09 March, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक १८

वेद्यो वैद्यः सदायोगी वीरहा माधवो मधुः 
अतींद्रियो महामायो महोत्साहो महाबलः  ।।
(१६३) वेद्यः :  - जे जाणण्यास योग्य आहे असे. गीतेच्या भाषेत त्यालाच 'ज्ञेय' असे म्हटले आहे. जे जाणले असतां सर्वाचे ज्ञान होते असे सर्वश्रेष्ठ ज्ञान. ''कस्मिन्नु भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवतीति ' (मुंडकोपनिषत् १-३ )
     सर्व शास्त्रे सत्याच्या शोध घेत आहेत. सर्व जड चेतन वस्तूंचे स्वरूप व कार्य त्यांचे निरीक्षण करतां करतां शेवटी त्या संशोधकांना सर्वामध्ये एकच एक सुसूत्र व सुसंगत अशा सत्याचे ज्ञान होते. त्याच सत्याच्या प्रेमपूर्ण बंधनांत सर्व सृष्टि संबद्ध झालेली पाहून सत्यान्वेषी साधक अर्थातच प्रथम स्थूल व कालांतराने सूक्ष्म स्तरांचा त्याग करतो. शेवटी कारणरूप घटकांचाही त्याग केल्या नंतर त्याला त्याच एकत्वाचा प्रत्यय येतो, ज्याचा तो शोध घेत असतो; ते त्याच्या व्यक्तिमत्वाच्या अंतर्यामी असलेलेच 'आत्मतत्व' आहे असा शेवटी साक्षात्कार होतो. ते अंतिम ध्येय, म्हणजेच जे जाणले असतां इतर सर्व ज्ञात होते' ते सर्व समावेशक ज्ञान म्हणजेच परमात्मा 'वेद्य' आहे. व तोच श्री महाविष्णु होय.
(१६४) वैद्यः :  - सर्वश्रेष्ठ चिकित्सक, जगाची अहंकार व अहंकेंद्रित अज्ञानातून निर्माण होणारी दुःखे, व्याधी नाहीशी करणारा महान् चिकित्सक तोच आहे. तसेच जो सर्व विद्यांचा स्वामी आहे त्यालाही वैद्य असे संबोधिले जाते.
(१६५) सदायोगी :  - परमात्म्याचे बरोबर 'एकत्व'. संभ्रमित व संमोहित झालेल्या व्यक्ती जेव्हा स्वतःला प्रकृतीच्या (मायेच्या) अज्ञानावरणांपासून सोडवून घेण्याचा प्रयत्न करीत असतात व स्वतःची अनंत परमतत्वाशी एकरूपता करण्याचा प्रयत्न करतात तेंव्हा त्या प्रक्रियेला 'योग' असे म्हणतात. परमेश्वराशी ’एकात्मता’ साधण्याचा अथक प्रयत्‍न म्हणजे योग. साधकाचे दृष्टीने त्याचे ध्येय स्वरूप जो परमात्मा तो नित्यशः योगवृत्ती मध्येच असणार म्हणून त्याला 'सदायोगी ' ही संज्ञा दिली आहे.
(१६६) वीरहा :  - जो बलिष्ठ वीरांचा नाश करतो तो. जेव्हा सामर्थ्यवान व पराक्रमी व्यक्ती उद्धट बनतात व जुलूम करू लागतात तेंव्हा त्या राक्षसांचा नाश करण्याकरतां परमेश्वराला आविर्भूत व्हावे लागते. त्यामुळेच धर्माचे व सज्जनांचे रक्षण होते.
(१६७) माधवः :  - ही संज्ञा यापूर्वी ७२ क्रमांकावर आली असतां आपण तिचे विवरण लक्ष्मीचा पती असे केले होते. परंतु 'मा' या शब्दाचा केवळ 'लक्ष्मी' हा एकच अर्थ नसून तिचा 'विद्या' असाही अर्थ होतो. धव म्हणजे पती. सर्व विद्यांचा स्वामी - माधव.
     जो साधकांना साक्षी भाव व ध्यान धारण करण्यास मदत करतो तो माधव. अर्थात माधव ह्या शब्दाचे असेही विवरण करता येईल.[1]
     एकाद्या वस्तूच्या अस्तित्वाची जाणीव होणे म्हणजेच त्या वस्तूचे ज्ञान होणे. आत्मा हा 'सत्' म्हणजे अस्तित्वही आहे व त्याची जाणीही आहे (स्फुरण) म्हणून श्रीविष्णू सर्वज्ञानांचे उगमस्थान आहे. अर्थात सर्व विद्यांचा स्वामी आहे. हरिवंशात म्हटले आहे, ' हे हरि तू सर्व ज्ञानाचा स्वामी आहेस म्हणूनच तुला 'मा-धव' ह्या नांवाने संबोधिले जाते.
(१६८) मधुः :  - मधु हा शब्द सामान्यतः 'मध' ह्या अर्थी वापरला जातो. तसेच 'अमृत' ह्या अर्थीही या शब्दाचा वापर होतो. भक्तांच्या अंतःकरणात जो अमृतमय आनंद निर्माण करतो त्यालाही 'मधु' म्हटले जाते. हिंदुस्थानांत वसंत ऋतु हा मधुमास म्हणून ओळखला जातो. या ऋतुमध्ये फुलांना बहर येतो व ती मधाने परिपूर्ण होतात. त्यामुळे किटकांपासून मनुष्यांपर्यंत सर्वांना आनंददायक असा हा काल असतो. चैत्र महिना हाही 'मधुमास' ह्या नांवाने ओळखला जातो. हा महिना सर्व तर्‍हेची व्रते, पूजा व ध्यानाकरितां पवित्र मानला जातो. त्यास माधव-मास (एप्रिल व मे महिना) असेही म्हणतात. त्याचप्रमाणे वैशाख मास हा विष्णू पूजनाकरतां अत्यंत पवित्र आहे असे वैष्णव मानतात.
(१६९) अतीन्द्रियः :  - जो सर्व ज्ञानेंद्रियांचे पलिकडे आहे तो. ज्ञानेंद्रियांना 'विषय' या स्वरूपांत तो ज्ञात होऊ शकत नाही इतक्याच मर्यादित अर्थानें ही संज्ञा वापरली नसून तो ज्ञानेद्रियांपेक्षा व त्यांच्या कार्याहूनही भिन्न आहे म्हणून तो अतीन्द्रिय आहे. इंद्रियांना त्यांचे सर्व सामर्थ्य व चैतन्य देणारा तोच असूनही तो केवळ अस्तित्व मात्र आहे. ज्ञान करून घेणार्‍या व्यक्तीमधील ज्ञाता तो आत्माच आहे. म्हणून ज्ञान करून देणारी साधने (ज्ञानेद्रिये) भावना अगर विचार ह्यांच्या सहाय्याने त्याचा अनुभव घेऊ शकत नाहीत. सर्व जीवनाचे उगमस्थान आहे 'श्री महाविष्णु'. कठोपनिषद म्हणते (५-१३) तो शब्दरहित, अस्पर्श, निराकार, निर्विकार आहे तसेच रसरहित गंधरहित आहे.
(१७०) महामायः :  - जो मायेचा सर्वश्रेष्ठ स्वामी आहे असा, वैचित्र्यपूर्ण प्रकृतिचा प्रत्यक्ष आधार तोच आहे. त्याच्याच सहाय्याने तिची सर्व लीला चालते व ही अनंतकाल चालणारी अत्यंत मनोहारी क्रीडा त्या ज्ञानसूर्याच्या प्रकाशातच चालते. परमात्मा हा मायेच्या लीलेच्या पलिकडे अलिप्त आहे. तरीही मायेची लीला त्याच्याच दिव्य अस्तित्वाने, त्याच्याच महान ऊर्जेने चालते. सूर्य हा सर्व मेघांचा स्वामी आहे. कारण त्याच्याच अस्तित्वामुळे त्याच्यापासून उष्णता घेऊन पाणी आपल्या गुणधर्मा प्रमाणे वाफेत रूपांतरीत होते. वाफेची घनता वातावरणातल्या वायूंपेक्षा कमी असल्यामुळे स्वभावतःच ती आकाशांत उंच जाते व तेथे मेघांच्या रूपाने एकत्र होते. जास्त अुंचीवर वातावरणाचे तपमान स्वभावतःच कमी असते त्यामुळे थंड होऊ लागलेली वाफ पुन्हा पाण्यात रूपांतरीत होते. अर्थातच जास्त घनता प्राप्त झाल्याने हे पाणी पर्जन्य रूपाने खाली उतरते. या उदाहरणामध्ये सूर्याला मेघांचा 'कर्ता' म्हणता येईल, तसेच पर्जन्याचेही कारण सूर्यच आहे. म्हणूनच सर्व ऋतुंचा स्वामी सूर्यच आहे असेही म्हणता येईल. ह्या सर्व घटनाक्रमामध्ये सूर्याचे अस्तित्व असूनही तो अलिप्तच आहे.
     त्याचप्रमाणे त्या पूर्णब्रह्म परमेश्वराला या संज्ञेत ' मायावी' महान जादूगार' म्हटले आहे. कारण त्याच्याच अधिकाराने, सत्तेने मायेची जादू चालते. भगवान् श्रीकृष्ण स्वतःच गीतेमध्ये सांगतात, माझी माया पार करणे खरोखरच दुरापास्त आहे. ( मम माया दुरत्यया - गीता ७-१४)
(१७१) महोत्साहः :  - जो अत्यंत उत्साही आहे असा. सतत कार्यरत व प्रत्येक कार्य पूर्णतेस नेणारा. आपण ज्या जगामध्ये रहातो ते जग वस्तुतः जन्म - मृत्युची शृंखला आहे. उत्पत्ती, स्थिती व लय ह्या त्याच्या शक्तिंची कार्ये म्हणजेच हे जन्म मृत्युचे जग होय. त्या महान सामर्थ्ययुक्त परमात्म्याच्या अमर्याद उत्साहाखेरीज त्या आश्चर्यकारक जगाचे अस्तित्वही अशक्य आहे. सागराकडे पाहतांना केवळ त्याच्या लाटांकडेच लक्ष दिले तर सागर म्हणजे एक अखंड विश्रांतीरहित पाण्याची खळबळ असे त्याचे स्वरूप जाणवते. त्याचप्रमाणे या ऐहिक जगतातले आपणांस अनुभवास येणारे वैचित्र्य व त्यातील सतत होणारे बदल हे केवळ त्याच्याच अखंड व अपरिमित उत्साहामुळे दिसत आहे. या दृष्टिनें त्या महाविष्णुकडे पाहतां 'महोत्साह' ही त्याला दिलेली संज्ञा अत्यंत अर्थपूर्ण वाटते.
(१७२) महाबलः :  - अमर्याद सामर्थ्य असलेला. तो सर्वशक्तिमान असल्यानें सर्व जीवमात्रांमधील शक्तिंचे उगमस्थान तोच आहे असे दिसते. आपल्या प्रत्येका मध्ये असलेले सामर्थ्य हे त्याच्याच सामर्थ्याचे प्रतिबिंब आहे. अर्थात ते बिंब अमर्याद शक्तीमान असल्यानें त्याला 'महाबल' ही संज्ञा दिली आहे.

डॉ. सौ. उषा गुणे


[1]   ' मा- मनन, ध - ध्यान आणि व - योग = माधव.

No comments: