14 April, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक २७

असंख्येयोऽप्रमेयात्मा विशिष्ठः शिष्टकृच्छुचिः 
सिद्धार्थःसिद्धसंकल्पः सिद्धदः सिद्धि साधनः  ।।
(२४) असंख्येयः :  - संख्या हे मोजण्याचे साधन आहे. असंख्येय म्हणजे संख्या नसलेला. ज्याची  मोजता येण्याइतकी नामे व रूपे आहेत असा. ज्या वस्तु जाताच्या असंख्य प्रकाराने हे व्यक्त दशेला आलेले विश्व तयार झाले आहे ती सर्व रूपे (आकार) ही त्याचीच रूपे आहेत म्हणूनच तो खरोखरच असंख्येय आहे. हे वर्णन त्याने स्वतःच केले आहे. गीतेच्या ११व्या अध्यायांत परमेश्वराचे हे वैश्विक रूप आपल्याला अर्जुनाच्या दिव्यदृष्टितून पहावयास मिळते. '' सर्व बाजूंना असंख्य आकारांचे, असंख्य बाहू असलेले, असंख्य उदरे, मुखे व डोळे असलेले, ज्याला अंत नाही, मध्य नाही व आदी नाही, असे तुझे रूप हे विश्वेश्वरा मी पहातो आहे. (गीता ११-१६)
(२४) अप्रमेयात्मा :  - प्रमेय - प्रमाणविषय - प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष अशा कोणत्याही प्रमाणानें  ज्याचे ज्ञान करून घेतां येते तो प्रमाणविषय म्हणजेच प्रमेय होय. आत्मा हा कोणत्याही प्रमाणाने (ज्ञान साधनाने) बुद्धिस ज्ञात होत नाही, म्हणून त्यास अप्रमेय म्हटले जाते. ज्या आत्म्याचे असे स्वरूप आहे तो परमात्मा श्रीविष्णु अप्रमेयात्मा आहे.
(२४) विशिष्ठः :  - जो आपल्या श्रेष्ठतेमुळे सर्वांच्या अतित आहे तो परमात्मा विशिष्ठ होय. जो तीही देहांच्या पलीकडे आहे, जो पंचकोषांच्या पलीकडे आहे, जो निश्चितपणे ह्या अशाश्वत जगतातील क्षणभंगूर वस्तूजाताहून वेगळा आहे जो अनंतात्मा जागृत, स्वप्न, सुषुप्तितील कुठल्याही अवस्थेने दर्शविता येत नाही तो आत्मा सर्वाहून विलक्षण - विशिष्ठ आहे. ''एतत् विलक्षणं विद्यात् आत्मानं राजवत् सदा'' -  तो आत्मा सर्वाहून विलक्षण व राजाप्रमाणे श्रेष्ठ आहे. किवा '' उपाधि त्रितयादन्यं आत्मानमवधारयेत्' । (आत्मबोध) तीनही उपाधिच्यापेक्षाक्ष वेगळा असा तो आत्मा, ते सर्वश्रेष्ठ सत्य म्हणजेच श्री महाविष्णु होय.
(२५०) शिष्ठकृत् :  - जो शास्ता आहे असा. ज्या नियमांनी सर्व विश्वाचे नियमन केले जाते, असे नियम व ते नियम करणारा तो शिष्ठकृत्. त्याच्या शासनाचे उद्दीष्टच आहे शिष्टांचे साधूंचे रक्षण करणे. महाविष्णु सर्वांचा शास्ता आहे व साधुत्वाचे संरक्षण करणारा आहे.
(२५) शुचिः :  - जो अत्यंत पवित्र आहे असा. जे मामा व तिच्या विकारांनी कधीही मलीन होत नाही असे निरंजन सत्य म्हणजेच महाविष्णु होय. एकाद्या वस्तूवर मल साठला तर ती मलीन होते. परंतु त्या एकमेव आदीतत्वामध्ये त्याच्यावाचून दुसरे काहीच नाही म्हणूनच जाणीवेची चवथी अवस्था जी तुर्यावस्था, तिचे वर्णन वेदग्रंथामधून 'सर्वातीत, अत्यंत पवित्र आत्मतत्व ' असे केलेले आढळते. तोंच श्रीहरि होय.
(२५) सिद्धार्थः :  - ज्याने प्राप्तव्य असे सर्व प्राप्त केले आहे व इच्छित असे सर्व मिळविलेले आहे तो सिद्धार्थ होय. मनुष्यानें आपल्या आयुष्यांत जे जे प्राप्त करून घ्यावे त्या सर्वांचे चार घटकांमध्ये वर्गीकरण केलेले आहे. व त्या आयुष्याच्या ध्येयांना पुरुषार्थ असे म्हणतात. ते म्हणजे (१) नीति धर्माचरण किवा धर्म (२) संपत्ती व ती वरील सत्ता - अर्थ (३) इच्छा व आकांक्षा - काम (४) सर्व अपूर्णते पासून मुक्तता - मोक्ष. ज्याने हे चारही अर्थ प्राप्त केलेले आहेत त्याला प्राप्तव्य असे काहीच रहात नाही, म्हणूनच तेथे कांहीही अपूर्णता नाही. ज्याचे सर्व अर्थ सिद्ध झाले आहेत (पूर्ण झाले आहेत) असा सिद्धार्थ - श्रीविष्णु होय.
(२५) सिद्धसंकल्पः :  - संकल्प म्हणजे मनाने अगर बुद्धीने ( बुद्धिपूर्वक ) इच्छाकरणे. ज्याने इच्छित ते सर्व प्राप्त केले आहे ( सिद्ध केले आहे ) किवा इच्छा मात्रेकरूनच जो सर्व प्राप्त करू शकतो त्यास सिद्धसंकल्प असे म्हणतात. साधारणतः आपणजी इच्छा करतो ती पूर्णतः सफल करू शकत नाही त्याला कारण म्हणजे आपल्या मधील अनेकाग्रता.. तो पूर्ण परमात्मा इच्छामात्रे करून तत्क्षणीच सर्व प्राप्त करतो म्हणून त्याचे वर्णन उपनिषदांमध्ये 'सत्यसंकल्प' असे केले आहे. तोच उपनिषदांचा परमेश्वर व ह्या विष्णुसहस्रनामाचा विषय श्रीविष्णु होय.
(२५) सिद्धिदः :  - परमार्थ साधना करणाऱ्यांना त्यांच्या साधनेप्रमाणे व सर्व कर्माप्रमाणे सुयोग्य फल (सिद्धि) देणारा तो महाविष्णु 'सिद्धिद' होय. श्री नारायण हीच वैश्विक शक्ती सर्व कर्मांचे फल देते.
(२५) सिद्धिसाधनः :  - साधकास आपल्या साधनेमध्ये सतत प्रवृत्त करणारी अशी गूढ शक्ति म्हणजेच श्री महाविष्णु. साधारणतः सिद्धि या शब्दाचा अर्थ होतो कार्याची पूर्तता. या ठिकाणी पूर्णतेसाठी ( कार्यपूर्तता ) केलेले सर्व प्रयत्‍न म्हणजेच सिद्धि होय. ज्या परमसत्याची अर्चना करणे हेच सर्व सिद्धि प्राप्त करण्याचे साधन होय, ते परमसत्य म्हणजेच 'श्री नारायण'.
डॉ. सौ. उषा गुणे.


      अनेक बाहूदर वक्त्रनेत्रं पश्यामित्वां सर्वतोऽनन्तरूपम् 
    नान्तं नमध्यं न पुनस्तवादि पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम्  ।। (गीता ११-१६)

No comments: