22 April, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक २९

सुभुजो दुर्धरो वाग्मी महेन्द्रो वसुदो वसुः ।
नैकरूपो बृहद्रुपः शिपिविष्टः प्रकाशनः  ।।
(२६) सुभुजः :  - ज्याच्या भूजा अत्यंत सुंदर आहेत असा. ही संज्ञा केवळ स्थूल शरीरातील हातांचे सौदर्य वर्णन करण्याकरता योजिलेली नाही, तर जे हात आपल्या भक्तांचे रक्षण करण्याकरतां, व त्यांना अभयदान व वरदान देण्याकरतां सतत कार्यरत असतात त्यांच्या सौदर्याचे वर्णन करण्याकरतां वापरली आहे, म्हणूनच तो सुभुज आहे.
(२६) दुर्धरः :  - दीर्घकालपर्यंत ध्यान चिंतन करणार्‍या योग्यांनाही ज्याचे संपूर्ण आकलन होत नाही तो दुर्धर. त्या परमात्म्याचा हा ’साक्षात्कार’ मन, बुद्धिच्या अतीत आहे म्हणून मन व बुद्धिने त्याचे आकलन होत नाही.
(२६) वाग्मी :  - जो आपले सामर्थ्य वर्णन करण्यात वाक्चतुर आहे असा. ह्या संज्ञेचा पूर्ण अर्थ केवळ वाचेचे प्रभुत्व दर्शविण्याकरतां नाही. जगतांतील सर्व शारीरिक सामर्थ्य, संपूर्ण विश्वातील वैभव, सर्व हृदयांचे सौंदर्य, सर्वांच्या बुद्धिची शक्ति ही सर्व त्याचेच वैभव गातात. पुन्हा सर्व धर्म ग्रंथामधून तोच सर्व जीवांना मायेच्या झंझावाता पलीकडील असलेले त्याचे आश्रय स्थान बोलून दाखवितो व तेच साध्या शब्दात व समर्पक सूचनांनी सर्व संत, साधु ऋषी व विचारवंतांनीही सांगितले आहे.
(२६) महेन्द्रः :  - जो इन्द्राचाही स्वामी आहे असा. सर्व देवांचा देव. तत्वज्ञानामध्यें मनाला इंद्र - म्हणचे इंद्रियांचा राजा म्हटले आहे. ह्या मनाचाही स्वामी तो महेन्द्र, परमात्मा होय.
(२६) वसुदः :  - वसु म्हणजे समृद्धि. ती सर्वांना प्रदान करणारा तो वसुदः. ही समृद्धि बाह्य व आंतरिक समाधान अशा दोन्ही स्वरूपाची असते. एकदा त्याला अनन्य भावाने शरण गेले म्हणजे मनुष्य कार्यातील यश, प्रेमपूर्ण हृदयाचे सौंदर्य, संयमित मन व चिंतनशील बुद्धिने समृद्ध होतो.
(२७०) वसुः :  - वसु ह्या शब्दाला तीन अर्थ आहेत. (१) वसु - धन, समृद्धि. (२) वसु - आच्छादन (३) वसु - सूर्य. या अर्थाप्रमाणे तो बाह्य समृद्धिच्या रूपाने व्यक्त होतोच आणि ही समृद्धि प्रदान करणारा, सर्व विश्वाचे भरण पोषण करणारा सूर्य नारायण ह्या रूपानेही तोच व्यक्त होतो. तसेच ज्यांचे जवळ खरी भक्ती नाही व दुष्ट प्रवृत्तीमुळे ज्यांची मनोभूमी तयार झालेली नाही अशा व्यक्तींच्या आकलनापासून ज्याने स्वताःला झाकून घेतले आहे, जो आवृत्त झाला आहे तो वसु होय.
     तसेच 'वसति इति वसुः' जो सर्व चराचर सृष्टिमध्ये वस्ती करतो रहातो तो वसु किवा 'वासयति इति वसु' जो सर्व स्थावर जंगम वस्तुंना आपल्यामध्ये वसती करावयास लावतो तो वसु. गीता व उपनिषदांमध्येही असे वर्णन आहे की, ते अनंततत्त्व आपल्या ईश्वरभावाने सर्वांमध्ये अंतर्भूत होऊन राहते व शुद्ध सर्वातीत भावाने सर्व विश्वाचा आधार आहे. यस्तु सर्वाणि मूतानि आत्मन्येवानुपश्यति । सर्व भूतेषु चात्मानं ततो न विजुजुगुप्सते ।।(इश-६) तसेच गीतेमध्ये - सर्व भूतस्थमात्मानं सर्व भूतानिचात्मानि । ईक्षते योग युक्तात्मा सर्वत्र समदर्शनः  ।।
(२७) नैकरूपः :  - जो व्यक्तदशेमध्ये अनंत आकार धारण करतो तो जागृत अवस्थेमध्ये एकविध असलेले मन अनेकविध होऊन स्वप्न जगतातील अनेक चित्रविचित्र वस्तू प्रदान करते. श्रीविष्णु हे ह्या विश्वाचे एकच सर्वश्रेष्ठ असे कारण आहे आणि सर्व कार्येही त्याच कारणापासून व्यक्त झालेली अनेक रूपे आहेत. सर्व भक्त आपल्या सुपरिचित पारंपारिक प्रार्थनेमध्ये म्हणतात त्याप्रमाणे ही कल्पना सुंदर रितीने वर्णिलेली आहे.
' जलं विष्णुस्थलं विष्णुः विष्णुराकाशमुच्यते ।
स्थावरं जंगम विष्णुः सर्व विष्णुमयं जगत्  ।।
     आपल्या भेदयुक्त शरीर - मन-बुद्धिच्या सहाय्याने त्याचेकडे पाहिले असता आपल्याला अनेकतत्व दिसते (नैकरूप) परंतु साधनातीत होऊन पाहिले असतां अंतिम सत्याचे 'एकतत्वच' अनुभवास येते.
(२७) बृहद्‌रूप:  - असीम अमर्याद् - सर्वव्यापी. ज्याचे रूप संपूर्ण विश्वाचे व्यापक रूप हेच ज्याचे ’रूप’ आहे, त्यामुळे तो सिव्हासारखाच व्यापक आहे.  ऋग्वेदातील पुरूष सूक्तांमध्ये य्षींनी केलेले असे वर्णन आहे की ' तो उत्तम पुरूष विष्णु केवळ विश्वाएवढाच मर्यादित नाही तर तो त्यास व्यापूनही दहा अंगुळे उरून राहिला. ''अत्यतिष्ठत् दशांगुलम्.''
(२७) शिपिविष्टः :  - शिपि हे यज्ञपशुला दिएलेले नाव आहे. निष्काम भावनेनें केलेल्या सर्व यज्ञ कर्मामध्ये अर्पण केलेल्या सर्व हवनास जो पवित्र करून घेतो तो असे ही संज्ञा सुचविते. मूळ धातू 'शि' ह्याचा अर्थ आहे 'जल' व ते पिणारे 'शिपि' सूर्यकिरण. म्हणूनच शिपीविष्ट या संज्ञेनें सूर्यामध्ये अधिष्ठित असलेले परमतत्व दर्शविले आहे. तोच सूर्य जगताला शक्ति व तेज प्रदान करीत असतो. भगवत् गीतेत श्रीकृष्ण स्वतःच सांगतात सूर्यचंद्राचे ठिकाणी जे तेज व शक्ति प्रतीत होते ती शक्ति व तेज माझेच आहेत असे तू जाण.
यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम्  यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धिमामकम्  ।।
(२७) प्रकाशनः :  - जो सर्व प्रकाशित करतो तो. सर्वव्यापी ज्ञान स्वरूप असल्याने सर्व प्राणीमात्रांचे साधनांमधून प्रतीत होतो. सर्वांच्या हृदयातील जाणीवशक्तिच्या रूपाने सृष्टित सर्व ठिकाणी, सर्व वेळी घडणार्‍या सर्व घटनांचे ज्ञान त्यालाच होत असते, म्हणूनच तो सर्ववित्, सर्वज्ञ आहे. सर्व अनुभवांचे तोच प्रकाशन (ज्ञान) करून देतो. ज्याप्रमाणे एकच सूर्य जगतातील सर्व वस्तू प्रकाशित करतो त्याप्रमाणे ते परमतत्व अनुभव क्षेत्र व अनुभव क्षेत्रज्ञ या दोहोंचे प्रकाशन करतो.
यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः 
क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत  ।। गीता १३-३३
डॉ. सौ. उषा गुणे.

No comments: