18 April, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक २८

वृषाही वृषभो विष्णुः वृषपर्वा वृषोदरः 
वर्धनो वर्धमानश्च विविक्तः श्रुतिसागरः  ।।
(२५) वृषाही :  - वृषाही ही संज्ञा वेदांच्या कर्मकांडातील भागांमध्ये वारंवार आल्याने सुपरीचित आहे व ती सामान्यतः यज्ञकार्याचे शेवटी उरणारे फलस्वरूप - ' यज्ञशिष्ट ' दर्शविते. व्यक्तिगतरित्या वृष ह्या संज्ञेने दर्शविले जाणारे 'यज्ञशिष्ट' फल म्हणजे त्या व्यक्तीमधील परिवर्तन. भक्तीयुक्त अंतकरणाने व समर्पित भावनेने केलेले निष्काम कर्म (यज्ञ) मनुष्यामध्ये असे परिवर्तन घडवून आणते म्हणूनच 'वृषाही' म्हणजे जे  कर्म सजीव सज्ञान प्राणीमात्रांनी जाणीवपूर्वक केलेले असते त्या सर्व कर्माचा कर्मफलाचा नियंता व दाता आहे 'श्री विष्णु भगवान'.
(२५) वृषभः :  - 'वृष' ही संज्ञा सांप्रत काळी फारशी प्रचलीत नसली तरी वैदिक वाङ्‌मयामध्ये तिचा वापर 'धर्म' या अर्थाने केलेला आढळतो. वस्तूचा स्थायीभाव. ज्याचेवाचून ती वस्तू वस्तूरूपानें राहू शकत नाही त्यालाच त्या वस्तूचा 'धर्म' असे म्हटले जाते. जो अशा सर्व धर्मांचा वर्षाव करतो तो 'वृषभ'. थोडक्यात जो प्रामाणिक साधक व सश्रद्ध भक्तांवर उज्वल आरोग्य, ज्वलंत भक्ती व स्फुरणदायी शांततेचा वर्षाव करतो तो 'वृषभ' म्हणजेच ' श्री नारायण ' होय.
(२५) विष्णुः :  - 'सर्वव्यापी'; लांब पदन्यास करणारा. 'विष्णु' ह्या संज्ञेचे यापूर्वीच विवरण केले आहे. (२) महाभारतात श्री भगवान स्वतःच अर्जुनास सांगतात ,'' क्रमणात् चाप्यहं पार्थ विष्णुरित्यभि संज्ञितः'' (महाभारत १२-३५०-४३) हे सर्व विश्व पादाक्रांत करून मी स्थित आहे म्हणून मी विष्णु या नावाने ओळखला जातो.
     उपनिषदांमध्येही '' इदं विष्णुः विचक्रमे'' असा उल्लेख आढळतो व त्याचा अर्थ विष्णुने हे सर्व व्याप्त केले व तीनही लोक जिंकले असा होतो.
(२५) वृषपर्वा :  - वृष ह्या शब्दाचा अर्थ 'धर्म' असा होतो हे आपण पाहिलेलेच आहे. पर्व म्हणजे शिडी. सोपान. जो उच्च पातळीवर घेउन जातो असा पायर्‍यांचा समुच्चय ( जो उच्च पातळीवर नेतो तो पर्वत) आपणांस जीवनातील अंतिम सत्याकडे नेणारा सनातन धर्मरूपी सोपानच या संज्ञेने दर्शविला आहे. म्हणून 'मी मार्ग आहे' असे वचन आहे. ज्याची उपासना केली असता भक्ताची सतत उत्क्रांती होत रहाते, तो उच्च पातळीवरील अनुभव घेऊ शकतो तो वृषपर्वा श्रीविष्णु होय.
(२६०) वृषोदरः :  - वृष - वर्षाव करणे. उदर - उगम स्थान. सर्व सृजनात्मक संकल्पनांचे स्थान साधारणतः नाभीचे जवळ असल्याचे मानले जाते म्हणूनच असे वर्णन आढळते की, ' सर्व ब्रह्मांडाचा कर्ता ब्रह्मदेवही ज्याच्या नाभीकमलातून उत्पन्न झाला आहे व नाभीकमलाच्या आधारानें राहिला तो श्रीमहाविष्णु वृषोदर आहे.
     (ब्रह्मदेव) ही सृजनशक्ती प्रलयाचेवेळी (निद्राकाळी) पुन्हा आपल्या उगमस्थानी विलीन होते व पुन्हा सृजन (जागृत होऊन) कार्य सुरू होते. ज्या स्थानापासून सृजनशक्ति उत्पन्न होते (व कार्यकारी होते) व पुन्हा ज्या स्थानांत विलीन पावते ते स्थान आहे (श्री विष्णुचे) उदर. ज्या स्थानामध्ये प्रलयाचे वेळी सर्व व्यक्त जगत विलीन होते तेथूनच सृजनाचे वेळी सर्व नामरूपात्मक जगतांचा वर्षाव (वृष) होतो. ज्या महाविष्णुचे उदरापासून सर्व जगतांचा वर्षाव होतो तो वृषोदर होय.
(२६) वर्धनः :  - जीवनाच्या सर्व स्तरांवर, जड चेतनादि सर्वांचे, जो सर्वकाल, सर्व ठिकाणी पालन पोषण करतो, भौतिक व आध्यात्मिक्वृद्धि करतो तो वर्धन. ' विष्णुसहस्रनाम स्तोत्राचे भक्तियुक्त अंतःकरणाने अभ्यास करणार्‍या साधकाचे दृष्टिने 'श्री महाविष्णु' म्हणजे साधकास आध्यात्मिक उन्नती, सर्व सुख साधने व शेवटी प्रत्यक्ष साक्षात्कार प्रदान करणारी महाशक्तिच होय. तोच वर्धन होय.
(२६) वर्धमानः :  - जो स्वतःची वृद्धि अमर्यादपणे करूं शकतो, सतत वृद्धि पावतो तो वर्धमानः. विश्वातील सर्व नामरूपात्मक वस्तूजातामध्ये सतत गतिमानता असते व सर्वत्र उत्क्रांतीच्या दिशेने एक अदृश्य वाटचाल चालू असते. म्हणूनच येथेही श्रीमहाविष्णुचा उल्लेख ही 'उत्क्रांतीची सर्वंकश गतिमानता’ असा केला आहे.
     (पुराणांमध्ये असा उल्लेख आहे की ही संज्ञा त्यास वामनावतारामुळे प्राप्त झाली आहे कारण त्यामध्ये तो विशाल होत होत त्याने तीन पावलांमध्ये हे सर्व विश्व मोजले.)
(२६) विविक्तः :  - एकाकी. नित्य सर्वापासून असा. जागृत मनुष्य ज्याप्रमाणे स्वप्न व स्वप्न पाहणार्‍याहून वेगळाच असतो त्याप्रमाणे नामरूपात्मक जगताची सर्व सुखदुःखे, आसक्ती, अभिलाषा, हास्य व अश्रु हे सर्व आत्म्याच्या आधारानें घडून येत असले तरी 'तो' ह्या सर्वाहून वेगळाच आहे. विकार रहित आहे.
     भेसूर दिसणारे पिशाच्च तत्वतः 'स्थाणू' मध्ये काहीच फरक करू शकत नाही. त्याप्रमाणे मायेच्या जगतात कितीही उलाढाल झाली तरी तो परमात्मा त्या सर्वापासून आपल्याच वैभवाने व पूर्णतेने अलिप्त आहे. रोजच्या सामान्य जन्म मृत्यु रूपी संसाराहूनही तो अलिप्त आहे. तो विकाररहित आहे व परिणामरहित आहे. हे त्याचे अलिप्तपण गीतेमध्ये ' मत्स्थानि सर्व भूतानि नचाहं तेष्ववास्थितः'' अशा शद्बात वर्णिले आहे. ते सर्व माझ्यामध्ये (माझ्या आधाराने) आहेत परंतु मी त्यांच्यामध्ये नाही. (गीता ९.४)
(२६) श्रुतिसागरः :  - वेद विचारांच्या सर्व नद्यांना समाविष्ट करणारा सागर. सर्व वैदिक वाङ्‌मय वय, भाषा, परंपरा, निष्ठा ह्यांच्या निरपेक्ष ज्या एका ध्येयाचे गुणदर्शन करतात ते सर्वत्र एकमेवच असते. सर्व धर्म ग्रंथ हे विचारांचे लहान लहान प्रवाह, नद्या आहेत. ते प्रवाह वेगवेगळया राष्ट्ररुपी खोर्‍यातून व इतिहासाच्या वातावरणातून पुढे जात जात पूर्णतेच्या समुद्राकडे धाव घेतात. हा समुद्र तर सर्व क्षणभंगुरतेच्या दुःखापलीकडे आहे. म्हणून सर्व धर्मग्रथांचे एकमेव लक्ष्य म्हणजेच परमानंद (अखंडानंद) चैतन्यस्वरूप श्री महाविष्णु.
डॉ. सौ. उषा गुणे.

No comments: