03 May, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ३२

भूतभव्यभवन्नाथः पवनः पावनोऽनलः ।
कामहा कामकृत् कान्तः कामः कामप्रदः प्रभुः ।।
(२९०) भूतभव्यभवन्नाथः :  - जो भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ या तीनही काळांचा स्वामी आहे असा. ज्याच्याच केवळ उपस्थितीमध्ये काळाची संकल्पना शक्य आहे तो एकमेव काळाचा स्वामी आहे. दोन विचारांच्या मधील अंतराय त्यालाच काळ असे म्हटले आहे. या विचारांच्या उत्पत्ति व लयाचा जो अलिप्त साक्षी आहे तोच काळाचा स्वामी आहे. वस्तुतः तीनही काळात ज्यांचे अस्तित्व आहे त्या सर्वांचा तोच स्वामी आहे म्हणून काळानी नियंत्रीत झालेले सर्व प्राणीमात्र त्यालाच सुखशांती व संरक्षणाकरता सतत प्रार्थना करतात.
(२९) पवनः :  - जो सर्व पावन करतो तो 'पवन' किवा जो प्राणदायी वातावरणाचे रूपाने स्वतःस प्रकट करून सर्व अस्तित्वाला आधारभूत झालेला असा पवन 'श्रीविष्णू'.
(२९) पावनः :  - मागच्या पवन या संज्ञेच्या स्पष्टीकरणामध्ये आपण पाहिलेच आहे की परमेश्वर पवन - वायू ह्या स्वरूपांत सर्व जगतांस व्यापून राहिला आहे. तसेच तो प्राणवायू देऊन जगतातील सर्व प्राणीमात्रांच्या जीविताचे संरक्षण करीत आहे. आता पावन ही संज्ञा असे सुचविते की प्राणवायूलाही प्राण संरक्षणाची शक्ति ज्याच्यामुळे प्राप्त झाली तो 'पावन' परमेश्वर श्रीविष्णु होय. सतत हलणारी हवा ही इतर सर्व घटकांपेक्षा चांगल्याप्रकारे वातावरण शुद्ध करू शकते हे सर्व ज्ञातच आहे. ही शुद्धीकरणाची शक्ति त्याच्याच कृपेमुळे वायुला प्राप्त झाली आहे. थोडक्यात वायूस प्राणशक्ति देणारी गूढ अगाध शक्ति तोच आहे व वायूला कार्यकारी करणारी, हलवणारी शक्ति तोच आहे.[1]
(२९) अनलः :  - अग्नि. जो अग्नि स्वरूपाने सर्व प्राण्यांचे जीवन धारण करतो तो श्री विष्णु. जीवनाच्या अस्तित्वाकरतां कमीतकमी कांही उष्णतेची आवश्यकता असते. ही उष्णता मनुष्याच्या शरीरांतील असेल किवा पृथ्वीच्या उदरांतील असेल. जीवनावश्यक उष्णता ह्या बाह्य जगतामध्येही आहे तशीच ती प्राणीमात्रांच्या शरीरांतर्गत आहे व तिच्यावाचून जीवांचे अस्तित्व राहूच शकणार नाही म्हणूनच हा जीवनदायी 'अग्नि' दुसरा कोणी नसून तो आहे स्वतः श्रीविष्णु. त्यालाच अनल असे संबोधिले आहे. दुसरा अर्थ असा होईल की, ' अन्' ह्या पदाचा अर्थ आहे प्राण व 'ल' पदाने त्याचे ग्रहण सुचविले आहे. म्हणून जो प्रत्यक्ष प्राणांची जीवीत्वशक्ति धारण करणारा आत्मा आहे तो परमात्मा श्रीविष्णू.
(२९) कामहा :  - जो सर्व कामना नष्ट करतो तो. कामनांचे उत्सर्जन वासनांमधून होत असते. ज्यावेळी आपण वासनांचे पलीकडे जावू शकतो तेव्हाच आत्म्याची प्रतीती येवू शकते. ज्याप्रमाणे सूर्य रात्रीचा अंधकार नष्ट करतो त्याप्रमाणे शुद्ध चैतन्य आणि वासना एकाच ठिकाणी एकाच वेळी राहूच शकत नाहीत. ज्यावेळी आत्मानुभुती येते तेंव्हा वासना नष्ट होतात. भक्ताच्या दृष्टिकोनातून पाहतां त्याच्या सर्व वासना पूर्णतेला नेणारा. किंवा कामदेव म्हणजेच मधुम्नाचा पिता व हेही श्रीविष्णुच्या अनेक नामांपैकी एक नाम आहे.
     मनुष्याच्या आयुष्यात जे अनंत दुःखाचे स्रोत आहेत त्या सर्वांचे मुख्य उगमस्थान आहे वासना किवा कामना. जेव्हा वासना मनांत उद्भवते तेंव्हा दोनच पर्याय आपल्यापुढे असतात. एक ती पूर्ण करणे किवा न करणे. जर आपली वासना पूर्ण झाली तर माणसाचे मन साहजिकच पुन्हा त्याची अपेक्षा धरते व हाव वाढल्यामुळे ते सतत अस्वस्थ रहाते. दुसर्‍या बाजूने पहातां जर वासनापूर्ती झाली नाही तर राग उफाळून येतो. ही क्रोधावस्था माणसाचे मन संभ्रमित करते. ह्या संभ्रमामुळे स्वतः व इतर व्यक्ति अगर इतर बाह्य परिस्थिती, जशी आहे तशी न दिसता त्याच्या विपरित त्याला प्रतितीस येत रहाते. अशा संभ्रमित व्यक्तिचे सर्व ज्ञान गळून पडते व त्याची विवेकबुद्धि नीट काम करू शकत नाही. त्यामुळेच त्याने पूर्वी जपलेल्या आर्दशाच्या तुलनेत प्राप्त परिस्थितीचे मूल्यमापन त्याला योग्य रीतीने करता येत नाही. जेव्हा तर्कशुद्ध विवेकबुद्धि नष्ट होते तेंव्हा त्याचा मनुष्यत्वाचा गौरव पूर्ण नष्ट झालेला असतो, व तो पशूहूनही नीच अवस्थेला पोहोचलेला असतो. अशा तर्‍हेने व्यक्तिच्या होणार्‍या बौद्धिक अधःपतनाचा आलेख गीतेमध्ये वर्णिलेला आहे व ही संपूर्ण आत्मघाताची शृंखला वासनेतून निर्माण होते असे सांगीतले आहे. जेव्हा भक्त अगर साधक त्याच्या अंतर्यामी असलेले हे निखळ सत्य जाणून घेतो, त्याची अनूभूती घेतो तेंव्हा तो आपल्या सर्व वासना व कामनांच्या पलीकडे जातो. त्यामुळेच त्या महान अंतरात्म्याला सर्व कामनांचा नाश करणारा 'कामहा' असे येथे म्हटले आहे. तोच एक आपल्या भक्तांच्या सर्व कामना पूर्णकरतो त्यामुळे त्यास आत्मतृप्त शांत व आनंदाच्या अवस्थेचा अनुभव येतो.
(२९) कामकृत् :  - जो सर्व कामना पूर्ण करतो तो. या संज्ञेच्या मतीतार्थाचे विवरण या पूर्वीच्या संज्ञेमध्ये झालेले आहे. कामकृत् या संज्ञेचा दुसरा अर्थ असा होतो की ' जो कामदेवाचा किवा प्रेमदेवतेचा निर्माता आहे असा. जरी वासनामय कारण देहापासूनच सर्व कामनांचा उद्भव असला तरी आत्मसत्तेच्या चैतन्यदायी स्पर्शावाचून वासना सुद्धा स्वतःस व्यक्त करूच शकत नाहीत. त्यादृष्टीने पाहता वासनांची अभिव्यक्तीही त्याच्याच कृपेने होऊ शकते. म्हणूनच त्याला 'कामकृत' असे म्हटले आहे.
(२९) कांतः :  - ज्याचे स्वरूप अत्यंत मनोहर आहे असा. असीम सौंदर्य हेच आत्म्याचे स्व-रूप (स्वभाव) आहे. उपनिषदांनी तर त्याची व्याख्याच 'शांतं शिवं सुंदरम्' अशी केली आहे. मनुष्याच्या सौंदर्य भावनेला सुसंगतीची अत्यंत अपेक्षा असते. ज्या ठिकाणी ह्या सुसंगतीचा अत्यंत उत्कट अनुभव येतो तेथेच सौंदर्याची अनुभूती येते. अशा सौंदर्यापुढे बुद्धिनिष्ठ मनुष्याचेही व्यक्तीमत्व अत्यंत शांत व निश्चल होते. सौंदर्यानंदामध्ये मग्न होऊन निःशब्द होते. अशाच दिव्य क्षणामध्ये ध्यान करणारा साधक आपल्या सर्व कोषामधून पार होतो व शुद्ध चैतन्याशी एकरूपता पावतो. अर्थातच त्या बुद्धिनिष्ठ मनुष्याचे व्यक्तीमत्वही अत्यंत शांत व स्थिर होते. म्हणूनच ह्याठिकाणी आत्म्यालाच 'कांत' अशी संज्ञा दिली आहे. विशुद्ध सौदर्याची दिव्य पवित्र अभिव्यक्ती म्हणजेच 'श्रीविष्णु'.
(२९) कामः :  - जो प्रेमास्पद आहे असा 'श्रीविष्णु'. तो केवळ भक्तांचाच प्रेमास्पद असतो असे नाही तर सर्व प्राणीमात्रांच्या सर्व प्रवृत्ती त्याचे प्रेम व सौख्य मिळवण्याकरताच कार्य प्रवृत्त होत असतात. सर्व सजीव प्राण्यांचे जीवनातील ध्येय आनंदस्वरूप आत्मा हेच असते. अगदी नगण्य असा एकपेशीय प्राणीसुद्धा दुःखाविरूद्ध बंड पुकारतो व सुखासाठी प्रयत्न करतो. मनुष्यही त्याला अपवाद नाही. इंद्रिये - मन - बुद्धि यांची कक्षा ओलांडून गेले तरच जे सुख अनुभवाला येते त्याच असीम सुखाची आशा विश्वातील प्रत्येक प्राण धारण करणार्‍या सजीवाला असते. परंतु सर्व कामना तृप्त करणार्‍या त्या परमानंदाचे अज्ञान असल्यामुळे जग दुःखात सापडते. तो परमात्मा भक्तांचा अत्यंत प्रिय असतोच परंतु जे त्याला नाकारून इंद्रिय विषयांच्या मागे धावतात त्यांचाही तो प्रिय असतो. अस्तिक त्याचा भक्तिने, ध्यानानें शोध घेतात. नास्तिकही त्याचाच शोध घेतात परंतु तो त्यांच्या इंद्रिय ज्ञानातून अत्यंत तत्परतेनें घेतलेला शोध असतो.
(२९) कामप्रदः :  - जो इच्छित वस्तूंची प्राप्ती करवून देतो तो. सर्व इच्छा पूर्ण करतो तो. भक्तांच्या सर्व इच्छा परमात्मा पूर्ण करतो. ध्यान साधकाच्या दृष्टिने परब्रह्म अशी अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये सर्व वासना पूर्ण झालेल्या असतात. कारण परब्रह्माच्या दिव्य अनुभूतीनंतर कुठल्याच वासना मनांत रेंगाळत नाहीत.
(२९) प्रभुः :  - तो श्वर आहे तोच स्वामी आहे. तोच सत्तावान आहे, तोच मालक आहे.. ज्याचे पाशी (कर्तुं) 'करणे' (अकर्तुं) न करणे किवा (अन्यथा कर्तुं) 'अन्य प्रकाराने करणे ह्या सर्व शक्ती एकवटल्या आहेत तो श्रीविष्णु.[2]
डॉ. सौ. उषा गुणे.


[1]   भीषाऽस्माद् वातः पवते । - ज्याच्य भयाने वायू वाहतो (तैत्तिरीय उप.)
[2]   गतिर्भर्ता प्रभुः साक्षी.

No comments: