25 March, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक २२

अमृत्युः सर्वदृक् सिंहः संधाता संधिमान् स्थिरः ।
अजो दुर्मर्षणः शास्ता विश्रुतात्मा सुरारिहा  ।।
(१९८) अमृत्युः :  - ज्याला मृत्यु - क्षय ज्ञात नाही असा. जन्म, वृद्धी, क्षय, व्याधी व मृत्यु या पांच अवस्था अगर स्थित्यंतरे प्रत्येक सजीव व सान्त वस्तूंना अपरिहार्य आहेत. जे जे जन्मास येते ते ते विनाश पावतेच. ज्यास जन्म नाही त्यास अर्थातच मृत्युही नाही. समुद्रांत उत्पन्न होणार्‍या लाटा लय पावतात परंतु समुद्राचा लय होत नाही. प्रकृतीच्या निरंतर चालणार्‍या स्थित्यंतरामध्येही जो स्थित्यंतर रहित असतो तो 'श्रीमहाविष्णु'. भगवत् गीतेमध्ये श्रीकृष्ण आग्रहाने सांगतात, ' जो या परिवर्तनशील नामरूपामध्ये अपरिवर्तनिय असे पूर्णब्रह्म पाहू शकतो त्यालाच जीवनाचे ध्येय व अर्थ समजला. ( विनश्यत्सु अविनश्यन्तं यःपश्यति स पश्यति)
(१९९) सर्वदृक् :  - जो सर्व वस्तु पाहतो व जाणतो तो. प्रत्येक माणसाची जाणीव शक्ती त्याच्या सर्व कृतीमागील हेतु व विचार प्रकाशित करते. व तीच ज्ञान शक्ति सर्वकाळी सर्वसाक्षी असते. व तीलाच 'महाविष्णु' 'सर्वदृक्' असे संबोधिले आहे.
(२००) सिंह :  - जो नाश करतो तो सिंह. प्रकृती मधील सर्व परीवर्तन व विनाश ह्याच्या मागे असलेला एक समर्थ नियम स्वतःच परमात्मा आहे. जेव्हा शरीर मन व बुद्धि यांच्या पलिकडे जावून आपल्या अनुभव विश्वातील सर्व संवेदना, भावनां व विचार नाहीसे केले जातात, तेंव्हा जो अनुभव उरतो तो केवळ 'पूर्णब्रह्मच' होय.  या अद्वितीय श्रेष्ठ अवस्थेत दुसरा कुठलाही विषय समविष्ट होऊच शकत नाही. म्हणून ती सर्वलयावस्था म्हणूनच ओळखली जाते. जागृतावस्था ही स्वप्नावस्थेचा नाश करते, सुषुप्ती अवस्था जागृती व स्वप्नावस्थेचा नाश करते. तर परमात्म्याच्या साक्षात्काराची अवस्था ही तीनही जाणीवावस्थाचा नाश करणारी आहे म्हणूनच त्याला 'सिंह' म्हटले आहे. 'सिंह' हा शब्दही हिंसा ह्या शब्दातील अक्षरांची उलटसुलट मांडणी करून तयार झाला आहे.
     या संज्ञेचा अगदी स्पष्ट व सहज प्रतीत होणारा अर्थ असाही होईल की ' आपल्या अंतःकरणातील संसारवनाचा राजा सिंह म्हणजेच भगवान् महाविष्णू होय. त्या नारायणरूपी सिंहाच्या गर्जनेनें मनाच्या जंगलातील सर्व पाशवी वासना पलायन करतात. भगवत् गीतेतही स्वतःच्या विभूतींचे वर्णन करताना भगवांन श्रीकृष्ण म्हणतात, 'सर्व पशूंमध्ये त्यांचा राजा सिंह मीच आहे’ - मृगाणांच मृगेंद्रोऽहम् – गीता १०.३०.
(२०१) सन्धाता :  - सन्धि करणारा, नियमन करणारा. जो कर्म व त्याचे फल यांचा संधि वा संयोग घडवून आणतो तो. वस्तुतः कर्मफल दुसरे कांही नसून प्रत्यक्ष कर्मच (वेगळया स्वरूपांत) असते. कर्मफलाच्या नियमाप्रमाणे कर्मच विशिष्ठ कालानंतर कर्मफलांत परिवर्तित होते, व हा कर्मफल सिद्धांत स्वतःच श्रीविष्णू आहे. म्हणूनच त्याचे साधक त्याला सर्व कर्मांचे फल प्रदान करणारा ईश्वर मानतात. (कर्मफलदाताईश्वरः)
(२०२) संधिमान् :  - मनुष्याच्या व्यक्तिमत्वाची जडण घडण हे निसर्गातील एकअत्यंत शक्तिशाली व अद्‍भुत असे कार्य आहे. व त्याचे सर्व नियम तयार केले आहेत त्या परमात्म्याने, व तो स्वतःच नियम स्वरूप आहे. मन व बुद्धि मध्ये कार्यकारी असलेले ज्ञानयुक्त चैतन्य 'जीवात्मा' या स्वरूपांत प्रकट होते, व कर्मफलाच्या नियमाप्रमाणे सुखदुःखात्मक अनुभव घेते. याप्रमाणे तो परमात्मा केवळ कर्म फलदाताच आहे असे नसून सुखदुःखकारक कर्म फल भोक्ताही तोच होतो. म्हणूनच त्याच्याच पासून उत्पन्न होणार्‍या कर्मफलाच्या नियमामुळे तो स्वतःच बांधला गेल्याप्रमाणे (संधिमान्) वाटतो. खरे पाहतां तोच सर्व कर्मे करवितो (कर्माध्यक्ष), त्या कर्माचे ज्ञानही त्याच्याचमुळे होते, सर्व क्रियांचे नियमनही तोच स्वतः आहे व त्या पासून होणारा सर्व मानवांचा सर्वकालिक कर्मांचा अनुभव घेणाराही तोच आहे. मानवांच्या, विशेषतः आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा विचार करतां आपल्यातील दिव्य चैतन्य सर्व अनुभवांमध्ये उपाधिबद्ध, (संधिमान्) असल्याप्रमाणे वाटते. हा संधिमान जीव त्याच्या मूळ शुद्ध स्वरूपांत आहे 'श्री महाविष्णु'.
(२०३) स्थिरः :  - स्थिर, एकविध. जो स्वभावतःच सर्व कालांत स्थिर, एकविध आहे. विकार रहित आहे असा.
(२०४) अजः :  - अजन्मा. ज्याला जन्म नाही असा. ह्याच संज्ञेने ब्रह्मदेवाचाही निर्देश केला जातो. जो हिरण्यगर्भ ह्या स्वरूपाने या मायिक, विविधतापूर्ण जगताची उत्पत्ती करतो तो महाविष्णु.
(२०५) दुर्मर्षणः :  - ज्याचेवर प्रहार करतां येत नाही व ज्याला जिंकता येत नांही असा. प्रत्येक जीवाला आपल्या आयुष्यांत पूर्णता प्राप्त करून घेण्यासाठी परमेश्वराचे अस्तित्व मान्य करावेच लागते व त्याच्या प्राप्तीसाठी वाटचाल करावी लागते कारण तोच ध्येय स्वरूप आहे परंतु कांही अप्रगत मानवांमध्ये असे दिसते की तो पशुतुल्य मानव त्याच्यामधिलच दिव्य जीवनमूल्ये नाकारतो व त्या बरोबरच शांती व आनंद गमावून बसतो. इंद्रिय सुखाने मोहित होऊन व शरीर सुखाने भुलून तो कांही कालपर्यंतच्या क्षणभंगूर आनंदाचा अनुभव घेत राहतो. पण लवकरच अपरिहार्यपणे त्याला खर्‍या आनंदाच्या व पूर्ण समाधानाच्या शोधाकरतां श्रीविष्णूचे पाय धरावेच लागतात व शेवटी परमेश्वराचाच विजय होतो. परमेश्वरावर विजय मिळविण्यात मानवाला हार मानावीच लागते.
(२०६) शास्ता :  - जो सर्व ब्रह्मांडाचे नियमन करतो तो. तो सर्व नियमन करणारा आहे इतकेच नव्हे तर त्याचे पालनही करविणारा तोच आहे. आपल्याला शास्रनियमानुसार धर्मपथावर चालण्याचे अत्यंत उत्तम व समर्थ मार्गदर्शन तो करतो. त्याचवेळी सांस्कृतिक सौंदर्याच्या परिपूर्तीकडेही तो आपली पावले वळवितो व शेवटी उत्क्रांतीच्या सर्वोच्च स्थानापर्यंत आपल्याला नेऊन पोहोचवितो, ते पद आहे ’विष्णूपद’.
(२०७) विश्रुतात्मा :  - वेदामधील सर्व विख्यात व सर्वश्रुत अशी संज्ञा म्हणजे 'आत्मा'. व तिने श्री विष्णूचाच निर्देश केला जातो. ह्या विष्णूसहस्र नामावलीतील सर्व संज्ञा जरी श्री विष्णूच्या सगुणभक्तीकरतां उपयुक्त आहेत तरी या संज्ञेने मात्र हे स्पष्ट होते की, हिंदुधर्मग्रंथांना ज्याचे आख्यान करावयाचे आहे ते दुसरे कांही नसून 'पूर्णब्रह्मच' होय. शतविध सूचक लक्षणांच्या सहाय्याने त्या पूर्णब्रह्माची यशस्वी रीतीने व्याख्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. तसेच त्याच्या शब्दातीत स्वरूपाचे नकारात्मक विधानांनी (नेति-नेति) वर्णन करून तो ’जे’ नाही तेही स्पष्ट करण्याचा प्रयत्‍न केला आहे.
(२०८) सुरारिहा :  - (१) सुर - स्वर्गातील देव (२) अरि - शत्रू (३) हा - नाश करणारा. देवांच्या शत्रूंचा नाश करणारा तो परमात्मा सुरारिहा. स्वतःची उन्नत्ती करून घेणार्‍या साधकाच्या उन्नत मनाचे शत्रु म्हणजे शरीर व इंद्रियाच्या मागण्या, अहंकाराचे आग्रहपूर्ण प्रतिपादन व वासनारूपी व इच्छारूपी निशाचर. शुद्ध भक्तीने मन परीपूर्ण असेल तर तो परमात्माच साधकाच्या मनातील प्रतिकूल नकारात्मक विचार बाहेर घालवून नष्ट करतो व साधकाला आपल्या स्वतःवरच विजय मिळवायला मदत करतो म्हणून श्री नारायणच 'सुरारिहा' आहे.

डॉ. सौ. उषा गुणे

No comments: