13 March, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक १९

महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः 
अनिर्देश्यवपुः श्रीमानमेयात्मा महाद्रिधृक्  ।।
(१७३) महाबुद्धि :  - आधीच्या संज्ञेमध्ये परमेश्वर सर्वसमर्थ आहे असे सांगितले आहे. या संज्ञेमध्ये तो सर्वज्ञ आहे असे सुचविले आहे. ज्यावेळी ते परमतत्व मनुष्याच्या बुद्धिच्या माध्यमातून काम करते त्यावेळी त्याला बुद्धिमत्ता म्हणतात. या बुद्धिमत्तेची सखोलता आणि प्रत ज्या बुद्धिच्या माध्यमातून ते परमतत्व प्रकट होते त्या बुद्धिच्या अवस्थेवर अवलंबून आहे. गणितज्ञाची बुद्धिमत्ता, कवी अगर कलाकाराची बुद्धिमत्ता, शास्रज्ञ अगर राजकारणी व्यक्तीची बुद्धिमत्ता हे सर्व वेगवेगळे प्रकट झालेले बुद्धिमत्तेचे प्रकार त्या एका सर्वज्ञ बुद्धिमत्तेपासून आपले सामर्थ्य मिळवतात. श्रीमहाविष्णु हा सर्व बुद्धिमत्तेचा संग्रह म्हणजेच 'महाबुद्धि' आहे असे म्हटले आहे.
(१७४) महावीर्यः :  - सर्वश्रेष्ठ सारभूत तत्व. सर्व सृजनाचे सामर्थ्य म्हणजेच 'वीर्य' व त्याचे उगमस्थान आहे स्वतःच परमेश्वर कारण सर्व सृष्टिच्या सृजनाची प्रक्रिया त्याचे पासूनच सुरू होते, म्हणूनच त्या दैवी शक्तीला म्हटले आहे 'महावीर्य'.
(१७५) महाशक्तिः :  - 'सर्व शक्तिमान ' ह्या ठिकाणी शक्तिचा अर्थ सामर्थ्य असा आहे. जो परमात्मा क्रियाशक्ति, कामशक्ति व ज्ञानशक्ति ह्या तीन शक्तिंमधून प्रकट होतो त्या त्याच्या शक्तिही अत्यंत सामर्थ्यवान आहेत व त्या शक्तिंची केवळ एक क्रीडा म्हणजेच हा संपूर्ण सृष्टिव्यापार होय.
(१७६) महाद्युतिः :  - जो तेजःपुंज प्रकाशस्वरूप आहे असा. द्युति म्हणजे प्रकाश किवा शोभा. पूर्ण परब्रह्म हे सर्व प्रकाशक आहे. या सृष्टिला प्रकाशमान करणारे सूर्य, चंद्र, तारे अग्नि इत्यादि प्रकाशकही त्याच्याचमुळे प्रकाशमान होतात. इतकेच नव्हे तर तो स्वतःच एक तेजःपुंज स्वयंप्रकाश आहे व तोच आत्मस्वरूप महाविष्णु होय. मांडुक्य उपनिषदांत तो 'प्रकाशाचाही प्रकाश आहे ' असे वर्णन आलेले आहे. (४-९). तर बृहदारण्यकोपनिषदांत (६-३-९) ' तो स्वयंप्रकाशी आहे ' असे म्हटले आहे.
(१७७) अनिर्देश्यवपुः :  - ज्याच्या आकाराची (वपु) व्याख्या करता येत नांही, त्याचे वर्णन करता येत नाही, अगर विवेचन करतां येत नाही असा श्री महाविष्णु अनिर्देश्यवपु होय. सर्व सामान्य वस्तूंची आपल्याला व्याख्या करता येते, तिचे आपण वर्णन करूं शकतो अगर विवेचनही (निर्देश्य) करू शकतो कारण आपल्याला तिचा अनुभव येत असतो. आपण वस्तूंचे अनुभवजन्य ज्ञान शब्दामध्ये वर्णन करून सांगू शकतो. परंतु श्री महाविष्णु हे महत् तत्व आपल्या प्रत्येकामधील सारभूत असे आत्मतत्वच आहे. ते एक असे ज्ञान आहे ज्याच्या प्रकाशांत इतर ज्ञाने आत्मसात करता येतात. खरे पहाता कुठलेही ज्ञान 'प्रमाण' (प्रत्यक्षप्रमाण अगर अनुमान इत्यादि) उपयोगात आणून आत्मतत्वाचा शोध घेणे शक्य नाही. श्रीमहाविष्णूच्या ’अस्ति’ स्वरूपाची व्यक्तिगत अनुभूती होणे शक्य आहे. परंतु ती इतरांना सांगता येईल अशी ’कल्पना’ होऊ शकत नाही. अगर अनुभवता येईल अशी भावनाही होऊ शकत नाही किवा वर्णन करतां येईल अशी ती वस्तूही असू शकत नाही.
(१७८) श्रीमान् :  - श्री म्हणजे ऐश्वर्य. महाविष्णु नित्यशः माता लक्ष्मीशी संलग्न असल्यानें सर्व ऐश्वर्य त्याचे सेवेत तत्पर असते म्हणूनच तो 'श्रीमान्' आहे.
(१७९) अमेयात्मा :  - जे आत्मतत्व अमर्याद व प्रमाणांनी मोजता येण्यासारखे नाही ते (अमेय) तत्व श्री महाविष्णु होय. तो आत्मा क्षेत्रज्ञ स्वरूपात असल्यानें व क्षेत्राच्या प्रत्येक अणूरेणू मधून क्रीयाशील असल्यानें सर्व साधनांचा तोच ज्ञाता आहे. जीव रूपाने निर्माण झालेली ही असंख्य क्षेत्रे आहेत व त्यांची साधनेही असंख्य आहेत. त्या सर्वांमधून त्याचे अपरिमीत ऐश्वर्य व शक्ती सतत व्यक्त रूपाला येत असते.
(१८०) महाद्रिधृक् :  - जो विशाल पर्वतांना आधार देतो तो. पुराणांमध्ये दोन ठिकाणी अशातर्‍हेचे वर्णन आले आहे, जेथे त्याने पर्वतांनां उचलून धरले आहे किवा आधार दिला आहे. मंदार पर्वताच्या सहाय्यानें देव दानव क्षीरसमुद्राचे मंथन करीत असतां मंदार पर्वताची रवी खाली खाली जावून समुद्राच्या तळाशी गेली. त्यावेळी परमेश्वरानें प्रचंड कासवाचे रूप धारण करून मंदार पर्वत पाठीवर ऊचलुन धरला, देव दानवांनी मंथन पुन्हा सुरू केले व शेवटी अमृताची प्राप्ती करून घेतली.
     तसेच कृष्णावतारांत सामर्थ्यशाली गोपालकृष्णानें गाईचे रक्षण करण्याकरतां गोवर्धन पर्वत उचलून धरला होता. पुराणातील वरील दोन्ही कथांवरून असे दिसून येते की साधनेमध्ये साधकाच्या मनाला आधार देणारा परमात्मा 'महाद्रिधृक' आहे. अमृतत्वाचा अनुभव घेण्याकरतां साधक जेव्हा आपल्या दुग्ध सदृश पवित्र व भक्ति युक्त अंतःकरणाचे श्रवण मनन इत्यादीचे सहाय्यानें मंथन करत असतो तेंव्हा स्वतः श्रीविष्णु आपल्या दिव्यत्वानें साधकाच्या मन बुद्धि रूपी रवीला आधार देतात.

डॉ. सौ. उषा गुणे

No comments: