27 September, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ७२


श्लोक ७२
महाक्रमो महाकर्मा महातेजाः महोरगः 
महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महाहविः  ।।
(६७) महाक्रमः :  - ज्याचा पदक्रम महान् आहे असा. आपल्या तीन पावलांनी तीनही लोकांचे ज्याने मोजमाप केले अशा वामनावताराची स्पष्ट आठवण ह्या संज्ञेमुळे आपल्याला होते. तसेच विष्णु ह्या शद्बाचा व्युप्तत्ति अर्थ दीर्घ पदक्षेप असलेला - सर्वव्यापी असाही होतो तोही येथे सुचित होतो. तो सर्वव्यापी असल्यानें तो सर्व ठिकाणी सर्वाचे आधी पोहोचतो.
(६७) महाकर्मा - महान् कर्म करणारा - विश्वाची उत्पत्ति स्थिती व लय करणे तसेच सत्यज्ञानाची प्रतिष्ठापना व प्रसार करणे ही कार्ये खरोखर महान आहेत व ही कार्ये तो स्वतः व महापुरुषांचेकडून घडवून आणतो. हे महापुरूष अत्यंत भक्तीभावनेनें त्याला शरण जातात व त्याचेशी प्रेमाने व प्राणानेही एकरूप होऊन त्याचे कार्य करतात.
(६७) महातेजाः :  - अत्यंत तेजोमय. सूर्य चंद्र, तारे, अग्नि ह्या सर्वांना त्याचेपासून तेजाची प्राप्ती होते असे उपनिषदे [1]द्‌घोषितात. त्याचेमुळेच सर्व तेजस्वी आहेत. तोच तेजाचे दान करतो. तसेच गीतेमध्येही भगवंत म्हणतात, 'ते परमतत्व सर्व प्रकाशाचाही प्रकाश आहे व सर्व तमाच्याही पलीकडे ते आहे.[2] तसेच ते पुन्हा उद्घोष करतात की, 'ज्या प्रकाशानें सर्व जगत् प्रकाशमान होते तो सूर्याच्या आतील [3]प्रकाश, चंद्राचा व अग्निचाही प्रकाश, तेज माझ्यापासूनच आहे हे समजून घे.' ज्ञानप्रकाश स्वरूप आत्माच ह्या ठिकाणी सूचित होतो. तोच श्रीविष्णु होय.
(६७) महोरगः :  - महान् सर्प. उरग म्हणजे सर्प. गीतेमध्ये भगवंत सांगतात ’अनंतश्चास्मि नागानाम्’  अनेक फणी असलेल्या नागांमध्ये मी अनंतनाग आहे. पांचफणी असलेल्या नागालाच शेषनाग म्हणतात. ह्याच अनंतनागावर भगवंत विश्रांती घेतात. गीतेमध्ये, 'मी सर्पांमध्ये वासुकी आहे असे भगवंत सांगतात. हाच वासुकी भगवान शंकरांचे करांगुलीमध्ये अंगठी बनून त्यांचे आभूषण झाला. आणि असे लहान स्वरूप असूनही तोच वासुकी क्षीरसागराचे मंथन करण्याकरतां मोठा दोरही झाला. अर्थात या विरोधाभासातून आपल्याला आठवण होते उपनिषदातील एका घोषणेची, ''अणोरणीयान् महतो महीयान्''. तो अत्यंत लहानाहूनही लहान आहे व मोठ्याहूनही मोठा आहे.
(६७) महाक्रतुः :  - महान् यज्ञ. परमात्मास्वरूपाची प्रतीती महान यज्ञाखेरीज संपूर्ण त्यागाखेरीज होणार नाही. व त्याग म्हणजे अहंचा जीवभावाचा त्याग. महायज्ञ म्हणजे अश्वमेघ यज्ञ असे परंपरेने समजले जाते. त्यामुळे अश्वमे यज्ञ हेच श्रीविष्णुचे स्वरूप आहे असे समजले जाते असे काही विवेचक म्हणतात.[4]
(६७) महायज्वा :  - ज्याने महान् यज्ञ केला आहे तो. रामावतारामध्ये त्यानें अश्वमेघ यज्ञ केला. त्याचे कृपादृष्टिनें व आशीर्वादानें सर्व यज्ञ सिद्धिस जातात. जो योग्य पद्धतीनें व श्रद्धेने यज्ञ करतो त्याला यज्वा म्हणतात.
(६७) महायज्ञः :  - महान् यज्ञ. गीतेमध्ये आपल्या विभूती सांगतानां श्रीकृष्ण सांगतात, 'यज्ञामध्ये मी जपयज्ञ आहे.'[5] श्री नारायण स्वतःच यज्ञस्वरूप आहे. म्हणून त्याचीच भक्ती करावी व त्याचीच कृपा प्राप्त करावी. येथे भगवंतांनी सर्व यज्ञांमध्ये जपयज्ञ श्रेष्ठ आहे असे सुचविले आहे. कारण सर्व यज्ञामध्ये ते एक आवश्यक साधन आहे व सर्व यज्ञ त्याच्यातच परिणत होतात सर्व यज्ञ प्रक्रियेमध्यें तेच एक दिव्यसूत्र मनामध्ये धारण केले जाते.
(६७) महाहविः :  - श्रेष्ठ हविद्रव्य - तो महान् यज्ञ तर आहेच परंतु यज्ञांत अर्पण केले जाणारे हविद्रव्यही तोच आहे. [6]गीतेमध्ये सांगीतले आहे की 'आम्ही ब्रह्म ब्रह्मामध्ये अर्पण करतो. अग्निही ब्रह्मच आहे व अर्पणही ब्रह्मच आहे'
डॉ. सौ. उषा गुणे.



[1]   नतत्रसूर्योभाति न चंद्रतारकं नेमा विद्युतो भान्ति कुतोऽयमग्नि । तमेवभान्तमनुभान्ति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति (मुंडक २.२.१०)
[2]   ज्योतिषां अपितज्जोति तमसः परमुच्यते । (गीता१३-१७)
[3]  यदादित्य गतं तेजो जगत् भासयतेऽखिलम् । यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् ॥ (गीता १५.१२)
[4]   हा यज्ञ अत्यंत सामर्थ्यवान राजेच करूं शकतात कारण त्यांत खूपच संपत्तीदान केले जाते, व असे शंभर यज्ञ केले असतां इंद्र पदा एवढी योग्यता प्राप्त होते व त्या राजाची सार्वभौम सत्ता व सामर्थ्य सिद्ध होते.
[5]  यज्ञानां जपयज्ञोऽस्मि । (गीता १०.२५)
[6]    ब्रह्मार्पणं ब्रह्म हवि ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम्  ।। गीता ४-२४

No comments: