15 September, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ६८

श्लोक ६८
अर्चिष्मानर्चितः कुंभो विशुद्धात्मा विशोधनः 
अनिरूद्धोऽप्रतिरथः प्रद्युम्नोऽमिताविक्रमः  ।।
 (६३) अर्चिष्मान् :  - तेजःपुंज. श्रीनारायण परमात्मस्वरूप असल्यानें सर्व तेजाचे उगमस्थान आहे. कठोपनिषदांतही [1] हेच सत्य प्रतिपादले आहे. त्याचे प्रकाशन सूर्य करूं शकत नाही, चंद्रही करूं शकत नाही, तारका किवा विद्युत्‌ही करू शकत नाही, तर हा अग्निचा प्रकाश काय करील ? कारण त्याच्या प्रकाशानेच हे सर्व प्रकाशित झालेले आहे.
(६३) अर्चितः :  - जो भक्तांकडून नित्य पूजिला जातो तो. प्रत्यक्ष (सृष्टिकर्ता) ब्रह्मदेव व (संहारकर्ता) श्रीशंकरही त्या नारायणाचेच नेहमी पूजन करतात म्हणून त्यास अर्चित ही संज्ञा दिली आहे.
(६३) कुंभः :  - 'घट'. ज्याप्रमाणे एकाद्या पात्रात वस्तू ठेवल्या जातात त्याप्रमाणे त्याचेमध्ये सर्व विश्व रहाते, धारण केले जाते. सर्व वस्तू, सर्व घटना त्याच्यामध्येच असल्यानें कुंभ ही संज्ञा.
(६३) विशुद्धात्मा :  - अत्यंत शुद्ध आत्मस्वरूप असलेला. जेव्हा आत्मा सर्व वासनांपासून व विकारांच्या विक्षेपांतून मुक्त होतो तेंव्हा त्या विशुद्ध अवस्थेत सत्याची प्रतिती येते. म्हणून त्या परमात्म्याला 'विशुद्धात्मा' असे म्हटले आहे. तो सर्व साधनांपासून वेगळा अलिप्त, सर्व वासनां विकारांच्या खळबळीपासूनही अत्यंत अलिप्त असतो. तो तीनही गुणांच्या पलिकडे असतो म्हणजेच तो त्रिगुणातीत आहे, वासनातीत आहे. त्रिगुणांच्या तीन अवस्थांमधून निर्माण होणार्‍या संपूर्ण मायेच्या पसार्‍यापलीकडे तो असतो.
(६३) विशोधनः :  - जो अत्यंत शुद्ध करतो तो. त्याचे ध्यान केले असतां सर्व वासनांच्या क्षय होतो आणि अंतःकरण त्या वासना, तिच्या सवयी व त्यांचे विक्षेप यापासून पूर्ण मुक्त होते म्हणून तो भगवान् विष्णु विशोधन आहे. तो स्वतःच सर्व शुद्धतेचे, पावित्र्याचे उगमस्थान आहे व सर्व तीर्थांनाही पावित्र्य त्याचेमुळेच प्राप्त होते. त्याचे स्मरण केले असतां माणसाच्या अंतकरणातील सर्व पाप त्याचे परिणामस्वरूप सर्व विक्षेप व चंचलता यासहित निघून जाते व शुद्ध होते.
(६३) अनिरूद्धः :  - श्रीविष्णुच्या चार व्यूहांपैकी अनिरूद्ध हा चौथा व्यूह आहे. चार व्यूह या प्रमाणे. (१) वासुदेव (२) संकर्षण (३) प्रद्युम्न (४) अनिरूद्ध. या संज्ञेचादुसरा अर्थ जो कुठल्याही शत्रूकडून रोखला जात नाही असा.
(६३) अप्रतिरथः :  - ज्याला कोणीही शत्रू आव्हान करूं शकत नाहीत[2] किवा आव्हान करणारा कोणीही शत्रूच नाही असा तो अप्रतिरथ. श्रीनारायणास कोणीही शत्रू नाहीत. त्याच्या प्रेमामध्ये सर्व शत्रूत्वच नाहीसे होते.
(६४०) प्रद्युम्नः :  - द्युम्न - द्रविणम् अत्यंत समृद्ध भगवान् स्वतः श्रीपती आहेत. व आपल्या औदार्यानें ते भक्तांनाही समृद्धी व ऐश्वर्य प्रदान  करतात. तसेच प्रद्युम्न हा श्रीविष्णुचा ३रा व्युह आहे.
(६४) अमितविक्रमः :  - ज्याचे सामर्थ्य अपार आहे असा. परमात्मा श्रीनारायण सर्व शक्तिमान् आहे व त्याचे विरूद्ध कोणीही उभे राहू शकत नाही. दुसरा अर्थ - ज्याचे संक्रमण न मोजता येणारे आहे असा. श्रीविष्णुचा वामनावतारातील पराक्रम सर्व विदितच आहे.
डॉ. सौ. उषा गुणे.


[1]  (अ)  ज्योतिषामपि तज्जोति तमसः परमुच्यते । (गीता १३.१७)   (ब)  तत्र सूर्योभाति न चंद्रतारकं नेमा विद्युतो भान्ति कुतोऽयमग्नि  । तमेवभान्तं अनुभाति सर्वं तस्यभासा सर्वमिदं विभाति  ।। कठ २-५-१५
[2]   न विद्यते प्रतिरथः अस्य'

No comments: