24 September, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ७१

श्लोक ७१
ब्रह्मण्यो ब्रह्मकृत् ब्रह्मा ब्रह्म ब्रह्मविवर्धनः 
ब्रह्मविद् ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणाप्रियः  ।।
(६६) ब्रह्मण्यः :  - ब्रह्माचा मित्र. ब्रह्म शद्बामध्ये शास्र, तप, वेद, सत्य व ज्ञान यांचा अंतर्भाव होतो. श्री नारायण या सर्वांचा रक्षणकर्ता व मित्र आहे. तसेच येथे ब्रह्म म्हणचे 'जीव' असाही अर्थ होतो म्हणून तो सर्व जीवाचाही मित्र आहे.
(६६) ब्रह्मकृत् :  - तप आदी ब्रह्मांचा कर्ता. म्हणजेच जो सत्यातच जगतो, तप करतो तो. पूर्वीच्या संज्ञेत निर्देशिल्याप्रमाणे तो ब्रह्मकर्ता म्हणजेच वेदकर्ता आहे.
(६६) ब्रह्मा :  - सृष्टिकर्ता ब्रह्मदेव किवा संपूर्ण क्रियाशक्ति. या शक्तिस्वरूपाने श्रीनारायणच ब्रह्मदेवरूपाने  उत्पत्तिचे कार्य करतो.
(६६) ब्रह्म :  - व्यापक, सर्वापेक्षा महान्.[1] उपनिषदे घोष करतात की, 'ते सत्य ज्ञान व अनंत आहे.'[2] ते ज्ञान सर्व भेद भ्रमात्मक विरोधातून उद्धार करते, त्याच्या सर्व अंगाने ते शुद्ध असते. सर्व इंद्रिय प्रतीतीच्या पलीकडले असते, व त्याचाच प्रत्यय फक्त आत्म्यामध्ये स्वतःच घेता येतो ते ब्रह्म होय.[3]
(६६) ब्रह्मविवर्धनः :  - जो ब्रह्माचा विस्तार करतो तो. या ठिकाणी ब्रह्म शब्दाचा अर्थ होईल तप, वेद, सत्य व ज्ञान. ज्याने नारायणाची कृपा प्राप्त केलेली आहे व जो त्यास शरण गेलेला आहे तोच या सर्वांचा विस्तार करू शकतो.
(६६) ब्रह्मवित् :  - जो ब्रह्म जाणतो असा. ज्याने वेदांचा सर्व अंगासहित् अभ्यास करून स्विकार (आत्मसात) केला आहे असा. गीतेच्या १५व्या अध्यायांत् भगवान् श्रीकृष्ण उद्घोष करतात की , 'मी वेदांचा कर्ता व ज्ञाताही मीच आहे.'[4] केवळ ब्रह्मच ब्रह्म जाणू शकते. स्वप्न पहाणार्‍याला जागृत अवस्था कधीच प्रत्ययाला येणार नाही. व जागृत झालेला स्वप्नावस्थेत रहात नाही. जागृतावस्थेचा ज्ञाता अगत्यानें जागृतच असला पाहिजे. शरीर मन बुद्धिनें मर्यादित झालेला जीवात्मा जडाच्या बंधनापलीकडे ज्यावेळी पलीकडे जातो तेंव्हाच त्याला ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान होते. अशावेळी तो 'जीव' न रहाता प्रत्यक्ष ब्रह्मच होतो. म्हणजेच उच्च अवस्थेचे ज्ञान उच्च अवस्थेतच होते. श्री नारायण स्वतःच ब्रह्म असल्यानें तो ब्रह्माचा ज्ञाता ब्रह्मवित् आहे.
(६६) ब्राह्मणः :  - हे संपूर्ण भेदात्मक जगत् केवळ विपरीत ज्ञानानेच परब्रह्मावर भासमान होते व ज्याला परमात्मस्वरूपाचे सत्यज्ञान अनुभवास येते तो ब्राह्मण होय.[5] त्याला झालेले हे ज्ञान त्याने इतरांना अत्यंत निष्काम भावनेनें व अदम्य उत्साहानें द्यावे व ज्ञान प्रसार करावा हे त्याचे कर्तव्य आहे. जन्माने कोणीही ब्राह्मण होऊ शकत नाही. विश्वामित्र आदीऋषी तपाने व दिव्यज्ञानानेच ब्राह्मणत्वाला पोहोचले असे पुराण सांगते. श्री नारायणही अशाच तेजस्वी ब्राह्मणांचे प्रतीक आहे. तो ज्ञानदानानेच त्यांची सेवा करतो.
(६६) ब्रह्मी :  - जो ब्रह्मासहित आहे तो. ब्रह्म ह्याचा अर्थ पावित्र्य, वेद, सत्य, व दिव्यज्ञान.
(६६) ब्रह्मज्ञः :  - जो नित्य ब्रह्मस्थितीतच असतो म्हणूनच ब्रह्म जाणतो तो ब्रह्मज्ञ. श्रीनारायण ब्रह्मस्वरूपच असल्यानें त्याचे स्वतःचे स्वरूप तोच जाणू शकतो. इतरांना ते तसे जाणतां येत नाही. जागा झालेलाच जागृती जाणूं शकतो, झोपेत असलेला किवा स्वप्नांत असलेला जागृतावस्था जाणूं शकत नाही. जागेपणीच त्याला ज्ञान होईल.
(६७०) ब्राह्मणप्रियः :  - ब्राह्मणांना (ब्रह्म जाणणाऱ्यांना) प्रिय असलेला व ज्याला सत्यज्ञानी 'ब्राह्मण' प्रिय आहेत असा. ज्यांना दिव्यज्ञान झाले आहे ते ब्राह्मण, केवळ जातीवाचक नव्हे. अशांना नारायण प्रिय आहे व तोही अशा ब्राह्मणांवर प्रेम करतो.
डॉ. सौ. उषा गुणे.



[1]   बृंहत्वात् ब्रह्म ।
[2]   सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म । (तैतिरीयोपनिषत् २-१)
[3]   आत्मसंवेद्य तज्ज्ञानं ब्रह्म संज्ञितम् । विष्णुपुराण (६-७-३)
[4]   वेदान्तकृत वेदविदेवचाहम् । गीता १५-१५
[5]   ब्रह्मज्ञानी तु ब्राह्मणः ।

No comments: