10 April, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक २६

सुप्रसादः प्रसन्नात्मा विश्वधृग् विश्वभुग्विभुः ।
सत्कर्ता सत्कृतः साधुः जन्हुःर्नारायणो नरः ।।
(२३६) सुप्रसादः :  - जो महान दयेने परिपूर्ण आहे व सहजतेने व अतिशय थोडक्या भक्तिनेही पूर्ण समाधान पावतो असा तो 'सुप्रसाद' श्रीविष्णु. अगदी खरोखरच्या द्वेष भावनेनेंही जरी त्याचे सतत स्मरण केले तरीही त्याचा कृपाप्रसाद मिळू शकतो. भागवतामध्ये आपल्याला उल्लेख आढळतो की पूतनेने त्याच्यावर विषप्रयोग केला, कंसाने त्याला ठार मारण्याचे प्रयत्न केले आणि शिशुपालाने तर अनेकवेळा खोटेपणाने त्याचेवर आरोप केले. परंतु तरीही या सर्वांना शेवटी परमात्म्यानें सद्गती देऊन त्यांचा उद्धार केला. गीतेमध्ये भगवंतांनी स्वतःच सांगीतले आहे, '' अत्यंत श्रध्देने व सतत भक्तिपूर्वक अर्पण केले तर मी थोड्यानेही प्रसन्न होतो.''
पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति 
तदहं भक्त्युपहृतं अश्नामि प्रयतात्मनः  ।। गीता -२६
(२३७) प्रसन्नात्मा :  - अत्यंत विशुद्ध व पूर्णानंद स्वरूप आत्मा. परमात्मा हा अत्यंत शुद्ध आहे कारण त्याला ह्या प्रकृतीच्या दुःख निर्माण करणार्‍या गुणांचा स्पर्शही होवूं शकत नाही. प्रकृतिचे नियमन तर गुणांनी होत असते. गीतेमध्ये आपण वाचलेले आहे की जीवाच्या सर्व दुःखाचे कारण म्हणजे जीवाचे प्रकृतीशी, तिच्या वेगवेगळया अपूर्ण अवस्था (गुण) यांचे बरोबर झालेले तादात्म्य होय. परंतु परमात्म्याला मात्र त्याचा स्पर्शही नसल्यामुळे तो नित्य शुद्ध व अर्थात त्याचे प्रकृतीशी तादात्म्य नसल्याने नित्य आनंद स्वरूप आहे.
 (२३८) विश्वधृक् :  - सर्ववस्तू व सर्व प्राणीमात्राच्या अस्तित्वाचा अत्यंत समर्थ असा मूल स्त्रोत असल्यामुळे तोच परमात्मा ह्या विश्वाचा आधार आहे. विश्वातील सर्वाच्या सर्व संवेदना, विचार व भावनांचा तोच आधार आहे. परंतु येथे आधार व ज्याला आधार दिला जातो ते आधेय विश्व हे एकरूपच असल्यामुळे कितीही संख्यात्मक वाढ झाली तरी कोणतेही संकट उद्भवत नाही. लाटांचा आधार असा जो सागर तो त्या लाटांच्या वादळातील तांडवनृत्यानें अगर त्यांच्या वाढीने जराही विचलीत होत नाही हे आपण पहातोच.
(२३९) विश्वभुक् :  - जो सर्व विश्वाचा म्हणजेच पर्यायानें सर्व अनुभवांचा ( विश्व) स्विकार करतो व आस्वाद घेतो (भुक्) तों 'विश्वभुक्' मन, बुद्धिच्या माध्यमानें सिमित झालेला परमात्म्याचा अंश हाच सुखदुःखांचा अनुभव घेणारा (जीव) असतो.
     या संज्ञेचा दुसरा अर्थ होईल, ' जो प्रलयाचे वेळी सर्व नामे व सर्व साकार जगत आपल्यांत समाविष्ट करतो तो विश्वभुक्. तसेच दिव्य जाणीवेच्या स्तरावर एकरूपता अनुभवताना जागृत, स्वप्न, सुषुप्ति या अवस्थेतील सर्व अनुभव ओलांडलेले असतात म्हणूनच या पूर्णतेच्या अवस्थेला रूपकात्मक पद्धतीने 'विश्वभुक' असे म्हटले आहे. तिच्यामध्ये भेदावस्थेतील अनेकतेचे सर्व अनुभव लय पावतात.
(२४०) विभुः :  - जो स्वतःला अगणित आकाराच्या माध्यमातून प्रकट करतो तो. वस्तुतः ते अनंततत्व एकमेव, अद्वितीय व सर्वव्यापी सत्य आहे. परंतु मन, बुद्धिच्या माध्यमातून पाहिले असतां मायेमुळे त्याच सत्याचा अनेकत्वाने, विश्वरूपाने प्रत्यय येतो. तो अनंत आहे व बहुविधही आहे असे मुंडकोपनिषत् म्हणते (१-६) ह्याच कल्पनेच्या आधाराने पुराणामध्ये परमात्म्याचे अनेक अवतार व त्याच्या अनेक जगतातील दिव्य लीला वर्णन करून सांगितलेल्या आढळतात.
(२४१) सत्कर्ताः  :-  जो ज्ञानी साधुजनांचे गुण प्रकट करतो व त्यांचा सत्कार करतो तो. सज्जनांच्या स्वागताकरता त्याचे मंदिर सतत दिव्य प्रकाशाने उजळलेले असते, व तो स्वतः प्रेमाने त्यांच्या स्वागताचे नियोजन करतो.
(२४) सत्कृतः :  - ज्याचा सर्व सज्जनांकडून सत्कार केला जातो तो संत्कृत होय. परंतु केवळ सनत् कुमार - नारद इत्यादि ज्ञानी व भक्तांकडूनच त्याचा सत्कार होतो व पूजा केली जाते असे नसून सृष्टितील सर्व सजीव प्राणीमात्रांकडून त्याचा सत्कार व पूजा होत असते. उपनिषदांच्या वर्णनाप्रमाणें सजीवांना येणारा प्रत्येक अनुभव हा एक यज्ञच असून त्यामध्ये संवेदना याजणू समिधाच असतात व अंतर्यामी चैतन्यामध्ये त्यांचे सतत हवन केले जाते त्यामुळे ते चैतन्य प्रज्वलीत रहाते.
(२४) साधुः :  - जीवनामध्ये जो सर्व नैतिकतेचे नियम अत्यंत काटेकोरपणे पालन करतो तो 'साधु' (साधयति इति साधुः). चित्तत्व जो आत्मा तोच ह्या जड प्रकृतीला ज्ञान व शक्ति प्रदान करतो म्हणून सर्वश्रेष्ठ साधू स्वतः श्रीविष्णु भगवानच आहे.
(२४) जह्नु :  - मनुष्यांचा अग्रणी. कर्म व त्यानुसार त्याचे कर्मफल हा सुसंगत कर्मफलाचा सिद्धांत सर्वप्राणीमात्रांना नियमबद्धतेने लागू करतो तो सर्वांचा नेता जह्मु. आपल्यातील अंतर्गत विसंगतीमुळे अवशतेनेच जीव स्वतःच निर्माण केलेल्या व त्यामुळे स्वतःस भोगाव्या लागणार्‍या दुर्गतीस जातो.
(२४) नारायणः :  - ह्या साध्या व पवित्र शब्दाचे अनेक सरळ व गूढही अर्थ आहेत त्यावरून असंख्य सूचित व गर्भितार्थ निघतात. श्री व्यासांनी जवळ जवळ सर्वच अर्थांचे स्पष्टीकरण केलेले आहे.
(१) अयन - आश्रय. नर म्हणजे मनुष्यांचा आश्रय तोच 'नारायण' होय. (२) नर ह्या संज्ञेने अहं केंन्द्रित जीवाचा निर्देश केला जातो व अशा जीवांचा मोठा समुह म्हणजे नार. जो या जीवसृष्टीतील सर्व नारांचे एकमेव आश्रयस्थान आहे तो नारायण. (३) नर म्हणजे ईश्वर व त्यापासून उत्पन्न होणारी तत्वे म्हणजे नार. जो या तत्वांचेनिवमन करतो. संचालन करतो. जो ह्या [1] तत्वाच्या अस्तित्वाचे उगमस्थान आहे तो नारायण (४) नार म्हणजे पाणी. पुराणांमध्ये प्रलया संबंधीचे वर्णन आहे. त्याप्रमाणे सर्व नामरूपात्मक जगत् त्याच्या मूलस्वरूपी अमर्याद जलात् विरून जाते. प्रत्यक्ष परमेश्वर केवळ त्या जलावर एका पिंपळ पानावर बालरूपाने विसावले आहेत असे सुंदर वर्णन चित्रित केले आहे. ' ज्यांनी आपल्या करकमलाने आपले पदकमल धरले आहे व त्याचा अंगठा आपल्या मुख[2] कमलांत घालून ते चोखीत आहे, प्रलयांतही वटपत्रावर विसावलेल्या त्या कमलसदृश हास्यपूर्ण बालस्वरूपाचे मी ध्यान करतो' असे सुरेख वर्णन आपल्याला तेथे आढळते.
     [3]ह्याच अर्थानें मनूनेंही 'नारायण' शब्दाचे विवरण केले आहे. तसेच भक्तिमार्गाचा श्रेष्ठ आद्यग्रंथ श्रीमत् भागवत्, त्यामध्येही ह्या पवित्र नामाचे इतर अनेक अर्थ काढलेले आढळतील. जसे 'सर्व प्राण्यांमधील आत्मतत्व'. प्रकृतीमधील कार्यकारी शक्ति, सर्व चांगल्या वाईटाचा साक्षी इत्यादि. या सर्वांचे तात्पर्य हेच आहे की श्री नारायण हेच परमश्रेष्ठ (अयनम्) आत्मतत्व आहे.
(२४) नरः :  - मार्गदर्शक - (नयति इति नरः प्रोक्तः परमात्मा सनातनः) सर्व प्राणीमात्रांना त्यांच्या कर्माप्रमाणे गति देतो (मार्गदर्शन करतो) तो दुसरा कोणी नसून सनातन परमात्माच होय.

डॉ. सौ. उषा गुणे.


     पुरुषः प्रकृतिस्थोहि भुंक्ते प्रकृतिजान् गुणान्  ।।
[1]    नराञ्जातानि तत्वानि नाराणीति विदुर्बुधाः । 
      तान्येवचायनं तस्य तेन नारायण स्मृतः । (महाभारत)
[2]    करारविन्देन पदारविन्दं  । मुखारविन्दे विनिवेशयन्तम् ।
      वटस्य पत्रस्य पुटेशयानम्  । बालं मुकुंदं मनसा स्मरामि  ।।
[3]    मनुस्मृति म्हणते (१.१०) नर म्हणजे देव, व त्या पासून उत्पन्न झाले 
      ते नार – म्हणजे जल. हे जल (नार) ज्याचे निवास (अयन) आहे तो नारायण.

No comments: