21 September, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ७०

श्लोक ७०
कामदेवः कामपालः कामी कान्तः कृतागमः 
अनिर्देश्यवपुर्विष्णुर्वीरोऽनन्तो धनंजयः  ।।
(६५) कामदेवः :  - प्रेमास्पद स्वामी. जो अनन्य भक्त आहे त्याचे मन भगवंताच्या दिव्य रूपगुणांशी तन्मय होणे आवश्यक असते. परमेश्वराच्या प्रेममय मनोहारी प्रभावानेच त्याची खरी पूजा होत असते. ज्याला आपले चारही पुरुषार्थ उत्तम तर्‍हेने साध्य करावयाचे आहेत त्याला भगवंतावर प्रेम करावेसे वाटतेच. व तो प्रेमभावनेने त्याची पूजा करतो. या संज्ञेचा आणखी एक अर्थ होतो - प्रद्युम्न. प्रद्युम्न हा कामदेवाचा अवतार आहे.
(६५) कामपालः :  - आपल्या खर्‍या भक्तांच्या सर्व मनोकामनांची पूर्ती करणारा. जे भक्त अत्यंत प्रामाणिक श्रद्धेनें व त्याच्यावरील अनन्य प्रेमाने त्याला शरण जातात त्यांच्या अंतःकरणातील खोल इच्छा भगवंताकडून पूर्ण केल्या जातात. हीच संकल्पना आणखी एका वेगळ्या विवेचनाद्वारे बलरामाकरतांही वापरली जाईल कारण बलराम हा हलायुध (नांगरधारी) असल्यानें कामनांची पूर्ती करणारा कामपालच आहे. तसेच जो प्रेमीजनांचे (भक्तांचे) पालन करतो तो कामपाल असाही या संज्ञेचा अर्थ होईल.
(६५) कामी :  - ज्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेत असा, अंतःकरणातील अपूर्णतेचे व्यक्त स्वरूप म्हणजेच इच्छा होणे. अशाप्रकारे स्वतःमध्ये अपूर्णता वाटणे हे आत्मस्वरूपाचे अज्ञान होय. व हे सत्याचे अज्ञान अनेक विपरीत तर्‍हेचे ज्ञानही निर्माण करते. परंतु श्री नारायण हाच आत्मा आहे व तोच सत्य आहे. त्याचेमुळेच सर्व अज्ञान त्याचे ठिकाणी तात्काळ नाहीसे होते. त्यांचेमध्ये कुठलीही अपूर्णता, इच्छा तृप्त करण्याची वासना राहूच शकत नाही. म्हणून तो पूर्णकाम आहे. काही टिकाकार या संज्ञेचा बरोबर विरूद्ध अर्थ लावतात. कारण संस्कृतभाषेप्रमाणे कामी या संज्ञेचा अर्थ होतो ज्याला कामना (इच्छा) आहेत असा. त्यादृष्टीने पाहतां, श्रीविष्णु परब्रह्मस्वरूप असूनही त्याने विविधतेनें भरलेल्या विश्वाची उत्पत्ती करण्याची कामना केली म्हणून तो 'कामी' असे म्हणता येईल. उपनिषदे उद्‌घोष करतात की 'सः अकामयत् ।' त्याने इच्छा केली. असंख्य नामरूपात्मक वस्तूजाताने संपन्न विश्व सृजन करण्याची इच्छा ही त्या परब्रह्माची व्यक्त झालेली भासमान मायेची क्रीडा होय.
(६५) कान्तः :  - अत्यंत मनोहारी सुंदर रूप असलेला. सौंदर्याचीही सुंदरता असलेला श्रीविष्णु. भगवंताच्या सर्व अवतारांमध्ये त्याचे रूप अत्यंत सुंदर मनोवेधक असल्याचे वर्णिलेले आहे. संस्कृत भाषेप्रमाणे कः म्हणजे ब्रह्मदेव व त्याचाही प्रलयांत अन्त करतो तो कान्त असा या सज्ञेचा दुसराही अर्थ होऊ शकतो.
(६५) कृतागमः :  - आगमांचा कर्ता. श्रृती व स्मृती यांना मिळून आगम[1] म्हणतात. मागील कान्त या संज्ञेच्या योग्य संदर्भाप्रमाणे तो ब्रह्मदेवाचाही प्रलयकर्ता ठरतो. त्यालाच जोडून कृतागम म्हणजे कृतयुगाचा निमॉणकर्ता असा या संज्ञेचा अर्थ इतर काही विवेचक करतात.. ह्याचाच अर्थ असा की 'भगवंतामध्येच सर्व जगत् विलीन होते व त्याचेच मधून ते पुन्हा निर्माण होते.
(६५) अनिर्देश्यवपुः :  - ज्याचा आकार किवा अस्तित्व वर्णन करून सांगता येत नाही असा, ज्याची व्याख्या करता येत नाही असा. तो शुद्ध परमात्मस्वरूप असल्याने तीनही गुणांचे मूलकारण व पंचमहाभूतांचेही पलीकडला आहे. मनुष्याच्या शरीर मन बुद्धिमधून तोच प्रकाशित करत असल्यानें त्याचे वर्णन अगर व्याख्या मन बुद्धिच्या सहाय्यानें करताच येणार नाही.
(६५) विष्णुः :  - सर्व व्यापी. जो सर्व विश्वाला व्यापतो तो विष्णु. विश्वरूपदर्शनाचे अत्यंत भयचकित अंतःकरणानें [2] वर्णन करतानां गीतेच्या ११व्या अध्यायांत अर्जुनानें त्याचे 'सर्वव्यापी' असे वर्णन केले आहे.
(६५) वीरः :  - सामर्थ्यवान्. 'वी' ह्या धातूचे - जन्म देणे, चमकणे, असणे, विलीन करणे, व गतिमान होणे असे अर्थ होतात. ज्याच्याजवळ या सर्व शक्ती आहेत तो 'वीर' श्रीविष्णु होय.
(६५) अनंतः :  - अंत नसलेला. ज्याला वस्तू, स्थल, कालाचे बंधन नाही तो अनंत. त्या सत्याचे पूर्ण स्वरूप कुणालाच समजूं शकत नाही. स्थलकालांनी सीमित वस्तूंना अंत असतो व त्याचे एका स्थितीतून दुसर्‍या स्थितीत रूपांतर होते. परंतु अनंत हे बंधनातीत असल्याने स्वभावतःच अपरिवर्तनीयच रहाते. म्हणूनच श्रीनारायण अनंत आहे.
(६६०) धनंजयः :  - ज्याने आपल्या सामर्थ्यानें आपल्या देशाच्या समृद्धिकरतां विपुलसंपत्ति मिळवलेली आहे तो धनंजय होय. अर्जुनाने अशा तर्‍हेने पराक्रम करून पुष्कळच संपत्ति देशाला मिळवून दिली म्हणून गीतेमध्ये त्याला भगवान् म्हणतात ,'पांडवांमध्ये मी धनंजय अर्जुन आहे'.[3]
डॉ. सौ. उषा गुणे.



[1]   योगोज्ञानं तथा सांख्यं विद्या शिल्पादि कर्मच । वेदाः शास्त्राणि विज्ञानं सर्वमेतत् जनार्दनात् । - व्यास
[2]   द्यावा पृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयैकेन न दिशश्च सर्वाः  ।। गीता ११-२०संपूर्ण अंतरिक्ष, पृथ्वी व त्यामधील अंतर तुझ्यामुळेच व्याप्त आहे. तुझ्यामुळेच सर्व दिशाही व्यापून गेल्या आहेत.  त्या सर्वव्यापी अवर्णनीय नारायणाच्या भव्य स्वरूपाचा अनुभव अर्जुन वर्णन करीत आहे.
[3]  पांडवानां धनंजयः । (गीता १०.३७)

No comments: