30 April, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ३१

अमृतांशूद्भवो भानुः शशबिंदुः सुरेश्वरः 
औषधं जगतः सेतु सत्यधर्मपराक्रमः  ।।
(२८) अमृतांशूद्‍भवः :  - चंद्र आपल्या प्रसादयूक्त किरणांनी सर्व वनस्पती व फळांना आवश्यक असा रस स्वाद पुरवितो (पोषण करतो) म्हणून त्याला संस्कृतमध्ये 'अमृतांशू' म्हटले जाते. अमृतमंथनाचे वेळी क्षीरसागरातून सर्वप्रथम चंद्र उदभवला असे पुराणांत वर्णन केले आहे. भगवान विष्णु क्षीरसागरांत निरंतर आपल्या शेष शय्येवर पहुडले आहेत त्यामुळे त्यांनाच प्रत्यक्ष चंद्राचे (अमृतांशूचे) उगमस्थान म्हटले आहे. मानवाचे दृष्टीनें चंद्र ही मनाची (मति) देवता आहे असे मानले जाते. जेव्हा आपल्या मनांत सत् (सुर) व असत् ( असुर) यांचे द्वंद्व किवा मंथन सुरूं होते तेंव्हा त्याच्यामधून विवेक बुद्धिरूपी चंद्रमा उदित पावतो. सूर्य ही शक्तिची देवता आहे तर चंद्र ही क्षेत्राची (प्रकृतीची) देवता आहे. व ज्या उगमापासून ह्या क्षेत्राची झाली आहे तो 'अमृतांशूद्भव' आहे 'श्रीविष्णु'.
(२८) भानुः :  - स्वयं प्रकाशी. जो सूर्यरूपाने सूर्यमालेच्या मध्यवर्ती राहून सर्व जगतावर आपल्या प्रकाशाच्या सहाय्याने कृपा करतो तो श्रीविष्णू - भानु होय.
(२८) शशबिंदुः :  - चंद्रावरील कलंक. साध्यानजरेने पाहिले असतांही तो चंद्रावर सशाच्या सावलीप्रमाणे दिसतो. हा कलंकही चंद्राच्या सौंदर्याला शोभून दिसतो. (सौंदर्यबिंदू). असा सौंदर्यबिंदू धारण करणार्‍या चंद्राच्या स्वरूपांत स्वतः भगवान् विष्णुच सर्व जगाचें 'सोम' रूपाने पोषण करीत आहे.[1]
(२८) सुरेश्वरः :  - (सुर - देव) सुरेश्वर म्हणजे देवांचाही देव. सु = संपत्ती, र = देणारा अशीही सुर ह्या शब्दाची फोड होते. अर्थात् सुर म्हणजे उदार दाता व त्याच्या ईश्वर. जो सर्व दानी व्यक्तिंच्या दयार्द्रतेला प्रेरणा देतो व त्यांचे दातृत्व परिपूर्ण करतो तो सुरेश्वर. भगवान् श्रीविष्णु.
(२८) औषधम् :  - औषधी. संसारातील सर्व तापदायक व्याधी, दुःखावरील त्वरीत दुःखहारक अशी दिव्य औषधी श्री नारायणच आहे. प्रत्यक्ष शारीरिक व्याधींच्या पूर्ण निराकरणाचे औषध या दृष्टीनेही ही संज्ञा चुकीची ठरत नाही. शारीरिक व्याधीही मनाच्या विसंगतीतून उत्पन्न होतात. व जेव्हा मनुष्यांचा अहंभाव पूर्ण शरणागत होतो तेंव्हा भक्तांच्या शारीरिक दुःखाचेही श्रीनारायण खरोखरीच प्रत्यक्ष औषधी होऊन हरण करतो.
(२८) जगतस्सेतुः :  - सेतु म्हणजे पूल किवा बंध. पाण्यातील लंाबच्या बेटाला मुख्य भूभागाशी जोडण्याकरतां घातलेल्या बंधाला सेतू म्हणतात. प्रभु रामचंद्रांनी असा सेतु बांधला व ते लंकेला गेले. जगतसेतु ही संज्ञा असे दर्शविते की परमेश्वर स्वतःच असा एक बंध आहेत ज्याच्यावरून साधकाला आपली अहंकेंद्रित अपूर्णता पार करून अत्यंत आनंदपूर्ण अनंताच्या प्रदेशात जाता येते.
(२८) सत्यधर्मपराक्रमः :  - जो सत्य व धर्म यांचे करता पराक्रम स्वरूप (सामर्थ्य स्वरूप) झाला आहे असा, किवा जो स्वतःच साक्षात् सत्य, धर्म, व पराक्रम आहे असा. थोडक्यात परमेश्वर स्वतःच सत्य व धर्म (पवित्रता) यांच्या स्थापने करतां असत्य व अधर्माशी झुंज घेतो व ते नष्ट करतो.
डॉ. सौ. उषा गुणे.


[1]   ( गामाविश्यच भूतानि धारयाम्यह मोजसा । पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमोभूत्वा रसात्मक: (गीता १५-११) – तो स्वतःच जड प्राकृतिक जगत्‌ही झाला आहे व तोच चंद्र होऊन सर्व वनस्पतिंचे पोषण करतो आहे.

No comments: