15 May, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ३५

अच्युतः प्रथितः प्राणः प्राणदो वासवानुजः 
अपांनिधिरधिष्ठानमप्रमत्तः प्रतिष्ठितः  ।।
(३१) अच्युतः :  - ज्याच्यामध्ये कांहीही परिवर्तन - च्युति होत नाही असा. जन्म वृद्धि, क्षय, व्याधी मृत्यू हे सर्व बदल परिवर्तन आहेत. जे शाश्वत आणि निर्विकार आहे त्यामध्ये कुठलाही बदल होत नाही व आत्मतत्व हे शाश्वत असल्यानें अशाश्वत व सीमित वस्तूंमध्ये जे बदल संभवतात ते त्यामध्ये कधीच घडून येत नाहीत. म्हणूनच उपनिषदांचे प्रतिपादन आहे.[1] ते आत्मतत शाश्वत आहे, शिव आहे, अत्युत आहे.
(३१) प्रथितः :  - जो सर्व ठिकाणी व्यापून राहिला आहे असा. उपनिषदांनी वर्णन केल्याप्रमाणे दुसरा अर्थ होईल , ' ज्याची ख्याती जगतामध्ये सर्वत्र पसरली आहे असा.
(३२०) प्राणः :  - जीवत्वाच्या व्यक्तदशेला 'प्राण' म्हटले जाते. तो परमात्मा सर्व सजीव प्राण्यामधील 'प्राण' आहे. त्याचाच अर्थ असा होतो की या गतीमान जगतातील सर्व क्रिया व त्याचे ज्ञान होणे हे आत्म्याच्या अस्तित्वाचे, व्यक्ततेचे लक्षण आहे. दुसरा अर्थ - तो प्राण वायू या स्वरूपांत सर्व सजीवांची प्राण धारणा करतो.
(३२) प्राणदः :  - जो सर्वांना प्राणशक्ति अर्पण करतो तो. या संज्ञेतील 'द' ह्या धातुचा विनाशक असाही अर्थ होतो. त्यामुळे ही संज्ञा विनाशक शक्तिचाही निर्देश करते. पुराणातील वर्णनाप्रमाणे जो देवांना शक्ति व गौरव प्रदान करतो असा प्राणद परमात्मा सैतानी व पाशवी प्रवृत्तीच्या असूरांवर विजय मिळविण्याकरतां त्यांना नष्ट करण्याकरतां विशेष शक्ति प्रदान करतो.
     व्यक्तीचे दृष्टिने पहातां जीवनांतील उदात्त मूल्ये रूजविण्याकरतां शक्ति देणारा तोच परमात्मा आहे, तसेच भक्तांची आंतरिक शांति व स्थिरता नष्ट करू पाहणर्‍या नीच प्रवृत्तीवर विजय मिळविण्याकरतां त्याला लागणारे धैर्य भरभरून देणाराही तोच परमात्मा 'प्राणद' आहे.
(३२) वासवानुजः :  - इंद्राचा भा. भगवान् विष्णुने घेतलेल्या पूज्य वामनावतारामुळे हे नाव त्यास प्राप्त झाले आहे. या अवतारामध्ये त्यानें इंद्राचा लहान भाऊ म्हणून अदितीच्या उदरी जन्म घेतला. आध्यात्मिक शास्त्राप्रमाणे देवांचा राजा इंद्र म्हणजेच इंद्रियांचा राजा मन होय. (इंद्रियांचा राजा) आपल्यातील 'मुमुक्षा' ही मनातच मनाचा लहान भा म्हणुन उद्भवते व शेवटी जाणीवेच्या तीनही अवस्था - जागृत, स्वप्न, सुषुप्ती ह्या ओलांडून व त्यांना जिंकून पलीकडे जाते. अशा रितीनें 'वामन' अनेक अर्थानें इंद्राच्या साम्राज्यावर विजय मिळवितो.
(३२) अपांनिधिः :  - जलनिधि - सागर. सागराची शक्ति व त्याचे वैभव हे त्या श्री नारायणाच्या दिव्य वैभवाचे एक लहानसे प्रतिबिंब आहे. गीतेमध्ये भगवान् श्रीकृष्ण स्वतःच म्हणतात. सर्व जलनिधिमध्ये मी सागर आहे.[2]
(३२) अधिष्ठानम् :  - सर्व विश्वाचा आधार. सत्याच्या आधारावरच भ्रमात्मक संकल्पनाही आधिष्ठित होऊ शकते. महणूनच भ्रमात्मक सर्व भूतांचा हा शाश्वत आधार अधिष्ठान या नांवाने ओळखला जातो.
(३२) अप्रमत्तः :  - जो कधीही प्रमाद करीत नाही असा अप्रमत्त. कारण तो न्याय करण्यामध्येही कधीच चुकत नाही. विश्वामध्ये घडणार्‍या सर्व घटनांमागे असणारा नियम परमात्मा स्वतःच आहे. कर्माच्या योग्यतेनुसारच त्या त्या कर्माचे फल दिले जाते ह्या कर्मफल सिद्धांताप्रमाणे कर्मफल देण्यात तो कधीच चूक (अन्याय) करत नाही म्हणून तो अप्रमत्त आहे. कारण आपण सर्व प्रमत्त 'प्रमादपूर्ण आहोत'. आपण सर्व स्वतःस गैरसमजुतीने 'जडप्रकृती' मानण्याची चूक करत असतो. आणि या चुकीमधूनच आपण भ्रामक अहंकाराची कल्पना आपणामध्ये रूजवितो. तो परमात्मा शुद्ध चैतन्यस्वरूप आहे त्यामुळेच तो ह्या विकल्परूपी प्रमादापासून सदैव अस्पर्शित आहे.
(३२) प्रतिष्ठितः :  - जगतातील प्रत्येक वस्तू आपले कार्य करण्याकरतां दुसर्‍या कोणत्यानां कोणत्या कारणावर अवलंबून असते. आपल्याला अनुभवास येत असलेल्या व ज्ञानाने समजणर्‍या सर्व वस्तू या कार्य स्वरूप आहेत व त्यांना त्यांची कारणेही आहेत. सर्व कार्यांचे अस्तित्व रहाण्याकरतां त्यांना कारणांवरच अयलंबून रहावे लागते. परंतु तो परमात्मा मात्र ज्याला स्वतःला कुठलेही कारण नाही असे (आदी) कारण आहे, याचेमुळे हे सर्व कार्य आहे. अशाप्रकारे स्वतः सर्वांचे अंतिम (किवा आदी) कारण असल्यामुळे त्याला स्वतःवाचून दुसर्‍या कशाचाही अवलंब करावा लागत नाही. हे स्व-स्थापित सत्य 'प्रतिष्ठित' या संज्ञेने वर्णिलेले आहे.
डॉ. सौ. उषा गुणे.



[1]   'शाश्वतं शिवं अच्युतम्'
[2]   सरसामस्मि सागरः

No comments: