06 September, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ६५

श्रीदः श्रीशः श्रीनिवासः श्रीनिधिः श्रीविभावनः 
श्रीधरः श्रीकरः श्रेयः श्रीमॉल्लोकत्रयाश्रयः  ।।
(६०) श्रीदः :  - जो आपल्या प्रामाणिक व अनन्य भक्तांना सर्व वैभव देतो तो. जे भक्त त्याला आपले हृदय समर्पित करतात व अनन्य शरण होतात त्याचे करतां तो ज्ञान व आनंदाची सरिताच बनतो.
(६०) श्रीशः :  - धनदेवता लक्ष्मी देवीचा पति. सर्व जीवांचे पालन पोषण करणे ही तिची शक्ति आहे. तसेच जे प्रयत्नशील साधक आहेत त्यांना आंतरिक गुणवैभवही तीच देते.
(६०) श्रीनिवासः :  - जो सज्जनांचे (श्री) ठिकाणी वास करतो व प्रकट होतो तो. येथे या श्री संज्ञेची उकल ज्यांचे ठिकाणी 'श्री'चा निवास आहे तें अशीही होईल. ज्यानी आपल्या हृदयातून दुष्ट वासना व आसक्ति नष्ट केली आहे व ज्यांचे हृदयांत आनंद, शांती भक्ती व ज्ञानाचा निवास आहे अशांचा हृदयांत श्रीनारायण निवास करतो व त्यांचेमधूनच ते आत्मस्वरूप पूर्ण तेजानें प्रकाशते.
(६०) श्रीनिधिः :  - जो 'श्री'चे आश्रयस्थान (खजिना) आहे असा. श्रीविष्णु पूर्ण स्वरूप असल्याने सर्व वैभव त्याचेपासूनच निर्माण होते. प्रत्यक्ष 'माया' ही सुद्धा त्याचे पासूनच आपली शक्ति प्राप्त करते. व सर्व क्रीडा करते म्हणून तो श्रीनिधि आहे.
(६०) श्रीविभावनः :  - जो 'श्री' वैभवाचे विभाजन करतो, सर्वास अर्पण करतो तो श्रीविष्णु. प्रत्येक जीवाच्या योग्यते प्रमाणें भगवान् विष्णु त्यांना बाह्य व अंतर्गत असे वैभव देतो. श्रीविष्णु हाच स्वतः कर्मसिद्धांतरूप असल्याने सर्व कर्मांचे फल तोच देत असतो म्हणून तो श्रीविभावन (कर्मफलदाता) आहे.
(६०) श्रीधरः :  - श्रीविष्णु लक्ष्मीला नित्य आपल्या हृदयाशी ठेवतात. म्हणजेच ते आत्मतत्व सदैव आपल्या पूर्णतेने व अपारशक्तिने युक्त असते.
(६१) श्रीकरः :  -जो ’श्री’ प्रदान करतो.[1] जे भक्त त्याचे सतत स्मरण करतात ध्यान चिंतन करतात त्या भक्तांचे तो नेहमीच कल्याण (श्री) करतो.
(६१) श्रेयः :  - भगवान् नारायण हाच मोक्षस्वरूप ध्येय आहे व मार्गही तोच आहे. तो आपल्या भक्तांना शारीरिक आसक्ती, मानसिक आंदोलने व बौद्धिक अस्वस्थता यापासून पूर्ण मुक्तता (मोक्ष) प्रदान करतो.
(६१) श्रीमान् : जो सर्व वैभवयुक्त आहे असा. तो सर्व संपत्ती, सामर्थ्य व सौंदर्य यांचा स्वामी आहे सर्व’श्री’चा तो स्वामी असल्याने तिची सर्व भव्यदिव्यताही त्याच्याच ठिकाणी वास करते.
(६१) लोकत्रयाश्रयः :  - तीनही लोकांचे आश्रयस्थान. ही तीन विश्वे म्हणजेच अनुभव विश्वे होत (जागृत-स्वप्न-सुषुप्ति) व त्यांचा आधार आहे आत्मतत्व. जर ते आत्मतत्व आपल्यामध्ये नसेल तर आपल्याला कुठलाही अनुभव घेता येणार नाही. आत्मस्वरूप नारायण म्हणजेच 'वस्तु निरपेक्ष जाणीव'.
डॉ. सौ. उषा गुणे.


[1]   श्रियंकरोति इति श्रीकरः । जो कल्याण प्रदान करतो तो.

No comments: