06 April, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक २५

आवर्तनो निवृत्तात्मा संवृतः संप्रमर्दनः 
अहः संवर्तको वह्मिरनिलो धरणीदरः  ।।
(२२८) आवर्तनः :  - जो स्वतःच सतत भ्रमणशील असलेल्या कालचक्राचे अदृश्य असे गतीतत्व आहे व त्याचेवर अनंत कालपर्यंत हे जन्म मृत्युचे नाट्य खेळले जात आहे. या आवर्तनात सतत होणारे बदल व त्याची होणारी पुनरावृत्ती ह्यालाच 'संसार' असे म्हटले जाते. प्रकृती आपल्यातील घटकांच्या  सहाय्याने जे उत्पत्ति संहाराचे नृत्य करते ते केवळ परमात्म्याच्या अध्यक्षतेकालीच होय. वैश्विक घडामोडी व बदलांच्या मागे सतत एकसूत्रीपणे व समर्थपणे असलेली शक्ती म्हणजेच परमशक्ती होय व तिलाच आवर्तन अशी संज्ञा दिली आहे. गीतेमध्ये म्हटले आहे , '' हे अर्जुना, ईश्वर सर्व प्राणीमात्रांच्या हृदयांत रहातो व मायेच्या सहाय्याने व्यक्तित्वाचे सर्व बंध गरागरा फिरवतो.[1] जणू कांही हे सर्व विश्व एकादे गुंतागुंतीचे विशाल यंत्र आहे.
(२२९) निवृत्तात्मा :  अत्यंत विशुद्ध आत्मा - जो प्रकृतीच्या सर्व बंधापासून पूर्णपणे निवृत्त झाला आहे असा. श्रीमहाविष्णु हा स्वतःच शुद्ध पवित्र आत्मा आहे व प्रकृतीमध्ये सतत होणार्‍या दुःखपूर्ण तादृश बदलांपासून पूर्णपणे मुक्त आहे म्हणून त्याला निवृत्तात्मा ही संज्ञा दिली आहे.
(२३०) संवृतः :  - विचार करणे, संवेदना होणे, भावणे ह्या जीवाच्या तीन ज्ञान प्रक्रियां पासून जो झाकलेलाच रहातो तो संवृत्त श्री महाविष्णु. जीवांच्या अनुभवांपासून तो परमात्मा पूर्णपणे झाकला गेला आहे. ही जाणीवेची आवरणात्मक अज्ञानावस्थाच मनामध्ये विक्षेप निर्माण करते. त्यामुळेच विश्वाचे सत्यस्वरूप न समजल्यानें  [2] जीवाला हे जग दुःखपूर्ण व अपूर्णतेनें भरलेले आहे असे वाटत असते. साधकाच्या या सद्य स्थितीमध्ये जे सत्य झाकलेलेच रहाते, ते आत्मशक्तिचे उज्वल केंद्र म्हणजेच श्री महाविष्णु होय.
(२३१) संप्रमर्दनः :  - ज्या व्यक्तिंचे व्यक्तिमत्व पूर्णपणे बहिर्गामी आहे व त्यामुळेच त्या व्यक्ती अत्यंत इंद्रिय सुखासक्त व दुष्प्रवृत्त ( राक्षस) आहेत अशा व्यक्तींना कठोरपणे शासन करणारा तो संप्रमर्दन ' व्याधी, क्षय, संकट अगर मृत्यु ह्या स्वरूपांत तो प्रगट होतो व वरील प्रकारच्या पशुतुल्य व्यक्तींमधील गर्व उद्धटपणा व अहंकार नष्ट करतो. त्या व्यक्ती आपली शारिरिक सुखाची हाव क्षुद्रवासनाजड नितीमत्ते मध्येच जगत असतात अशांचे तो परात्पर सत्यस्वरूप परमात्मा श्रीविष्णु शासन करतो.
(२३२) अहःसंवर्तकः :  - जो दिवसाला (अहः) प्रेरणा देतो व आपले काम जोमदारपणे करण्यास प्रवृत्त करतो. (प्रवर्तक) तो श्री महाविष्णु. सर्व दिवसांना सजीवांना कार्यशक्ति देणारा व सर्व सजीव प्राणीमात्रांना आपल्या जीवनांत आनंद प्रदान करणारा आहे 'सूर्य'. जे परमसत्यतत्व सूर्याचे स्वरूपांत सर्वांना जीवन अर्पण करते व कार्य करण्यास जीवन शक्ति देते ते तत्व स्वतःच श्री महाविष्णु आहे. गीतेमध्ये [3] श्रीकृष्ण सांगतात, '' जो या सर्व जगताला प्रकाशित करतो तो त्या सूर्यामधील प्रकाश मीच आहे व चंद्र व अग्निमधील तेजही माझेच आहे असे तू जाण.''
(२३३) वह्निः :  - अग्नि. वैदिक काळामध्यें ज्याची देवांचाही देव अशा स्वरूपांत यज्ञवेदीवर पूजा केली जात असे तो अग्नि. वह्नी होय. वैदिक क्रियाकर्मानूसार निरनिराळया देवतांना यज्ञप्रसंगी आवाहन केले जात असे व त्यांचे हविर्भाग यज्ञांत अग्निला अर्पण केले जात असत. ते हविर्भाग त्या त्या देवतांना नेऊन देण्याचे कार्य करणारा अग्निदेव अशी प्रार्थनाही केली जात असे. थोडक्यात सर्व काली सर्व कर्त्याचे त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार फल देणारा. फलदाता, सर्वज्ञानी श्रीमहाविष्णु अग्निस्वरूप आहे.
(२३४) अनिलः :  - या संज्ञेचे चार स्पष्ट अर्थ आहेत व ते सर्वच या ठिकाणी यथार्थतेने लागू पडतात.
(अ) अनिल - वायु किवा सजीवांमधील प्राण. (आ) अनिल - आदिरहित - ज्याला आदी (आरंभ) नाही असा. ज्या परमतत्वापासून कालाची संकल्पना अस्तित्वात आली[4] ते तत्व अर्थातच कालाच्याही आधीपासून असणारच. अर्थात आपल्या जाणीवेमध्ये असलेल्या कालाच्या संकल्पनेच्या संदर्भात आपण इतकेच म्हणू शकतो की त्याला आदी नाही ( आदिरहित). (इ) सर्व अन्न ग्रहण करणारा - अनिल (त्ता), सर्व अनुभव हे मनुष्याच्या अंतर्यामी असलेल्या आत्म्याचेच अन्न आहे. तो अंतर्यामी असेल तरच सर्व अनुभवांचे ज्ञान त्याच्याच प्रकाशात होते म्हणूनच त्या सर्वश्रेष्ठ अंतरात्म्याला संज्ञा मिळाली आहे अत्ता - अनिल. (ई) अनिलयः अनिलः ज्याला कोणतेही आश्रयस्थान - घर नाही असा. तो सर्वव्यापी असल्याने तोच सर्वांचा आधार आहे म्हणून त्याला कशाच्याही आधाराची अपेक्षा नाही.
(२३५) धरणीधरः :  - जो धरणीचा पृथ्वीचा आधार आहे असा. आपल्या सर्व अनुभवांचे विश्व म्हणजेच जग, व या जगातील अनुवांचा एकाच वेळी जो आधारही आहे व प्रकाशही आहे. चैतन्याच्या प्रकाशामध्येच सर्व अनुभवांचे आपणांस एकत्रित असे ज्ञान होत असते.
डॉ. सौ. उषा गुणे


[1]    ईश्वरः सर्वभूतांनां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति       भ्रामयन सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया ।।
[2]     अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यंति जंतवः  ।।
[3]     यदादित्य गतं तेजो जगद् भासगतेऽखिलम् 
  यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम  ।। गीता १५-१२
[4]   दोन अनुभवांमधील अंतर म्हणजेच काल

No comments: