होतो पूजनीय आहे तो. (मध्ये वामनमासीनं विश्वेदेवा उपासते) मध्यभागी बटु वामनाची स्थापना करून सर्व देव त्याचे पूजन करतात असा कठोपनिषदांत उल्लेख आहे (५-३) ह्या संज्ञेमध्ये त्याच्या बटुमुर्तीलाच महत्व दिले आहे. या पुढील संज्ञेत पूर्ण विरोधी असा अर्थ आपल्याला आढळतो.
(१५३) प्रांशुः :  - ज्याचे शरीर अत्यंत विस्तीर्ण आहे तो प्रांशु. वामनावतारामध्यें धर्मशील बलीराजाकडून भूमीचे दान मिळेल असे अभिवचन मिळताच अत्यंत भव्य रूप धारण करून त्याने पावले मोजण्यास सुरवात केली व पहिल्याच पावलानें संपूर्ण पृथ्वी व्यापली, दुसर्‍या पावलाने आकाश व तिसर्‍या पावलाने स्वर्ग व्यापला. या बटु वामनमुर्तीने वाढता वाढता धारण केलेल्या भव्य विश्वरूप मूर्तीचे वर्णन हरिवंशामध्ये फारच सुंदर पद्धतीने केलेले आढळते[1] (२६२-२६९) सूर्य व चंद्र हे दोन स्थिर बिंदू मानून त्याच्या अनुषंगाने वामनाच्या विस्तृत होण्याचा क्रम त्यात वर्णिलेला आहे. जेव्हा त्याने भव्य आकार धारण केला तेंव्हा चंद्र व सूर्य त्याच्या नेत्रांत होते. जेव्हा त्याने पृथ्वी पादाक्रांत केली तेंव्हा चंद्र सूर्य त्याच्या वक्षस्थळा- पर्यंत आले. जेव्हा त्याने आकाश व्यापले तेंव्हा चंद्र सूर्य त्याच्या नाभी प्रदेशापर्यंत आले व जेव्हा त्याने आपले पाय स्वर्गाचे मोजमाप करण्याकरतां उचलिले तेंव्हा चंद्र सूर्य त्याच्या जानूच्याही खाली गेले.
(१५४) अमोघः :  - ज्याच्या सर्वकृती एकाद्या महत्कृत्याच्या परिपूर्णते करताच होत असतात तो. सामान्य माणसांना परमेश्वराची एकादी कृती हेतूशून्य किवा निष्फळ वाटण्याची शक्यता असते पण ती कधीच निष्फल होत नसते. कारण ते परमेश्वरीय कार्य असते. जेव्हा तो एकादी शिक्षा करतो ती सुद्धां एकाद्या महान् उत्क्रांतीचे मंगलदायक आशीर्वाद असण्याचीच शक्यता असते.
(१५५) शुचिः :  - जो अत्यंत निष्कलंक, स्वच्छ आहे म्हणूनच नित्य शुद्ध आहे असा. कोणत्याही वस्तुमधील भेसळ ही त्या मूळ वस्तू खेरीज इतर वस्तूंमूळे होत असते. वस्त्रावर जेव्हा धूळ बसते तेव्हां वस्र मलीन अपवित्र होते. आत्मा हा अद्वितीय असून त्याचेमध्ये दुसर्‍या कशाचेही अस्तित्व संभवत नाही. अर्थातच तो एकमेव व नित्यशुद्ध असतो. व त्याच्या पवित्रतेचे चिंतन मनन करणार्‍यासही तो हे शुचित्व देतो.
(१५६) ऊर्जितः :  - ज्याचेमध्ये अपरिमीत सामर्थ्य व चेतना आहे असा. कोणत्याही प्राणीमात्रांमध्ये आपण जे सामर्थ्य व चैतन्य अनुभवतो ते सर्व सामर्थ्य आत्म्याचे आहे. तो आत्मस्वरूप विष्णू अनंत व सर्वव्यापी आहे त्यामुळे सर्व सामर्थ्याचे उगमस्त्रोत तोच आहे.
(१५७) अतीन्द्रः :  - जो ज्ञान, ऐश्वर्य व सामर्थ्य यामध्ये इंद्रापेक्षाही श्रेष्ठ आहे तो अतीन्द्र. इन्द्र या शब्दानें मन बुद्धी या साधनांचा निर्देश केला जातो. आत्मा हा मनबुद्धिच्या पलिकडे असल्याने अतीन्द्र शब्दाने त्याचाच निर्देश केला आहे.
(१५८) संग्रहः :  - जो सर्व जडचेतन वस्तूजातास आपल्या कधीही न सुटणार्‍या मिठीमध्ये सामावून घेतो तो श्रीविष्णु संग्रह 'स्वरूप' आहे. ज्याप्रमाणे चाकाचा आंस आपल्या असंख्य आरांनी चाकाचा परीघ आपल्यामध्ये तोलून धरतो त्याप्रमाणे तो अंतरात्मा आपली चैतन्यशक्ती शरीरातील प्रत्येक पेशीला व मन बुद्धीतील प्रत्येक विचाराला देतो.
     परमेश्वराच्या सामर्थ्याखेरीज कुठेही कांहीही घडून येवू शकत नाही. आत्म्याचे अस्तित्व सर्व ठिकाणी सारखेच असते व नित्य असते, मग ती वस्तू स्थावर असो अगर जंगम असो, स्थूल असो वा सूक्ष्म असो, व्यक्त असो किवा अव्यक्त असो. तोच एक असा आहे की ज्याने सृष्टीतील सर्व वस्तूजातास आपल्या प्रेमाच्या व एकरुपतेच्या मिठीमध्ये सामाऊन घेतले आहे.
(१५९) सर्गः :  - ज्याने आपल्यामधून सर्व सृष्टिची निर्मिती केली आहे तो. स्थूल सूक्ष्म सृष्टी ही त्याचीच निर्मिती असल्यामुळे संपूर्ण निर्मित वस्तूमात्र हे त्याचेच आकाराला आलेले स्वरूप होय. अर्थातच ते त्या परमात्म्याचाच निर्देश करते.
(१६०) धृतात्मा :  - जो स्वतःच स्वतःचा आधार आहे. यापूर्वीच्या 'संग्रह' या नामाच्या विवेचनामध्ये 'जड चेतन सृष्टिला प्रेमबंधनांत समाविष्ठ करणारा' असे म्हटले आहे तर सर्ग ह्या नामाच्या विवेचनांत तो सृष्टिचे  उपादान व निमित्त कारण आहे, म्हणूनच सर्व सृष्टिचा तोच आधार आहे असे दर्शविले आहे. परंतु त्याला आधार कोण देते ? तो धृतात्मा आहे. ( धृतः आत्मा येनस:  - धृतात्मा ) तो स्वतः आपल्यातच स्थिर झाला आहे.
(१६१) नियमः :  - नियामक अधिकारी जो सृष्टितील सर्व बलिष्ठ शक्तिंना कार्यान्वित करतो. प्रत्येक शक्तिला कार्यबद्धतेचे नियम लावतो, त्यांची कार्यशक्ती व पद्धती नियमित करतो तो. सूर्य, चंद्र, वायू, जल, दिग्पाल व मृत्यू (काल) ह्या सर्वांना त्यानेच आपापले कार्य नेमून दिले आहे.
(१६२) यमः :  - जो आपल्या स्वतःच्या शक्तिने अगर नियमानें सृष्टितील सर्व शक्तिंचे नियमन करतो तो श्रीविष्णु. सर्व सृष्टी त्याच्याच नियमांचे पालन करते.
डॉ. सौ. उषा गुणे


[1]   अनण्वस्थूलमह्रस्वदीर्घमजमव्ययम् । अरुपगुणवर्णाख्यं तद्‍ब्रह्मेति अवधारयेत् ॥

No comments: