09 September, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ६६

श्लोक ६६
स्वक्षः स्वङ्गः शतानन्दो नन्दिर्ज्योतिर्गणेश्वरः 
विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिश्छिन्नसंशयः  ।।
(६१) स्वक्ष:  - अत्यंत शोभनीय नेत्र (अक्ष) असलेला असा श्री विष्णु.[1]
(६१) स्वङ्गः :  - अत्यंत सुंदर अवयव (अंगे) असलेला भगवान् श्रीविष्णु आपल्या सौंदर्याने आपल्या प्रिय भक्तांचे चित्त हरण करतो.
(६१) शतानन्दः :  - असंख्य आनंदाचे अनुभव देणारा असा. तो स्वतःला शतावधी जीवांमध्ये विभक्त करतो व त्यांच्या इंद्रिये व विषयांच्या अनुभवांतून स्वतःला प्रकट करतो. त्या त्या इंद्रिंयांच्या अनुभव कक्षेतून मिळणारे हजारो आनंदाचे संवेदन त्याचेचमुळे असते म्हणून तो 'शतानंद' आहे.
(६१) नन्दिः :  - परमआनंद. परमात्मा श्रीविष्णु आनंद स्वरूप आहे म्हणून त्यास  'नंदी’ म्हटले आहे.
(६१) ज्योतिर्गणेश्वरः :  - अंतरिक्षातील सर्व नक्षत्रांचा स्वामी श्रीनारायण. जीवनातील तेजस्वी गोष्टींना तेज देणारा तो विष्णु आत्मस्वरूप आहे. प्रत्यक्ष सूर्यालाही मिळालेले तेज हे त्या परम दैदिप्यमान आत्मतत्वाचेच तेज आहे. त्याच्या आत्मतेजाचे वर्णन करून कठोपनिषत् म्हणते, त्याच्या तेजामुळे हे सर्व प्रकाशमान् होते. जेव्हा तो प्रकाशमान होतो तेव्हा सर्व प्रकाशमान होतात. त्याच्या प्रकाशाने सर्व प्रकाशतात.[2]
(६२०) विजितात्मा :  - ज्याने सर्व इंद्रिये जिंकली आहेत असा. तसेच ज्या भक्ताने आपल्या इंद्रियासक्तीमधून स्वताःची मुक्तता करून घेतली आहे त्यालाच परमशांतीमध्ये आत्मस्वरूप श्रीनारायणाचा अनुभव येतो.
(६२) विधेयात्मा :  - जो आत्मतत्वाच्या अधिपत्याखाली रहातो किवा जो आपल्या भक्तांच्या प्रेमाच्या अधिपत्याखाली रहाण्याचे मान्य करतो तो 'विधेयात्मा' होय. कांही टिकाकार या संज्ञेची अ-विधेयात्मा अशी फोड करतात. त्याप्रमाणे अर्थ होतो ज्याचे दिव्यस्वरूप अत्यंत अगाध आहे तो नारायण. जो अनंत स्वरूप असल्यानें कुठल्याही विधीनें बंद्ध होत नाही. तर त्याचेच इच्छेने सर्व बांधले गेले आहेत तो अ-विधेयात्मा.
(६२) सत्किर्तीः :  - विशुद्ध किर्ती असलेला नारायण. तसेच तो ’श्री’चा पति असल्याने सत्किर्ती आहे.
(६२) छिन्नसंशयः :  - ज्याचे सर्व संशय नष्ट झालेले आहेत, थांबले आहेत असा. आपण जो पर्यंत आपल्या जाणीवेने बुद्धिनें त्याला जाणण्याचा प्रयत्न करीत असतो तो पर्यंत आपल्या मनांत संशय रहाणारच. परमात्मा तर त्या बुद्धिचीही कार्यशक्ति आहे. जेव्हा भक्त आपल्या जाणीवेच्या पलिकडे जाईल तेंव्हा तो स्वतःच त्या आत्मस्वरूपाशी प्रत्यक्षतः त्वरित् पूर्णपणे एकरूप होल. आत्मस्वरूपच झाल्यानंतर  कुठलाही संशय रहात नाही. म्हणजेच आत्मस्वरूप नारायणामध्ये सर्व संशयांचा निरास होतो. गीतेमध्ये अर्जुन म्हणतो - त्यांचे सर्व संशय नष्ट झाले आहेत.[3]
डॉ. सौ. उषा गुणे.


[1]   शोभने पुण्डरिकाक्षे अक्षिणी अस्य इति स्वक्षः । - त्याच्या डोळ्याची तुलना कमळाच्या पाकळ्यांबरोबर केली जाते. कमलपुष्प हे अत्यंत सौंदर्ययुक्त असून ज्ञामाचे प्रतिक मानले जाते. अर्थात् श्रीनारायणाच्या नेत्रांमध्ये ज्ञानाचे तेज असल्याने सौंदर्यपूर्ण आहेत.
[2]   तमेव भान्तमनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति । कठ २.५.२५
[3]   स्थितोऽस्मिगतसंदेहः करिष्ये वचनं तव । मी आता स्थिर आहे, माझा संदेह नाहीसा झाला आहे व मी तुझ्या वचनाप्रमाणे करीन.

No comments: