23 May, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ३७

अशोकस्तारणस्तारः शूरः शौरिर्जनेश्वरः  ।
अनुकूलश्शतावर्तः पद्मी पद्मनिभेक्षणः  ।।
(३३) अशोकः :  - ज्याला कसलाही शोक नाही असा. ज्यावेळी मन अत्यंत क्षुब्ध व अस्वस्थ होते त्यावेळी अनुभवास येणार्‍या स्थितीला 'शोक' असे म्हणतात. वासना व आकांक्षा मधून मनाची क्षुब्धता, अस्वस्थता उत्पन्न होत असते. त्यामुळे 'अशोक' ह्या शद्बाचा असा अर्थ होईल की मनामध्ये सतत क्षुब्धता निर्माण करणार्‍या नकारात्मक वृत्ती ज्याच्याजवळ कधीही नसतात असा. ही संज्ञा पूर्णार्थाने येथे लागू होते. कारण परमेश्वर आत्मस्वरूपानें मन बुद्धि रूपी साधनांनी निर्माण केलेल्या बौद्धिक क्षुब्धतेच्या पलीकडेच असतो.
(३३) तारणः :  - जो इतरांना तरून जाण्यास मदत करतो तो. मन बुद्धिच्या क्षुब्धतेने अत्यंत पिडीत झालेल्या जीवाला आत्माच तारून नेतो. जेव्हा जीवात्म्यास परमात्म्याशी असलेली एकरूपता समजते तेंव्हा तो सहजच या क्षुब्धतेच्या पलीकडे जातो. विष्णु भागवतात म्हटले आहे,' आम्हास ह्या जन्म मरणाच्या संसारचक्रातून वाचविल असा तुझ्यावाचून कोण आहे?''.[1]
(३३) तारः :  - जो तारण करतो (वाचवितो) तो.[2] जो पुनर्जन्माच्या भयापासून सोडवितो, आणि जो भक्तांचे सतत रक्षण करणारा असतो तो 'श्री विष्णु.' भक्तही त्याला तारक असेच संबोधितात. वरील तीनही संज्ञा असे दर्शवितात की विष्णु हा आपल्या भक्तांना एकमेव तारणहार - रक्षणकर्ता आहे. तो आपले आपल्या शारीरिक दुःखापासून रक्षण करतो (अशोक) म्हणूनच आध्यात्मिक दुःखे दूर होतात. तो आपणांस संसार सागर पार करून जाण्यास मदत करतो (तारण) म्हणजेच तो आधिभौतिक दुःखापासून सोडवितो व तो आपल्याला पंचमहाभूतांच्या तडाख्यातून सोडवितो (तारः) ह्याचाच अर्थ आधिदैविक दुःखेही नाहीशी करतो. म्हणजेच नारायण आपल्या अभय हस्तानें सर्व दुःखापासून रक्षण करतो.
(३३) शूरः :  - शूरः आपल्यातील सर्व शौर्य व धैर्याचे उगमस्थान आपल्यातील चैतन्य. म्हणूनच ह्या विश्वाच्या स्वामीला येथे 'शूर' म्हटले आहे. जगातील दुष्ट प्रवृत्ती कितीही बलवान व योजनाबद्ध असोत त्या सर्व नष्ट करण्याचे सामर्थ्य त्याचेपाशी आहे.
(३४०) शौरिः :  - वसुदेवाच्या वडीलांचे नांव शूरसेन. शूरसेनाचा मूलगा वसुदेव व हेही आपण पाहिले आहे की वसुदेवाचा मुलगा वासुदेव. म्हणजेच भगवान् विष्णूंनी शूर घराण्यात अवतार घेतला आहे म्हणूनच त्याला 'शौरि' म्हटले गेले आहे.[3]
(३४) जनेश्वरः :  - जनांचा ईश्वर, स्वामी तो जनेश्वर. जे जन्म घेतात त्यांना 'जन' असे म्हटले जाते.[4] विश्वामध्ये जन्म पावणार्‍या सर्व प्राणीमात्रांचा तो स्वामी आहे असा या संज्ञेचा अर्थ होतो.
(३४) अनुकूलः :  - मनपूर्वक सदिच्छा बाळगणारा किवा सर्वांचा सुहृद. परमेश्वर स्वतःच प्रत्येक प्राणी मात्रातील जीवनतत्व असल्यामुळे साहजिकच तो प्रत्येकाचा अभयदाता सुहृद आहे. प्रत्येक व्यक्ति आपले जीवन आपल्या साध्याच्या व हेतूच्या अनुकूल असेच व्यतीत करत असते. म्हणूनच परमेश्वर एकाद्या खुन्याचे हेतू पूर्ण करण्याकरतां त्याला अनुकूल (त्याला मित्र) असू शकतो त्याचवेळी दुसरा कोणी मानवजातीचे हित करण्याच्या उद्देशाने कार्यरत असेल तर त्याचाही सहाय्यकर्ता मित्र असूं शकतो. अशा तर्‍हेने प्रत्येकाचाच मित्र व समर्पित संरक्षही असूं शकतो. तोच सर्व प्राणीमात्रांच्या वासना, आकांक्षा व्यक्त दशेला आणणारा सामर्थ्यशील शक्तिस्रोत आहे.
(३४) शतावर्तः :  - शत म्हणजे शंभर. परंतु येथे हा शद्ब 'असंख्य' ह्या अर्थी वापरला आहे. ' ज्याने असंख्य आकाराच्या श्रेणी (आवर्त) धारण केल्या आहेत' तो शतावर्त असा ह्या संज्ञेचा अर्थ होईल. सृष्टितील सर्व आकार हे त्याचेच आहेत कारण मूलतः हे सर्व विश्व म्हणजे मूर्त स्वरूपास आलेले परब्रह्मच होय. दुसरा अर्थ होईल, ' प्रकृतीच्या व उत्क्रांतीच्या नियमांचे पालन व रक्षण करण्याकरतां त्याने अनेक 'अवतार' (आवर्तन) धारण केले आहेत म्हणून तो शतावर्त. आणखी एक अर्थ होतो की , ' जो प्राणस्वरूपांने शरीरांतील असंख्य नाड्यांमधून आवर्तन (संचार) करतो तो शतावर्त श्रीविष्णु.
(३४) पद्मी :  - ज्याने हातामध्ये कमलपुष्प धारण केले आहे असा. भारतामध्ये कमळाला राष्ट्रीय पुष्प मानले जाते. आपल्या संस्कृतीमध्ये कमल हे आध्यात्मिक जीवनाच्या ध्येयांचे प्रतिक मानले जाते. ही प्रतिके अशा तर्‍हेनें ज्ञान देतात की परमेश्वर आपल्या हातातील शंख फुंकून जागृती आणतो व जर या उच्चस्तरावरील अंतर्नादाला लोकांनी प्रतिसाद दिलाच नाही तर तो आपल्या हातातील गदेनें कारूण्ययुक्त धक्के देऊन जागृती आणतो. तरीही एकाद्या व्यक्तिनें अगर समाजानें त्याच्या दयामय इशार्‍याकडे दुर्लक्ष केले तर त्याच्या हातात 'सुदर्शन चक्र' आहेच. तिचा उपयोग करून तो सर्व जगताचा प्रलय करतो व पुन्हा नवीन सृजन (कमल) करतो.
(३४) पद्मनिभेक्षणः :  - ज्याचे डोळे कमल पुष्पाप्रमाणे सुंदर आहेत तो. कमलनेत्र श्रीविष्णु.
डॉ. सौ. उषा गुणे.



[1]   संसारचक्रमज कोऽतितरेत् त्वदन्यः  । (विष्णुभागवत ७-९-६)
[2]   तारयति इति तारः
[3]  शूरस्य गोत्रापत्यं पुमान् शौरिः
[4]   जननधर्मवान् जनः

No comments: