31 May, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ३९

अतुल शरभो भीमः समयज्ञो हविर्हरिः  ।
सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान् समितिञ्जयः  ।।
(३५) अतुलः :  - ज्याची तुलनाच होवूं शकत नाही असा. ज्याceची नाम हेच जगाचे एक वैभव आहे त्याला सर्व स्वातंत्र्य आहे. गीते मध्ये म्हटलेच आहे की, 'तुझ्यासारखा दुसरा कोणीही अस्तित्वातच नाही, तर मग तुझ्याहून [1] श्रेष्ठ ह्या तीनही लोकांत प्रभावशील कोण असू शकेल ?' थोडक्यात त्याच्यासारखे दुसरे कांहीही नसल्यामुळे शरीरानी (इंद्रियांनी) ज्ञान होणार्‍या वस्तू श्रेणीमध्ये तो समाविष्ठ होत नाही, मनाच्या भावनांनी भावत नाही, बुद्धिच्या विचारांच्या कक्षेत येत नाही. त्याच्याशी तुलना करता येईल असे आपल्या जवळ कांहीही नाही.
(३५) शरभः :  - जो शरीरामध्ये रहातो व शरीरातूनच प्रकाशित होतो तो. शरीराला 'शर' असे म्हटले आहे.[2] कारण शरीर शीर्यमाण आहे. या क्षय पावणार्‍या शरीरांत साक्षी रूपानें जो रहातो व ज्याच्या वैभवानें व्यक्तित्व येते तो आत्मा म्हणजे परमेश्वरच होय. ह्याचाच दुसरा अर्थ असाही होतो की परमेश्वर स्वरूप हा त्याचा स्व-भाव आहे. भगवान् शंकराने 'शरभ' हा अवतार धारण केला आहे व त्यामध्ये त्याला आठ पाय आहेत व सिंहालाही मारू शकेल इतका बलवान आहे.
(३५) भीमः :  - सर्वप्रेरक किंवा अत्यंत भयानक. जे अत्यंत दुष्ट आहेत व अत्यंत विषयी आहेत त्यांना भयावह असे सामर्थ्यवान् तत्व. जे विकारी आहेत त्यांचे करता परमेश्वर अत्यंत सामर्थ्यवान खल निर्दालन शक्ति असलेला आहे व तो त्यांच्या पूर्ण विनाशापर्यंत पाठलाग करतो. कांही टीकाकार ही संज्ञा (समासासहित) अ-भीम असल्याचे प्रतीपादन करतात व त्याचा अर्थ जे साधू आहेत त्यांचे तो संरक्षक कवच आहे.
(३५) समयज्ञः :  - सर्व दर्शने (ज्ञानशाखा) जाणणारा, किवा उत्पत्ती-स्थिती- लय यांचा समय पूर्णपणे जाणणारा तो 'समय-ज्ञ' महाविष्णु. तिसरा अर्थ असा की [3] ज्याची पूजा (यज्ञ) म्हणजे दुसरे कांही नाही तर भक्तानें आपली समदृष्टी सतत जागृत ठेवणे हेच होय. भक्त श्रेष्ठ प्रल्हाद म्हणतात, 'सर्व स्थितींमध्ये 'सम' रहाणे हीच अच्युताची पूजा होय.
(३५) हविर्हरिः :  - सर्व आहुतींचा स्विकार करणारा. तोच सर्व यज्ञाचा स्वामी आहे म्हणूनच सर्व भक्त त्यालाच आहुती अर्पण करतात व तोच सर्व भक्तियुक्त समर्पणाचा स्विकार करणारा आहे. भगवत् गीतेत भगवंत म्हणतात,[4] 'मीच खरोखर सर्व यज्ञांचा भोक्ता व स्वामी आहे.' त्यालाच 'हवि' असे नामाभिधान आहे. त्याची पूजा हविंनी आहुती देऊन केली जाते.
काही विवेचक ही संज्ञा हवि व हरिः अशा दोन वेगवेगळया नामांनी तयार झाली आहे असे मानतात. अशा स्थितीत हवि ह्या प्रथम संज्ञेचा अर्थ होईल जो यज्ञकर्माने प्रसन्न करून घेतला जातो तो. दुसरी संज्ञा हरि  म्हणजे जो सर्व वासना अगर पापांचे हरण करतो तो. अर्थातच तो सर्व वासनांचे प्रकटनही पुसून टाकतो.
(३६०) सर्वलक्षणलक्षण्यः :  - सर्व लक्षणांनी म्हणजे प्रमाणांनी जो जाणला जातो तो. म्हणजेच तो परमात्मा सर्व वैज्ञानिक संशोधनाने व तात्विक चिंतनानेही सिद्ध होतो तो. ती विचारसरणी द्वैतवादी असो की अद्वैतवादी असो परंतु साक्षात्कारी साधकाला प्रतित होणारे अंतिम सत्य आहे श्रीविष्णु.
(३६) लक्ष्मीवान :  - लक्ष्मीचा पती. संपूर्ण प्रकृतीला प्रेरणा व चालना देणारा पुरूष तो लक्ष्मीपती. पुरुषाच्या प्रेरणेनें कार्यकारी झालेली प्रकृती म्हणजेच हे आपल्या भोवती पसरलेले जग होय. व्यक्ता-वस्थेतील परमात्मा हा नेहमीच प्रकृतीशी सम्मिलीत (बांधलेला) असतो. लक्ष्मी म्हणजे तेजोमयता. तिचा पती हा स्वतः प्रकाशमान असून शुद्ध चैतन्य स्वरूपाने तो सर्व प्रकाशित करतो. म्हणूनच तो खरोखरच लक्ष्मीवान आहे.
(३६) समितिंजय :  - सदा विजयी. पुरांणांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे अधर्माशी झालेल्या सर्व युद्धात, सर्व वेळी शेवटी भगवंतच विजयी होतात. आपल्या भक्तांची ’जीव’भावाची सर्व दुःखे तो नाहीशी करतो. समिति म्हणजे युद्ध, संघर्ष व त्यामध्ये तो नेहमीच विजयी होतो.
डॉ. सौ. उषा गुणे.




[1]    न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोन्यो  । लोकत्रयेऽप्य प्रतिमप्रभावः  ।। गीता ११.४३
[2]    'शीर्यमाणात् शरः'
[3]        समत्वमाराधनमच्युतस्य  । (विष्णुपुराण १-१७-९०)
[4]        अहं हि सर्व यज्ञांनां भोक्तांच प्रभुरेवच  । गीता १०-२४

No comments: