19 May, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ३६

स्कन्दः स्कन्दधरो धुर्योवरदो वायुवाहनः
वासुदेवो बृहत्भानुरादिदेवः पुरन्दरः ।।
(३२) स्कन्दः :  - भगवान् शंकरांचा धाकटा मुलगा 'सुब्रह्मण्य' ह्याचा उल्लेख स्कन्द या नांवाने केल्याचे आपणांस पुराणामध्ये आढळते. तसेच तो सत्‌शील देवांचा सेनापती असल्याचेही वर्णन आहे. त्याचाच अर्थ असा की सुब्रह्मण्याचे (स्कन्दाचे) द्वारा परमात्म्यांचा गौरव व्यक्त झाला आहे. म्हणून त्यालाच स्कन्द असे नांव पडले. साधकाच्या व्यक्तित्वाचे सर्व स्तर (घटक) एकरूप (एकाग्र) होणे ही स्थिती परमसत्याची प्रतीती येण्यास अत्यंत आवश्यक मानली जाते.
(३२) स्कन्दधरः :  - जो विस्कळीत झालेल्या धर्माचे पुनरूज्जीवन करतो ( आधार देतो ) तो स्कन्दधर, किवा जो सुब्रह्मण्याचे पितृस्वरूपांत व्यक्त झाला तो परमेश्वर - स्कन्दधर.
(३२) धुर्यः :  - जो सर्वांची धुरा वाहतो तो भगवान् विष्णु धुर्य आहे. विविधतापूर्ण अशा विश्वाच्या उत्पत्ति-स्थिती-लयाची सर्व जबाबदारी - धुरा जो स्वतः वहातो व जो हे कर्मचक्र अत्यंत बिनचूकपणे, कुठेही अडखळतां सहस्रावधि वर्षे चालू ठेवतो तो आहे श्री नारायण.
(३३०) वरदः :  - आपल्या निष्ठावान् भक्तांच्या इच्छा पूर्ण करून त्यंाना प्रसन्नतेने 'वर' प्रदान करतो तो 'वरद'. दुसरा अर्थ, जे अत्यंत निस्पृहपणे व शुद्ध विवेकबुद्धिनें त्याला पहाण्याला प्रयत्न करतात त्यांना जीवनांतील श्रेष्ठ 'वरदान' देतो तो वरद.
(३३) वायुवाहनः :  - जो वायुचे नियमन करतो, त्याला ताब्यात ठेवतो व त्याला गतीही देतो तो 'वायुवाहन'. [1] अंतरिक्षातील वायुच्या गती सात प्रकारच्या असतात व त्यांना 'सप्तमरूत' म्हणतात असे संस्कृत साहित्यात वर्णन येते. थोडक्यात वायुचे दुर्दम्य सामर्थ्य, गती व प्राण रक्षक शक्ति या सर्व त्याला मिळालेल्या परमात्म्याच्या उदार देणग्याच आहेत म्हणूनच श्री विष्णुचे हे नामानिधान - 'वायुवाहन'
(३३) वासुदेवः :  - जो एक समयावच्छेदेकरून 'वासु' ही आहे व देवही आहे तो वासुदेव. वासु म्हणजे जो सर्व सजीव प्राणीमात्रांच्या शरीरामध्ये शरीरामध्ये, स्थायिक होतो तो (जीव). देव म्हणजे प्रत्यय आणून देतो अगर प्रकाश देतो तो. अर्थात वासुदेव म्हणजे जो सजीवांच्या शरीरामध्ये जणूबद्ध झाल्याप्रमाणे रहातो. त्याचवेळी प्रत्येक अनुभव प्रकाशित करणार्‍या चैतन्य स्वरूपांतही उपस्थित असतो तो वासुदेव. परमेश्वराचे अस्तित्व जगतातील प्रत्येक[2] वस्तुमध्ये आहे व त्याच वेळी तो सर्व जगताचा आधारही आहे.
     दुसरा सरळ अर्थ असा होतो की - जो कंसाच्या कारागृहात वसुदेवाचा मुलगा म्हणून जन्माला आला तो वासुदेव. वृंदावनातील घनःश्याम कृष्ण. तो मायेच्या आवरणानें स्वतःस झाकून ठेवतो म्हणून तो वासुदेव. 'देव' या शब्दाचा अर्थ जो क्रिडा करतो, जो जिंकण्याची इच्छा करतो (विजिगिषु) जो संचालन करतो, जो प्रकाशतो, जो उत्पन्न करतो, जो गतीरूप आहे. महाभारतातील उद्योगपर्वात वर्णन आले आहे की 'सूर्यकिरणांच्या प्रकाशाप्रमाणे मी सर्वजीवांना व्यापून टाकतो म्हणून मला 'वासूदेव' असे म्हटले जाते. विष्णुपुराण म्हणते, 'तो सर्व ठिकाणी व सर्वांचे अंतर्यामी रहात असल्यानें त्याला वासुदेव असे म्हटले जाते. सर्व प्राणीमात्र त्या परमत्म्यामध्ये रहातात व तो सर्वांमध्ये रहातो म्हणून त्या सर्वव्यापक परमेश्वरास वासुदेव असे नामाभिधान मिळाले.
(३३) बृहद्‌भानुः :  - ज्याला असंख्य (बृहत्) किरणे आहेत असा. म्हणजेच जो सूर्यचंद्रांच्या किरणांद्वारे सर्व जगत् प्रकाशमान् करतो तो बृहद्भानु. महाभारत म्हणते - ज्याची किरणें चंद्र सूर्य व इतर ग्रहांना मिळतात व त्यांचे द्वारा तो सर्व विश्व प्रकाशित करतो म्हणून तो महान् (बृहत्) तेज धारण करणारा आहे.
(३३) आदिदेवः :  - जो सर्वांचा आदिस्त्रोत आहे तो परमात्मा. सर्वांचे पहिले (आदि) कारण तोच आहे व पहिला देवही तोच आहे.
(३३) पुरंदरः :  - पुरांचा नाश करणारा. ज्या सुसज्ज क्षेत्रामध्ये आपण असंख्य अनुभव घेत असतो त्या क्षेत्राला 'पुर' असे म्हटले आहे. आपण ज्या तीन पुरांमध्ये आपण आपले जगतातील असंख्य अनुभव गोळा करीत हिंडत असतो ती पुरे आहेत - जागृत - स्वप्न - सुषुप्ती. जेव्हा स्थूल सूक्ष्म व कारणदेहांच्या पलीकडे जान ज्यावेळी 'आत्मानुभव' घेतला जातो तेंव्हा ही तीनही पुरे भस्मसात् होतात, उध्वस्त होतात व नष्ट होतात. शिवपुराणामध्ये याच कल्पनेचा विस्तार केला आहे. आपण यावरून असे म्हणूं शकतो की त्याच परमात्म्यानें महेशाच्या स्वरूपांत तीनही पुरे नष्ट करण्याचे कार्य केले.[3]
डॉ. सौ. उषा गुणे.



[1]  (१) अवहन (२) प्रवहन (३) विवहन (४) परमवहन (५) उद्ववहन (६) संवहन (७) परिवहन
[2]  वसनांत् सर्वभूतांना, वसुत्वाद्देव योनिषु । वासुदेवस्ततोज्ञेयो योगिभिस्तत्वदर्शिभिः ।। सर्वत्रासौ समस्तंच वसत्यत्रेति वै यतः  । ततःस वासुदेवेति विद्वद्भिः प्रकीर्थते ।।
[3]   त्रिपुरसंहार.

No comments: