07 May, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ३३

युगादिकृत् युगावर्तो नैकमायो महाशनः  ।
अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजिदनन्तजित्  ।।
(३००) युगादिकृत :  - पुरांणामध्ये असे वर्णन आहे की ज्याने कालाची युगामध्ये विभागणी केली तो ही युगे चार आहेत - कृत, त्रेता, द्वापार व कली. या प्रकारे तो कालाचा स्वामी आहे. आदि या शब्दानें कालाची सर्व विभागणी, शतके, वर्षे, महिने, आठवडे, दिवस, तास व मिनीटेही त्यांत अंतर्भुत आहेत. तो या युगांचा कर्ता आहे इतकेच नव्हे तर तो ज्या जाणीवेमध्ये प्रत्येक अनुभव, त्याचा काल व दोन अनुभवांमधील कालाचे अंतर हे सर्व प्रकाशमान होते, प्रतीत होते त्या जाणीवेचाही प्रकाशक आहे.
(३०) युगावर्तः :  - मागच्या संज्ञेमध्ये परमात्म्याचे 'सर्व युगांचा कर्ता' असे वर्णन आले आहे. या संज्ञेमध्ये 'सतत परिवर्तन व पुनरावर्तन असणार्‍या कालचक्राला गतीमान करणारी शक्तिेही तोच आहे' असे वर्णन आहे. त्याचाच अर्थ असा की तो कालाचा स्वामी आहे इतकेच नव्हे तर त्या कालामध्ये घडणार्‍या घटनांचा शक्तिमान् नियामक व त्या सतत वाहणार्‍या काल प्रवाहाच्या मागचे तत्वही तोच आहे.
(३०) नैकमायः :  - ज्याने स्वमायेने धारण केलेले आकार अनंत आहेत व चित्रविचित्रही आहेत असा श्रीविष्णु. जगत्पालनाकरीता, जगताची व्यवस्था व गती रक्षण करण्याकरतां त्या त्या कालाच्या आवश्यकतेनुसार परमेश्वरानें वेगवेगळे आकार धारण करून ह्या जगतात अवतरण केले असे पुरांणांमधून वर्णन आले आहे, असे १० अवतार आहेत. परमेश्वराच्या त्या शक्तिमान् अवतारांतही वैशिष्ठ्यपूर्ण अशां 'श्रीराम' व 'श्रीकृष्ण' या व्यक्तिमत्वांमुळे वेगवेगळया प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये वेगवेगळे दृष्टीकोन व भावना उत्पन्न झाल्या असेही आपणांस वाचावयांस मिळते. थोडक्यांत ज्याने आत्मतत्वाची अनुभूती घेतली आहे त्याला वासनांचे अस्तित्व बद्ध करूं शकत नाही, व त्यांच्या सहित तो लीलया आपले व्यवहार करूं शकतो. कारण त्याने आपल्या वासनांवर स्वामीत्व प्रस्थापित केलेले असते.
     माया, जिचे दुसरे नांव अविद्या असेही आहे तिची उभारणी वासनेतूनच झालेली आहे. व त्यातूनच आपल्या कारण देहाची उत्पत्ती होते. जो या सर्वाच्या पलीकडे जातो तोच त्या परमात्म्याला जाणू शकतो. मायेला परमात्म्याजवळ अस्तित्व नाही. तो मायातीत आहे. व आपल्यासारखे एकाकी व्यक्तित्व मायेच्या जुलमाला बळी पडते. जो स्वतःच्या कार्याकरतां मायेच्या पाशामध्ये बद्ध न होतां मायेचा उपयोग करून घेतो तो ' नैकमाय ' श्रीविष्णु होय.
(३०) महाशनः : -[1] ज्याचा आहार फार मोठा आहे तो अशी या संज्ञेची फोड करता येईल. व्यक्तिच्या वासनांमधून उत्पन्न होणार्‍या प्रत्येक स्तरावरील विचार, भावना, संवेदना या सर्वांचा तो स्विकार करतो. आहार करतो तो. परंतु समाधीमध्ये जेव्हा बद्ध अहंकाराचा लय होतो व परतत्वाची अनुभूती येते तेंव्हा वासनांचे हे सर्व व्यक्तिकरण (व्यक्तता) त्या अनंत अनुभूतीमध्ये जणू कांही गिळलेच जाते. म्हणूनच त्या महाविष्णूला 'जो सर्वांचे 'अशन' करतो तो महाशन अशी संज्ञा दिली आहे.
(३०) अदृश्यः :  - इंद्रिये - मन - बुद्धि यांच्या सहाय्याने आपण बाह्य जगताचे व आपल्या स्वतःच्या विचार भावनांचे ज्ञान करून घेतो. परंतु ते परमसत्य आपल्या ज्ञान ग्रहण करणार्‍या इंद्रियांच्या अगर जाणीवेच्या कक्षेमध्ये येत नाही. ते अंतस्थानी आहे व त्या शास्वत तत्वामध्ये बाह्य ज्ञानग्रहणाच्या साधनांना व बाह्य विषयांना कांहीही स्थान नाही. ते आत्मनिष्ठ सत्य स्वरूपतः ज्ञानेंद्रियांचा विषय होऊ शकत नाही म्हणूनच त्याला अदृश्य म्हटले आहे, तो स्वतःच सर्व अनुभवांचे ग्रण करणारा 'ज्ञाता' आहे.
(३०) व्यक्तरूपः :  - ज्याने व्यक्त आकार धारण केला आहे असा. ध्यानावस्थेमध्ये साधकास या आकाराची स्पष्टपणे प्रतीती येते. या संज्ञेतील विरोधाभासानें जी बुद्धिची कोंडी होते ती मुख्यतः या संज्ञेच्या स्थानामुळेच होते. यापूर्वीच्या नामांने आपणास असे सुचविले आहे की तो परमात्मा 'अदृश्य' आहे व पुढच्याच संज्ञेने स्पष्टपणे सांगितले आहे की तो 'दृश्य' आहे ! ह्याचा अर्थ असा की ' जरी तो इंद्रियाच्या साधनांनी प्रतीत होत नसला तरी योगी जेव्हा इंद्रियातीत अवस्थेत जातो तेंव्हा आत्म्याच्या दिव्यानुभूतीचा साक्षात्कार त्याला होतो. जरी सामान्यतः त्याला पाहणे सुलभ नसते तरी भक्तांच्या हृदयांत प्रभू क्रीडा करतात व त्या दिव्यानंदात भक्त वेडे होऊन जातात.
(३०) सहस्रजित् :  - जो सहस्रावधींना जिंकतो. सत्प्रवृतीच्या साधूंचा नाश करण्याकरतां अनेक उपाय योजणार्‍या सैतानी प्रवृत्तींचा, राक्षसांचा नाश करण्याकरतां परमेश्वर अवताररूपानें व्यक्तदशेस येतो असे पुरांणात सर्वत्र वर्णन आढळते. जो अशा सैतानी प्रवृत्तीवर विजय मिळवितो तो विष्णू. आसक्ति, हांव, मत्सर, आधाशीपणा ह्या दुर्गुणांची झुंड ज्यावेळी व्यक्तीच्या आंतरिक विश्वावर आक्रमण करते आणि साधकाची सर्व शांतता, समत्व नष्ट करते तेव्हा त्या सर्वाचा नाश ह्या श्रेष्ठ परमात्म्याकडून केला जातो म्हणूनच त्याचा उल्लेख मनुष्यांच्या सर्व नीच प्रवृत्तीवर नेहमीच विजय मिळविणारा - सहस्रजित - असा केला जातो.
(३०) अनंतजित् :  - निरंतर विजयी होणारा. परमेश्वर हा नित्य विजयी आहे. [2]प्रत्येक अवताराध्ये तोच शेवटी विजयी होतो. नकारात्मक नीच प्रवृत्तीवर तेव्हाच कायमचा विजय मिळवला जातो जेव्हा त्या उच्चतम परतत्वाची अनुभूती येते. म्हणूनच त्याला अनंतजित म्हटले आहे.
डॉ. सौ. उषा गुणे.


[1]   महत् अशनं यस्य स:
[2]   उपनिषद् सांगते – ’सत्यमेव जयते, नानृतम्’ – नेहमी सत्याचाच विजय होतो, असत्याचा कधीही नाही.

No comments: