26 April, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ३०

ओजस्तेजोद्युतिधरः प्रकाशात्मा प्रतापनः 
ऋद्धः स्पष्टाक्षरो मंत्रः चंद्राशुर्भास्करद्युतिः  ।।
(२७) ओजस्तेजोद्युतिधरः : - जो शारिरिक चैतन्यशक्ति (ओज), बुद्धिजे तेज व सर्व सौंदर्य (द्युति) धारण करतो तो (धरः) आपल्याला ज्ञात असलेल्या व्यक्तिमत्वाच्या तीन पातळयांचे पूर्णत्वच या संज्ञेनें दर्शविले आहे. निरोगी शरीरातील सर्व तत्वांचे व घटकांचे पूर्ण साम्यत्व व तेजस्विता ओज स्वरूपामध्ये निदर्शनास येते. हे आपल्यातील चैतन्य (ओज) जेव्हा रक्षण करून, नियमित व शिक्षित करून ध्यान मार्गाकरतां वापरले जाते तेव्हां तेच बुद्धिमध्ये 'तेज' रूपाने रुपांतरीत होते. (तेजस्), व व्यक्तिमत्वाचे समग्रत्व साधले जाते. ज्या व्यक्तिनें आपले ओज अशा तर्‍हेने उन्नत केले आहे त्याच्या उज्ज्वलेतेला आपल्या शास्त्रात 'तेज' असे म्हटले आहे. ज्यावेळी एकादा योगी सूज्ञतेने आपले जीवन आखून घेऊन समर्पित वृत्तीनें ध्यान मार्ग आक्रमतो तेंव्हा त्याचे ठिकाणी 'ओज' व 'तेज' एकत्रित येते. व योग्य कालानंतर तोच दिव्य साक्षात्कारी संत 'बुद्ध' म्हणून ओळखला जातो. त्याचे भोवती तयार होणारे अंत्यंत शांत मनोहारी वातावरण, प्रेम व करूणा, पूर्णता ज्ञान व सामर्थ्य यांचा प्रभाव यालाच दिव्यतेची प्रभा (द्युतिः) असे म्हटले जाते. गीतेतील १० व्या अध्यायात गीताचार्य भगवान् आपल्या आत्मस्वरुपाबद्दल स्वतःच सांगतात, ' मी बलवंतामधील बल आहे व तेजस्वी जनांमधील तेज आहे. ' (बलं बलवतां अस्मि तेजस्तेजस्विनामहम् - गीता १०-३६)
     कांही टीकाकार या तीन संज्ञा अलग मानतात परंतु शंकराचार्य तिचे एकत्र विवेचन करतात.
(२७) प्रकाशात्मा :  - तेजोमय आत्मा. तो सर्व हृदयामध्ये आत्मतत्वाने विराजित आहे व त्याचा जाणीव स्वरूपाने अनुभव येतो. सर्व प्राणीमात्रांच्या तीन अवस्थांमधील सर्व अनुभवांचे सर्व वेळी प्रकाशन करणारा जो प्रकाश स्त्रोत आहे (ज्ञानस्वरूप) तो प्रकाशआत्मा होय. तोच सर्व विश्वाचा आत्मा व परमात्मा महाविष्णु होय.
(२७) प्रतापनः :  - जो स्वतःस औष्णिक शक्तिचे स्वरूपांत व्यक्त करतो तो. हीच औष्णिक शक्ति प्रत्येक सजीव प्राणीमात्राचे भोवती असतेत्या वातावरणास जीवनदायी शक्ति प्रदान करते. गीतेमध्येही साक्षात् गीताचार्यांनी यास पूरक विधान केलेले आढळते की, ' भगवान् स्वतःच सत्यस्वरुप असून चंद्र व सूर्य यांचे ठिकाणी असलेले प्रकाश व  उष्णता या स्वरूपात व्यक्त दशेला येतात, व त्यांच्याच उष्णतेमुळे कठीण अशा पृथ्वीतलास उष्णता मिळून सृजनाची शक्ति प्राप्त होते.
(२७) ऋद्धः :  - जो नित्य सर्व समृद्धिनें युक्त आहे असा. तो स्वतः लक्ष्मी-पति असल्याने सर्व ऐश्वर्याचा तोच स्वामी आहे. सर्व विश्वातील वैभव सामर्थ्य व सौदर्य ही त्याचीच व्यक्त दशेला आलेली रूपे आहेत अर्थात तो स्वतःच परिपूर्ण वैभव आहे.
(२७) स्पष्टाक्षरः :  - जो स्पष्ट ध्वनी प्रतिकांनी निर्देशित केला जातो तो. परमात्म्याचे ते प्रख्यात ध्वनीप्रतीक [1] अक्षर आहे   'ॐ' , गीतेमध्ये उल्लेख आहे, जो माझे '' हे अक्षर जपत व माझे स्मरण करत देहत्याग करतो तो परमगतीला प्राप्त होतो. संस्कृत भाषेमध्ये क्षर या शद्बाचा अर्थ होतो विनाशी, व अक्षर शद्बाचा अविनाशी. हे सर्व जग विनाशी असले तरी ते परिपूर्ण निर्विकार सत्याची व्यक्त अवस्था आहे परंतु आपली जाणीवेची साधने म्हणजे शरीर-मन-बुद्धी ही अपूर्ण आहेत. ज्याला जाणीव होते तो अहकार ह्या जगाच्या विविधतेचा अनुभव केवळ इंद्रिय विषय (संवेदना), भावना, व विचार याच स्वरूपांत घेवू शकतो. ह्या अपूर्ण साधनांमधून डोकावणारा अहंकार त्या पूर्ण सर्वसमावेशक दिव्य सत्याचा अनुभव कधीच घेवू शकत नाही. ज्यावेळी तो अहंकार पूर्ण निवेदित अवस्थेला (शरण) जातो, मन स्तब्ध व शांत अवस्थेप्रत जाते तेंव्हाच आपल्याला त्या परमतत्वाचे 'स्पष्ट' 'अक्षर स्वरूपांत' ज्ञान होते. यावरून हे स्पष्ट होते की त्या अक्ष स्वरूपांत प्रतीत होणारा महाविष्णु म्हणजेच 'स्पष्टक्षर ' होय.
(२८०) मंत्रः :  - जो स्वतःच वेदामधील मंत्रस्वरूप आहे असा. वेदामधील उद्घोषित मंत्र हे असे साधन (वाहन) आहे की जे आपल्याला सरळ त्या साक्षात् परमतत्वाच्या अनुभवापर्यंत नेऊ शकते. कित्येक वेळां हे मंत्र व त्यांचे ध्येय एकाच नावांने ओळखले जातात. ज्याचे योग्य तर्‍हेने मनन केले असतां तारतो (रक्षण करतो) तो मंत्र (मननात् त्रायते इति मंत्रः) आपण या उपनिषदातील मंत्राच्या सहाय्याने त्या परमेश्वराचे परमतत्व जाणू शकतो म्हणून त्यालाच 'मंत्र' म्हटले आहे.
(२८) चंद्रांशुः :  - चंद्राचा किरण. चंद्राकिरणांचा वनस्पतींवर परिणाम होत असतो हे भारतामध्ये वैदिक काळापासून ज्ञात होते 'मी चंद्रकिरणरूपी सोम होऊन सर्व वनस्पतींमध्ये पोष तत्त्वे भरतो [2] असे श्री वासुदेवाने गीतेमध्ये सांगीतले आह. अशा प्रकारे परमेश्वर त्या त्या जीवांच्या जीवनशक्तीचे पोषणकरून त्यांचे धारण करतो. हा जरी ह्या संज्ञेचा तात्विक अर्थ असला तरी चंद्राचे सौदर्य आपल्या मनात जी शांतता व संतोष निर्माण करते ते खरोखर त्या परमात्म्याच्या शांततेचे प्रतिबिंबच आहे.
(२८) भास्करद्युतिः :  - सूर्याचे तेज. सूर्य हा सूर्यमालेचा केंद्रबिंदू असून अनंत काळापासून सर्वशक्तिंचा आदीस्त्रोत आहे. पृथ्वीवरील प्राणीमात्रांस शक्ति व जीवन त्यापासून प्राप्त होते. सूर्यावाचून जीवन अशक्यच आहे. परंतु त्याचवेळी जीवनांत कुठलाही अधिक्षेप न करतां स्वतः स्वतःच्याच ठिकाणी राहून सूर्य सर्व जीवनांस आश्वासन व आशीर्वाद देतो. त्याच्याचप्रमाणे जो परमात्मा अलिप्त राहून केवळ स्वतःच्या अस्तित्वमात्रे करून सर्व प्राणीमात्रास आशीर्वाद देतो तोच 'जीवनसूर्य' आहे, तोच आत्मा व तोच महाविष्णु होय.
डॉ. सौ. उषा गुणे.


[1]  ॐ इत्येकाक्षरं ब्रह्म व्याहरनमानुस्मरन्  यः प्रयाति त्यजन्देहं सयाति परमां गतिम्  ।।
[2]   (पुष्णामि चौषधीः सर्वासोमोभूत्वा रसात्मकः गीता १५-१३)

No comments: