30 September, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ७३


श्लोक ७३
स्तव्यः स्तवप्रियः स्तोत्रं स्तुतिः स्तोता रणप्रियः 
पूर्ण पूरयिता पुण्यः पुण्यकीर्तीरनामयः  ।।
(६७) स्तव्यः :  - ज्याला सर्व स्तुती अर्पण होतात असा, कारण तोच स्तुती करण्यास सर्वथा योग्य आहे. परंतु त्याचेकडून स्तुती केली जाईल असे (त्याचेपेक्षाही श्रेष्ठ) कोणीही नाही. सर्व त्याची स्तुती करतात परंतु तो कुणाची स्तुती करू शकत नाही. जीव त्या आत्म्याला आवाहन करतो परंतु आत्मा अज्ञानी जीवाला आवाहन करत नाही.
(६८०) स्तवप्रियः :  - भक्ताच्या हृदयातील प्रेमळ स्तोत्र गायनानें ज्याला आवाहन केले जाते असा. जेव्हा भक्त परमेश्वराची स्तुती करतांना अत्यंत तन्मय होऊन जातो तेंव्हा विषय, भावना अगर विचारांशी आसक्त झालेले त्याचे शरीर मन व बुद्धि हळूहळू शांत होऊ लागतात, अशा शांत अवस्थेत, अत्यंत भक्तीपूर्ण अंतःकरणाने भक्त भगवंताच्या स्वरूपाशी आत्मस्थितीशी एकरूप होतो. त्या अवस्थेमध्ये भक्त आपल्या अवस्थेतूनच उच्च अवस्थेच येतात व जाणीवेच्या दिव्य स्वरूपांत, परमात्मा नारायण स्वरूपांत प्रवेश करतात.
(६८) स्तोत्रम् :  - स्तुतीगीत. ज्या स्तोत्रामध्ये भगवंताचे दिव्य स्वरूप वर्णिलेले असते ते स्तोत्रही तो स्वतःच आहे, कारण ते स्तोत्रामधील शद्ब भक्ताला परमसत्याच्या स्वरूपापर्यंत नेऊन पोहोचवितात. जर भक्ताचे अंतःकरण अत्यंत भक्तिपूर्ण असेल व त्याचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर ते स्तोत्र त्याला भगवंतापर्यंत नेतेच यात कांहीच अशक्य नांही. कारण नाम आणि नामी हे एकच असतात असा अनुभव आहे.
(६८) स्तुति:  - भगवंताची आळवणी. अत्यंत दिव्य, सुंदर अशी स्तुती केवळ त्याच्याच कृपादृष्टीने अवतरते म्हणून तो स्वतःच स्तुती आहे.
(६८) स्तोता :  - जो स्वतःच स्तुती अगर स्तोत्र म्हणणारा आहे असा. भगवंताचे शांति, प्रेम, सौंदर्य नीतिमानता इत्यादि गुण ज्या स्तुतीमध्ये वर्णिलेले आहेत असे स्तोत्र अत्यंत भक्तीपूर्ण अंतःकरणाने गातागातां भक्त स्वतःच त्यामध्ये विरघळून जातो व स्वतःच भगवंतस्वरूपच होऊन जातो, म्हणून भक्तरूपाने तो स्वतःच स्तोता आह. तसेच अशा एकरूप झालेल्या भक्ताची भगवंत स्वतःच स्तुती करतात व म्हणतात, ' तो मला अत्यंत प्रिय आहे.'[1]
(६८) रणप्रियः :  - ज्याला 'रण' अत्यंत प्रिय आहे असा. म्हणूनच दुष्टांचा विनाश व सज्जनांचे रक्षण करण्याकरतां त्यानें सतत सुदर्शन चक्र व गदा धारण केलेली आहे. याठिकाणी रण म्हणजे उन्नती करता सतत केलेला संघर्ष होय.
(६८) पूर्णः :  - परिपूर्ण - ते अनंत तत्व सदा परिपूर्ण व सम रहाते जरी सर्व वस्तुजात त्याच्यामधूनच उत्पन्न [2] होतांना दिसते तरी ते तत्व मुळीच उणे होत नाही तर सतत तसेच रहात. श्रीनारायण आपल्या ऐश्वर्यानें व सामर्थ्यानें सदा परिपूर्ण आहे. अंतरंगातील व बाह्यविश्वातील ऐश्वर्याने सदा परिपूर्ण असा तो लक्ष्मी पती आहे.
(६८) पूरयिता :  - पूर्ती करणारा - अनन्य भक्तांच्या सर्व इच्छा तो पूर्ण करतो तो श्रीहरी.
(६८) पुण्यः :  - अत्यंत पवित्र - जेव्हा भक्ताचे अंतःकरण भगवंताच्या दिव्य, भव्य स्वरूपाच्या आठवणीनी भरून जाते त्यावेळी आपल्या भक्ताच्या अंतरातील सर्व पाप भगवंत दूर करतो. भगवंत स्वतः पुण्यस्वरूप आहे त्यामुळेच जेथे जेथे त्याला आवाहन केले जाते तेथील अपवित्रता हमखास दूर जातेच.
(६८) पुण्यकीर्तिः :  - त्याची कीर्ति पुण्यकारक आहे. तो अत्यंत पवित्र आहे अशीच त्याची कीर्ति आहे व जो त्याची अशा स्वरूपात स्तुती भक्ती करतो तो स्वतःच पवित्र होऊन जातो. जेव्हा भक्ताचे अंतःकरण भगवंताच्या दिव्यनाम रूपाशी एकरूप होते तेंव्हा त्याच्यातील पाशवी वासना नाश पावून दूर भिरकाविल्या जातात.
(६८) अनामयः :  - ज्याला कुठलीही शारीरिक मानसिक व्याधी नाही असा. कारण त्याचे स्वरूपच शुद्ध व निष्कलंक असे आहे. तो कुठल्याही कर्मपाशांत बद्ध होत नाही त्यामुळे कर्मामधून निर्माण होणारे मानसिक अस्वास्थ व शारीरिक व्याधी आपल्यासारख्या सामान्य माणसास त्रास देतात तशी त्याला स्पर्शही करूं शकत नाहीत.
डॉ. सौ. उषा गुणे.



[1]  मे प्रियः । (गीता १२-१४)
[2]  पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते 

No comments: