18 September, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ६९

श्लोक ६९
कालनेमिनिहा वीरः शौरिः शूरजनेश्वरः 
त्रिलोकात्मा त्रिलोकेशः केशवः केशिहा हरिः  ।।
(६४) कालनेमिनिहा :  - कालनेमि या असूराचा विनाश करणारा असा. 'काल' ही बुद्धिने निर्माण केलेली संकल्पना आहे. व तो परमात्मा बुद्धिच्या अतीत असल्यानें तो बुद्धि निर्मित कालाचा नाश करणारा आहे.
(६४) वीरः :  - विजयी शूर. जो नित्य विजयी पावतो असा.
(६४) शौरिः :  - शूरसेनाचे कुलांत उत्पन्न झालेला तो शौरी. पुराणांत ज्याला उत्कलदेश असे म्हटलेले आहे. तेथे जगन्नाथाच्या रूपाने तो अवतरला. त्याचे सामर्थ्य अप्रतिहत असल्यानें तो अत्यंत शूर आहे.
(६४) शूरजनेश्वरः :  - शूरजनांचा स्वामी. श्री नारायण सर्व सामर्थ्ययवान शूरांमध्येही अग्रगण्य आहेत म्हणून सर्व विजयी पुरुष त्याचीच प्रार्थना करतात. इन्द्रादि देवही त्याचेचपासून सामर्थ्य प्राप्त करून घेतात. अशा सामर्थ्याचे तो उगमस्थान आहे.
(६४) त्रिलोकात्मा : - सत्यस्वरूप तीनही लोकांचा आत्मा. हे तीन लोक म्हणजे तीन अनुभव क्षेत्रे होत, जागृत, स्वप्न, सुषुप्ति. व ह्या तीनही क्षेत्रांचा अनुभव शुद्ध चैतन्याच्या आधारानेच घेता येतो. आत्मा प्रकाशाच्याच साहाय्याने जागृत, स्वप्न पाहनारा वा झोपलेला मनुष्य आपल्या अनुभवांचे ज्ञान करून घेतो. म्हणूनच श्रीनारायण तीनही लोकांचा स्वामी - त्रिलोकात्मा आहे.
(६४) त्रिलोकेशः :  - तीनही लोकांचा स्वामी, ईश. श्रीनारायणाच्याच आधाराने सर्व कर्म प्रत्यक्षांत येते व त्याचे शिवाय कर्म अशक्यच आहे. म्हणून त्याला कर्माध्यक्ष म्हटले जाते. जेव्हा जीचनाचे अस्तित्व शरीरांत असते तेंव्हाच सर्व प्रकारचे अनुभव घेतां येतात. व जेव्हा ते शरीरातून जाते तेंव्हा सर्व कर्म थांबते. अर्थात श्रीनारायणच प्राणीमात्रामधील चैतन्य प्रकाश असल्यानें तीनही लोकांचा स्वामी आहे.
(६४) केशवः :  - ज्याचे केस लांब व सुंदर आहेत असा. हे श्रीकृष्णाचे नांव प्रचलित आहे. त्याचे हीच त्याची तजस्वी किरणे आहेत व ती चंद्र सूर्य इत्यादि विश्वातील तेजोगोलांनाही प्रकाशित करतात म्हणून  महाभारतात म्हटले आहे, 'चंद्र सूर्यांना प्रकाशित करणारी किरणें माझे केश आहेत म्हणून विद्वान ब्राह्मण मला 'केशव' म्हणतात. तसेच क म्हणजे सृष्टिकर्ता ब्रह्मा, इश म्हणजे महेश संहार कर्ता व हे दोन्हीही श्रीविष्णु (व) पासून उत्पन्न झाले म्हणून श्रीविष्णु 'केशव' होय.
(६४) केशिहा :  - केशी असूराचा नाश करणारा तो केशिहा.
(६५०) हरिः :  - हरण करणारा. या ठिकाणी भगवंताला 'नाश करणारा' अशी संज्ञा दिली आहे. तो श्रीहरि भ्रमात्मक मूल्यांचा नाश करतो. या भ्रमाने मनुष्याने आपल्या आयुष्यात अंतर्गत संघर्ष व परिणामतः बाह्य जगाशी बेसूर संबंध निर्माण केले आहेत. आपल्या दिव्य स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे मनुष्य आपल्या व इतरांच्याही जीवनांत भ्रम व दुःख निर्माण करतो त्यालाच संसार म्हणतात. श्रीनारायण आपल्या भक्तजनांचे हे संसारदुःख हरण करतो नाश करतो म्हणून तो 'हरि' आहे.
डॉ. सौ. उषा गुणे.

No comments: