11 May, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ३४

इष्टो विशिष्टः शिष्टेष्टः शिखंडी नहुषो वृषः 
क्रोधहा क्रोधकृतकर्ता विश्वबाहुर्महीधरः  ।।
(३०) इष्टः :  - या संज्ञेचा अर्थ दोन तर्‍हेने होईल. पहिला - ज्याचे पूजन - आवाहन वेगवेगळया वैदिक विधींनी, यंज्ञांनी केले जाते तो इष्ट.  दुसरा अर्थ होईल, जो सर्वांचा प्रियतम आहे तो - ष्ट. सर्वांच्या प्रेमाचे केंद्रस्थानही तोच आहे. बृहद्‌आरण्यकोपनिषद् अत्यंत स्पष्ट शब्दात् सांगत आहे की 'मनुष्य आपल्या पत्नीवर प्रेम करतो ते पत्नीकरता नाही तर स्वतःकरताच करतो. आपले जे आपल्या आत्म्यावर प्रेम असते त्यातूनच सर्व प्रेमांची उत्पत्ति होत असते.
(३०) विशिष्ट:  - जो अत्यंत उदात्त व पवित्र आहे असा श्रीविष्णु. तो सर्वांच्या हृदयात रहातो. प्रत्येक प्राणीमात्राच्या प्रत्येक शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्रिया त्याच्याच प्रेरणेने होत असतात म्हणूनच त्याला ही संज्ञा देण्यात आली आहे.
(३०) शिष्टेष्टः :  - आध्यात्मिक प्रवृत्तीच्या सज्जनांचा (इष्ट) तसेच सर्व निष्टावान् भक्तांचा तो प्रियतम आहे म्हणून तो इष्टेष्ट होय. तोच त्यांचे ध्येय आहे, तोच त्यांचे गंतव्य आहे. सर्व दिव्य पवित्र हृदयांचा तो प्रियकर आहे.[1] दुसरा अर्थ होतो – जे भक्त परमेश्वरावर मनापासून व निष्ठेने प्रेम करतात त्यांचेवर स्वतः परमेश्वरही अत्यंत उत्कट प्रेम करतो[2] या संज्ञेची अशीही फोड करतात की जो भक्तांकडून सतत काया-वाचा-मनानें पूजिला वंदिला जातो तो.
(३१) शिखंडी :  - ज्याने मोर पंखांचा मुकूट धारण केला आहे असा. भगवान् श्रीकृष्णानें जास्त करून आपल्या बालपणांत मोरपिसांचे शिरोभूषण धारण केले असे भागवतांत वर्णन केले आहे.
(३१) नहूषः :  - नहनम् म्हणजे  बंधन. त्यामुळे या संज्ञेचा अर्थ होईल जो बंधनांनी ओळखला जातो तो. वेदांता प्रमाणे 'ईश्वर' ही संज्ञा जो समष्टि कारण देहाने (मायेने) सीमित (बद्ध) झालेला आत्मा आहे त्याला दिलेली दिसते, याउलट जो मायेला आपल्या अधिपत्याखाली ठेवतो तो ईश्वर असाही अर्थ आढळतो. आणखी एक अर्थ असाही होतो की जो सर्व प्राणिमात्रांना मायेच्या बंधनांत बांधून टाकतो तो. पुराणांचे अभ्यासक म्हणतात की इंद्रपदावरही अधिपत्य गाजविणारा 'नहुष' हा परमेश्वराच्याच भव्य पराक्रमाचे प्रतिरूप आहे.
(३१) वृषः :  - हिंदु संस्कृतीतील एका प्रख्यात विधानावरून सिद्धांतवरून आपल्याला दिसून येईल की [3]परमेश्वर हाच 'धर्मस्वरूप' आहे. धर्म म्हणजे अस्तित्वाची मुलभूत धारणा ज्या आधाराने व्यक्तिही व्यक्ती म्हणून अस्तित्वात राहू शकते, व ज्याच्या वाचून व्यक्तीचे अस्तित्व असूच शकत नाही तो त्या व्यक्तिचा धर्म. ह्या दृष्टीनें पाहतां प्रत्येकाचा आधारभूत धर्म आत्माच आहे. त्यामुळे श्रीविष्णुचे वृष हे नाम तो दुसरा कोण नसून आपला प्रत्यक्ष आधारभूत आत्माच आहे असे सुचवितो. ह्या संज्ञेचा दुसरा अर्थ असाही होतो की जो आपल्या सर्व भक्तांच्यावर इच्छा पूर्तीचा वर्षाव करतो तो 'वृष'. वासनांच्या अपूर्णतेमुळे येणार्‍या अस्वस्थतेतून इच्छांचा उगम होतो व त्या उफाळून व्यक्त दशेला येतात. इच्छा उगम पावताच मन त्याप्रमाणे संकल्प करते व शरीर त्याच्या पूर्तीकरतां हालचाल करते. ह्या सर्व शरीरमनाच्या हालचाली आत्म्याच्या सामर्थ्याखेरीज शक्य नाहीत. शेवटी सर्व ईच्छा पूर्ण करणारा आपल्या हृदयाचा स्वामी परमात्मा श्रीविष्णुच आहे.
(३१) क्रोधहा :  - आपल्या प्रामाणिक भक्तांच्या मनातील क्रोध नाहीसा करणारा पूर्वी आपण पाहिलेच आहे की मनांतील इच्छापूर्तीला अडथळा आला की मनुष्याला क्रोध येतो. परमात्म्याच्या साक्षात्कारानें सर्व इच्छा समाप्त होतात. त्यामुळे क्रोध येण्यास कधीही अवसर रहात नाही. जेव्हा सर्व जगताचे द्वैत भावानें ज्ञान होत असते तेव्हाच राग येण्याची शक्यता असते. ज्याने आत्मतत्व जाणले आहे त्याला सर्व ठिकाणी आत्मतत्वाखेरीज दुसरे कांहीच प्रत्ययांस येत नाही. त्यामुळे क्रोध भावना चाळविण्याचा प्रश्नच येत नाही.
(३१) क्रोधकृत्कर्ता :  - भक्तांचे विषयविकार जेव्हा उफाळून येतात तेंव्हा प्रामाणिक निष्ठावान साधकाच्या मनांत जो त्या विकारांबद्दल 'क्रोध' उत्पन्न करतो तो क्रोधकृत. तसेच तोच सर्व विकारांच्या निर्मिती मागील प्रेरकर्ता आहे. कारण विश्वातील सर्वाची उत्पत्ती त्याच्यापासूनच होत असते. काही टीकाकार या दोन वेगळया संज्ञा आहेत असे मानतात परंतु बहुशः ती एकच संज्ञा असल्याचे मानले जाते.
(३१) विश्वबाहुः :  - ज्यास असंख्य बाहु (हात) आहेत असा. त्याचे हात सर्वत्र असून तो आपल्या ह्या हातांनी विश्वातील सर्व घडामोडी घडवून आणीत असतो, जो पर्यंत हृदयांत प्राणांचे अधिष्ठान आहे तो पर्यंतच हातपाय कार्य करू शकतात. जो पर्यंत जीवनाचा स्पर्श आहे तोपर्यंत हात वर उठून आपले कार्य करू शकतो. जीवन हातांचे द्वारे आपणांस व्यक्त करीत असते. जगातील विविध प्रकारची चाललेली सर्व कार्ये व ते करणारे सर्व हात हे त्याचेच हात आहेत. ज्या ठिकाणी हे जीवन नाही त्याठिकाणी निष्प्राण हात कांहीही कार्य करूं शकत नाहीत. त्यामुळे जे कार्यकारी महत् तत्व सर्व हातामधून कार्य करते त्यालाच 'विश्वबाहु' असे म्हटले आहे.
(३१) महीधरः :  - जो पृथ्वीचा आधार आहे व गाभा आहे तो. परमात्मा हे विश्वाचे उपादान कारण आहे. ज्याप्रमाणे कापूस हा कापडाचा, माती हा घटाचा, व सोने हा अलंकाराचा आधार आहे त्याप्रमाणे परमात्मा हा विश्वाचा आधार आहे. मही ह्या शब्दाचा अर्थ दुसरा अर्थ होतो भक्तांनी भक्तिने केलेले महीमान - पूजा. भक्ताच्या हृदयातील भक्तिभाव, पूजा धारण करतो स्विकारतो तो भगवान् श्री विष्णु - महीधर आहे.
डॉ. सौ. उषा गुणे.



[1]   (शिष्टानांइष्टः = सत्‌प्रवृत्त जनांचा सज्जनांचा प्रियकर)
[2]  शिष्ट इष्ट यस्य सः  - ज्याला सज्जन प्रिय आहेत असा
[3]  वृषो हि भगवान् धर्मः ।

No comments: