12 September, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ६७

श्लोक ६७
उदीर्णः सर्वतश्चक्षुरनीशः शाश्वतस्थिरः 
भूशयो भूषणो भूतिर्विशोकः शोकनाशनः ।।
(६२) उदीर्णः :  - सर्वाचे पलीकडे असणारा. (परात्पर). तो अनंत असल्याने सांत जगताच्या पलीकडे आहे तसेच सर्व मर्यादा व परिवर्तनांच्याही पलीकडे आहे. म्हणूनच तो अ-क्षर आहे. आपल्या अनुभव साधनांच्या पलीकडे असलेला आत्मस्वरूप श्रीनारायण निर्विकार व शद्बातीत सत्याचे स्वरूपांत स्वतःस आनंदाने प्रकट करतो. तोच सर्व आकारांनी व विकारांनी पूर्ण अशा विश्वाचा आधार आहे.
(६२) सर्वतश्चक्षुः :  - ज्याला सर्वत्र डोळे आहेत असा. गीता सांगते, 'त्या सत्यस्वरूप परमात्म्याला सर्वत्र पाय, सर्वत्र हात, [1] सर्वत्र डोळे, शिर व मुख आहेत. ज्ञानस्वरूप श्रीविष्णु हा सर्वामध्ये आत्मस्वरूपानें रहात असल्याने जगामध्ये सर्व डोळयांमधून, सर्वठिकाणी, सर्ववेळी तोच पहात असतो. तो नसेल तर सर्व डोळे आंधळे राहतील, तो अंतर्यामी रहात असेल तरच डोळे पाहू शकतात, म्हणून डोळे त्याचेच आहेत.
(६२) अनीशः :  - ज्याला कोणीही स्वामी नाही असा. तोच सर्वांचा महान स्वामी आहे. नारायणोऽपनिषत् म्हणते, [2]'त्याचेवर कोणाचे स्वामीत्व नाही.'
(६२) शाश्वतास्थिरः :  - जो नित्य आहे व स्थिर आहे असा. त्याचे मध्ये कुठलाही विकार (बदल) होत नाही म्हणून तो नित्य आहे व स्थिरही आहे. शरीर बदलते. मनांत परिवर्तन होते. बुद्धिच्याही नवीन कक्षा निर्माण होतात परंतु ह्या सर्वांना ज्ञानाच्या प्रकाशाने प्रकाशित करणारे आत्मतत्व तसेच स्थिर रहाते. शरीरामध्ये बालपण, तारूण्य, प्रौढत्व किवा वृद्धत्व येते परंतु सर्ववेळी ज्ञानस्वरूप आत्मा तसाच अविकारी रहातो म्हणून तो शाश्वतही आहे व विकारहित असल्यामुळे स्थिरही आहे.
(६२) भूशयः :  - भूमिवर शयन करणारा - असा या संज्ञेचा शद्बशः अर्थ होतो व त्याचा संदर्भ प्रभू रामचंद्र लंकेकडे जात असतांनां समुद्र तटावर निजले होते ह्या रामायणातील कथेशी आहे, किवा तो भूपति असल्याने भूमिवर शयन करतो [3] असाही होईल. किवा गर्भितार्थ ज्याचेमध्ये भूमि प्रलयाचे वेळी शयन करते तो असाही होईल.
(६२) भूषणः :  - जो भूमीला भूषवितो तो. प्राकृतिक दृष्टिने पाहिले असतां त्याच्या अनंत सौंदर्यपूर्ण सृजनातून त्याने सृष्टिस भूषविले आहे असे दिसते. व भावनिक दृष्ट्या त्याने ह्या जगास प्रेम व इतर अनेक सुंदर भाव अर्पण केलेले आहेत. बौद्धिक दृष्ट्या तोच सर्व सुंदर व उदात्त विचारांच्या मागे असतो. त्यामुळे मानवी जीवन इतिहास व संस्कृति समृद्ध झाली आहे. आपल्या सर्व अवतारांमध्ये भगवान् नारायणानेच् या जगताला भूषविले आहे.
(६३०) भूतिः :  - शुद्ध अस्तित्व मात्र असा (सत्तामात्र). तसेच भूति म्हणजे ऐश्वर्य. म्हणून तो सर्व विभूतिंचे आश्रयस्थान (खजिना) आहे.
(६३) विशोकः :  - श्रीनारायण सर्व दुःखातीत आहे. तो आत्मस्वरूप असल्याने जडाच्या सर्व आवरणांचे पलीकडे असतो. शरीर - मन -बुद्धिच्या स्तरावर नेहमीच अस्थिरता असते. त्यामुळेच त्याचेमध्ये दुःखही असतेच. तो आत्मा त्यासर्वा पलीकडे असल्यानें त्या परमसत्यास 'विशोक' म्हणजेच पूर्ण आनंदमय असे म्हटले आहे. त्याच्या ह्या परमानंद (नित्यानंद) परमसमाधानी, वासनातीत स्वरूपाला दुःखाचा संसर्गही होत नाही व त्याच्या स्वरूपास इजा करू शकत नाही.
(६३) शोकनाशनः :  - भक्तांच्या सर्व दुःखांचा नाश करणारा. जो दुःखी अहंकेंद्रित बुद्धिचा तिच्या अर्थहीन, क्षणभंगुर, यातनामूलक आसक्तिमधून उद्धार करतो व तिला तिच्या दिव्य स्वरूपाचे सत्यज्ञान करून देतो तो. तो भगवान् श्रीविष्णु शोक नाशन आहे. 'जे माझी अन्यन्यतेने भक्ति करतात त्यांचा मी ह्या संसार सागरातून त्वरित उद्धार करतो'[4] असे अभिवचन भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये दिलेले आहे.
डॉ. सौ. उषा गुणे.


[1]   सर्वतः पाणिपादं तत्सर्वतोऽक्षि शिरोमुखम् ।
[2]   तस्येश कश्चन ।
[3]  भू शेते अस्मिन् इति भूशयः  ।।
[4]  तेषां अहं समुद्धर्ता मृत्युसंसार सागरात्  । भवामि नचिरात् पार्थ मय्यावेशितचतसाम्  ।।

No comments: