02 April, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक २४

अग्रणीर्ग्रामणीः श्रीमान् न्यायो नेता समीरणः 
सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्षः सहस्रपात्  ।।

(२१८) अग्रणीः :  -जो आपल्याला आपल्या ध्येयशिखरापर्यंत मार्गदर्शन करतो तो. तसेच जो ह्या वाटचाली मध्ये नेहमीच अग्रभागी असतो, मार्गदर्शन करतो. तो परमात्मा सदैव पुढे चालतो व त्याच्या पावलावर पाऊल टाकून व सदैव त्याचेकडेच दृष्टी ठेवून आपण सश्रद्ध अंतःकरणाने वाटचाल केली तर तो आपल्याला खचितच आपल्या ध्येयाप्रत नेतो. म्हणूनच त्याला अग्रणी (नेता) असे म्हटले आहे.
(२१९) ग्रामणीः :  - जो ग्रामजनांचे नियमन करतो. त्यांना मार्गदर्शन करतो व पुढे नेतो तो श्री विष्णु. संस्कृतभाषेमध्ये 'ग्राम' शब्दाचा अर्थ अनेक वस्तूंचा संग्रह असाही होतो.
(२२०) श्रीमान् :  - श्री म्हणजे प्रकाश, तेज, अगर वैभव. परमात्म्यामध्ये या तीन्हींचे अस्तित्व सदैव असते म्हणूनच श्रीमान म्हणजेच भगवान् 'श्रीविष्णु'.
(२२१) न्यायः :  - या शब्दाचा व्यावहारिक सरळ अर्थ न्याय निवाडा. परंतु तत्वज्ञानाचे दृष्टिने न्याय या शद्बाचा अर्थ होतो तो तर्काधिष्ठित विचार व त्याच्या मननाची दिशा (युक्ति-सुसंगती), त्याच्या सहाय्याने आपल्याला श्रुतीनें निर्देशीत केलेले निर्विवाद सत्य अनुभवास येते, म्हणून त्यालाच न्याय असे म्हटले आहे.
(२२२) नेता :  - मार्गदर्शक. जो सृष्टितील सर्वजीवांचे रक्षण करतो, त्यांचा प्रतिपाळ करतो, त्यांची वृद्धि करतो व त्यांना मार्गदर्शन करतो तो. ह्या जगद्‌रूपी यंत्राचे संचालन व सांभाळ करतो तो नेता. (जगत् यंत्र निर्वाहक - शंकराचार्य)
(२२३) समीरणः :  - सृष्टितील सर्व जीवांच्या हालचाली जो उत्कृष्ट तर्‍हेने नियंत्रित करतो तो. भौतिक स्थूल शरीरामध्ये सर्व शारीरिक हालचाली ह्या पंचप्राणांमुळेच होत असतात. अर्थात सृष्टितील सर्व प्राणीमात्रांच्या सर्व हालचाली प्राण- स्वरूपानें जो घडवून आणतो तो 'श्री महाविष्णु'.
(२२४) सहस्रमूर्धा :  - ज्याला अगणित शीर्षे आहेत असा. सर्व प्राणीमात्र हे त्याचे अगणित आविष्कार आहेत; कारण तो स्वतःच त्यांच्या अनेक स्वरूपाने आविर्भूत झाला आहे, अर्थात सर्व शीर्षे ही त्याचीच आहेत. ज्याप्रमाणे एकाद्या कारखान्यात काम करणारे सर्व कर्मचारी हे मालकाचे 'हस्तक' मानले जातात तसेच हे समजायचे . याठिकाणी सहस्र या शब्दाने अगणित असा अर्थ घ्यावयास हवा.
(२२५) विश्वात्मा : - विश्वाचा प्रत्यक्ष आत्मा. सर्व प्राणीमात्रांचे अंतर्यामी असलेले सारभूत तत्व.
(२२६) सहस्राक्षः : - परमात्म्याच्या विश्वरूपाचे वर्णन करतांना भगवत् गीतेने या संज्ञेचे आलेखन केलेले आपल्याला  [1] दिसते.
(२२७) सहस्रपात् :  - महान् सत्याच्या अपरिमिततेचे अनंतत्वाचे वर्णन करताना ऋग्वेदांतील पुरूष सुक्तामध्ये अशाच तर्‍हेचे वर्णन आलेले आहे. 'सहस्रशीर्षापुरुषः सहस्राक्षः सहस्रपात्' तो पुरूष (२२४) सहस्रशीरे असलेला, (२२६) सहस्र डोळे असलेला, व सहस्र चरण (२२७) असलेला आहे. ह्या संज्ञांमधून असे सुचित होते की जाणीवेची साधन असलेली सर्व शीर्षे, कर्माचे साधन असलेले सर्व पद व संवेदनेचे साधन असलेले सर्व नेत्र हे त्या एका विचारक कर्ता व द्रष्ट्रा असलेल्या परमात्म्याची साधने आहेत. तोच एक अनंत ज्ञानस्वरूप, सर्वकाळी, सर्व स्थळी, सर्व आकार प्रकारातून व्यक्त स्वरूपांत येत असतो व तो आहे भगवान् श्री विष्णु.
डॉ. सौ. उषा गुणे


[1]   अनेक वक्त्रनयनं अनेकाद्धुत दर्शनम् - भगवत् गीता ११-१०
    रूंपं महत्ते बहूवक्त्र नेत्रम् .... बहुबाहूरूपादम् - भगवत् गीता २३

No comments: