27 May, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ३८

पद्मनाभोऽरविन्दाक्षः पद्मगर्भः शरीरभृत् 
महर्द्धिऋद्धो वृद्धात्मा महाक्षो गरूडध्वजः  ।।
(३४) पद्मनाभः :  - ज्याच्या नाभीमध्ये कमलपुष्प आहे असा. ह्या संज्ञेचा शाद्बिक अर्थ घेता कामा नये. नाभी हे एक मानसिक केंद्र आहे, ज्या ठिकाणाहून अद्याप व्यक्त दशेला न आलेले सर्व विचार जाणीवेमध्ये - व्यक्तदशेस ये लागतात (पश्यंती)[1] सर्व विचारांच्या निर्बिज अवस्थेला योगशास्त्रात 'परा' असे म्हटले जाते. म्हणून ह्या संज्ञेचा अर्थ होतो की ज्याने आपल्या हृदयांत (उदरांत) व्यक्त सृष्टिची सुप्तावस्थेतील सर्व बीजे धारण केली आहे असा.
     दुसरा अर्थ असा की जो भक्तांच्या हृदयकमलांत व्यक्त होतो तो. कांहीजण असे विवेचन करतात की जो कमलपुष्पाच्या गर्भागारांत वस्ती करतो तो 'श्रीविष्णु'.
 (३४) अरविन्दाक्ष :  - ज्याचे डोळे कमलपुष्पाप्रमाणे सुंदर असतात असा 'श्रीविष्णु'. कमल पुष्प सुर्यादयाबरोबर उमलते व ते रात्री मिटून जाते. त्याचप्रमाणे भगवान् विष्णु आपले सौदर्य व कृपा भक्तांच्या ठिकाणी प्रकट करतात व त्यांच्या कृपेचा ओघ पूर विषयासक्तीच्या अंधःकारांत जणू लुप्त होन जातो.
(३४) पद्मगर्भः :  - ज्याचे ध्यान हृदयकमळाचे मध्यभागी केले जाते असा.
(३४) शरीरभृत् :  - जो सर्व शरीरांचे भरण व पोषण करतो तो शरीरभृत्. ह्या संज्ञेचा असाही अर्थ होतो की जो अन्न व प्राण स्वरूपाने शरीराचे भरण पोषण करण्यास स्वतःच कारण स्वरूप होतो. हे एक स्पष्ट सत्य आहे की शरीराचे अस्तित्व साधारणपणे दृश्यस्वरूपाचा फारसा नाश न होता ५० वर्षापर्यंत टिकून रहाते. परंतु एकदा त्यातून जीवतत्व निघून गेले की ते शव आपला आकार टिकवू शकत नाही. इतकेच नव्हे तर केवळ ४८ तासानंतर तर ते मूळ स्वरूपांत राहू शकत नाही. आपल्या अध्यक्षतेनें जो शरीराचे धारण व पोषण करतो व ज्याच्या अनुपस्थ्तीने शरीर मृत होते, नाश पावते. तो शरीर धारण करणारा देहभृत् होय.
(३५०) महर्द्धि :  - ज्याचे जवळ महान् ऋद्धि म्हणजेच वैभव व सामर्थ्य आहे असा. हे वैभव व सामर्थ्य मिळून त्याचे ऐश्वर्य होते (ईश्वरत्व) ह्याचाच अर्थ असा की हे वैभव व सामर्थ्याचे ऐश्वर्य ज्याचे जवळ स्वभावतः नित्यच असते तो महर्द्धि.
(३५) ऋद्धः :  - ज्याचा विस्तार विश्वव्यापी आहे असा. अनंत वस्तूजातानें तयार झालेले हे विश्व हीच त्या परमेश्वराची व्यक्त दशा होय.
(३५) वृद्धात्मा :  - सर्वात पुरातन आत्मा. तो बुद्धिपर असल्यानें आत्म्यामध्ये कालाची संकल्पना नाही. परंतु वृद्धात्मा ह्या संज्ञेने असे सुचवायचे आहे की ब्रंह्मांडाच्या पूर्वीही तो होता. कालाच्या निर्मीतीनंतरच आपण तो सर्व प्राणीमात्रांचा आत्मा असतो असे म्हणू शकतो व त्याचा निर्देश करू शकतो. तो सर्वांपेक्षा पुरातन पहिला आत्मा आहे. ह्याचाच अर्थ असा की ज्याचे पासून ही सर्व व्यक्त सृष्टि संभवते तो आत्मा.
(३५) महाक्षः :  - महान् चक्षु असलेला. ह्याचा अर्थ असा की तो परमात्मा आपल्या डोळयांनी केवळ सृष्टितील वस्तुजाताकडेच पाहू शकतो असे नाही तर त्या प्राणीमात्रांच्या खोल अंतरंगातील सर्व हालचाली आपल्या अतिसूक्ष्म दृष्टिने (x-ray) पांहू शकतो. कारण तोच सर्व प्राणीमात्रांच्या हृदयांत जाणीव रूपाने असल्यानें सर्वांचे sarva kaalaata प्रकाशन तोच करतो.
(३५) गरूडध्वजः :  - ज्याचे ध्वजावर गरूड प्रतिकरूपानें आहे असा. 'गरूडपक्षी' हा परमेश्वराचे वाहन समजले जातो. याचे कारण असे असावे की गरूड सतत आकाशांत खूप अुंचावर उडत रहातो परंतु जमिनीवरील अत्यंत लहानसे मातीचे ढेकुळही पाहूं शकतो. आपले भक्ष्य शोधून काढल्यावर आकाशातून तो वेगानें खाली झेप घेतो व ते घेऊन जातो. अशा तर्‍हेने वातावरण शुद्ध केले जाते त्याचप्रकारे भक्तांच्याही मनांत परमेश्वर कुठलेही अशुद्ध विचार राहू देत नाही. कारण त्याचे वाहनच मुळी 'गरूड' आहे.
डॉ. सौ. उषा गुणे.



[1]   परा, पश्यन्ति, मध्यमा व वैखरी या विचाराच्या चार अवस्था आहेत. आत्मशक्तिच्या सहाय्याने सुप्तावस्थेपासून क्रमशः व्यक्तदशेला येत येत वाणीच्या स्वरूपात बाह्य जगतात पूर्णपणे प्रकट होतात.

No comments: