01 November, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ८४

श्लोक ८४
शुभाङ्गो लोकसांरङ्गो सुतन्तुस्तन्तुवर्धनः 
इन्द्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः  ।।
(७८) शुभाङ्गः :  - ज्याची सर्व अंगे अत्यंत शोभायमान व सौंदर्यपूर्ण आहेत असा. सर्व सौदर्याचेही सौंदर्यस्थान आहे 'श्रीनारायण'. त्यामुळे भक्तांना त्याचे मनोहारी रूप व कमनीय आकार हेच ध्यानाला विषय होतात. उपनिषदांमध्ये त्या परमात्म्याचे वर्णन शान्तं-शिव-सुंदर असे केले आहे. त्यामुळे त्याचे भक्त त्याच्या दिव्य सौंदर्याचे व सुंदर अंगोपांगाचे ध्यान करतात व चढत्या वाढत्या भक्तीच्या आनंदाने, शरण भावानें त्याच्या पायी लोळण घेतात.
(७८) लोकसारङ्गः :  - जो नामरूपाने नटलेल्या विश्वाचे म्हणजेच लोकांचे सार जाणतो तो. किवा लोकसारंग म्हणजे विश्वाचा उगम, मूलतत्व व ते आहे ' प्रणव- '. म्हणूनच लोकसारंग ही संज्ञा हे परमतत्व हेच आदी किवा मूळ कारण आहे असे सुचविते काराचे ध्यान केले असतां त्याची प्राप्ती होते, त्याचेपर्यंत पोहोचता येते.
(७८) सुतन्तुः :  - ज्याचा विस्तार सौंदर्यपूर्ण आहे असा. कापसामधून कमी जास्त जाडीचा धागा काढला जातो व त्यानंतर असंख्य प्रकारच्या वस्त्रांची निर्मिती करण्याकरतां तो ताण्याबाण्यावर चढविला जातो.  त्याचप्रमाणे जे मूळ परमतत्व श्रीनारायण त्याचेच पासून असंख्य नामरूपांच्या वस्तू व प्राणीमात्रांच्या अस्तित्वाने गुंफलेले हे भव्यविश्वरूपी सुंदर वस्र निर्माण झाले आहे. ज्या प्रमाणे निरनिराळया वस्त्रांमध्ये 'तन्तू' हाच त्याचा मुख्य आधार असतो त्याप्रमाणे या अद्‍भुत विश्वाचा नारायण हाच सुंदर धागा, मुख्य आधार आहे. भगवंत गीतेमध्ये स्वतःच म्हणतात की, 'हे धनंजया, माझ्यापेक्षा श्रेष्ठ या ब्रह्मांडात दूसरे कांहीही नाही. [1]ज्याप्रमाणे मणी दोर्‍यात ओवलेले असतात त्याप्रमाणे माझ्यांत सर्व गोवलेले आहे.
(७८) तन्तुवर्धनः :  - कुटुंबाचे सातत्य ठेवण्याची प्रेरणा जो वाढीस लावतो व सांभाळतो तो तन्तुवर्धन होय. कुटुंबाचे संवर्धन कुटुंबातील घटकांच्या पुरूषत्व प्रेरणेनें होत असते व त्या व्यक्तिंची ही मानसिक शक्ति ही चैतन्याने त्याला प्रदान केलेल्या प्राणशक्तिचे व्यक्त स्वरूप आहे. या प्रमाणे परमात्म्याची कृपाच जणू बीजांच्या सृजनशक्तिमधून व्यक्त होत असते. हिंदुस्थानांत हिंदूंमध्ये अशी समजूत आहे की वंशवृद्धि ही केवळ नारायणाचीच कृपा आहे.
(७८) इन्द्रकर्मा :  - जो नेहमी भव्य दिव्य कर्मे करतो असा. यामधील 'इङ्' हा धातू नेहमी परम ऐश्वर्य दर्शवण्याकरता वापरला जातो.
(७८) महाकर्मा :  - जो नेहमी महान कर्मे करतो असा. पंचमहाभूतांपासून सर्व विश्वाची अत्यंत शास्रशुद्ध नियमांनी, बिनचूक अशी उप्तत्ति करणे व काटेकोरपणे व कुशलतेने त्याचे पालन करणे, तसेच सर्व संहाराच्यावेळी त्या संहारकर्माचा शास्ता म्हणून कार्य करणे हे सर्व गुंतागुंतीचे महान कर्म आहे. संहाराखेरीज या क्षणभंगुर जगाची नियमित व्यवस्था लागणारच नाही म्हणून हे उप्तत्ति संहाराचे अवाढव्य काम करण्याकरतां अगाध बुद्धिसामर्थ्याची आवश्यकता आहे.
(७८) कृतकर्मा :  - ज्याने आपली सर्व कार्ये पूर्ण केली आहेत असा. आतां नवीन कांही मिळवावे असे त्याला कांहीही नाही. कारण सर्व कार्याची सिद्धि तो स्वतःच आहे, गंतव्य तोच आहे. त्याच्या शाश्वत परिपूर्णतेमुळे नवीन प्राप्तव्य काही असूच शकत नाही. ही पूर्णकाम अवस्था आपल्या सर्व ग्रथांमधून वर्णन केलेली आहे व ती आहे पूर्णानंदाची अवस्था.
(७८) कृतागमः :  - ज्याने वेदांची निर्मिती केली तो. वैदिक मत्रांना 'आगम' म्हणतात. ज्यावेळी महान् ऋषी पूर्ण ध्यानावस्थेत आपल्या शरीर मन बुद्धिपासून पूर्ण अलिप्त अवस्थेत जात त्यावेळी त्यांना त्या मंत्राची प्रतीती होत असे. त्यांची ती उन्नत अवस्था अहंकेंद्रित व्यक्तिनिष्ठ नव्हती. ज्या ठिकाणी अशा तर्‍हेनें 'अहं' चा लोप झालेला आहे तेथेच आत्मप्रकाश प्रकट होतो. साक्षात्कारी ब्रह्मद्रष्टे ऋषी आपल्या व्यक्तिगत अस्तित्वाच्या मर्यादांचे पलीकडे जावून परब्रह्माशी नारायणाशी एकरूप होत असत तेंव्हा त्यांना हे मंत्र स्फुरत होते. त्यांच्या मुखातून प्रकट होत असत. म्हणुनच भगवंत गीतेमध्ये सांगतात, 'मी वेदांताचा कर्ता आहे व वेदांना जाणणाराही आहे.[2]
डॉ. सौ. उषा गुणे.



[1]   मत्तः परतरं नान्यत् किञ्चिदस्ति धनञ्जय । मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ॥ (गीता ७.१५)
[2] 'वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो । वेदांतकृत् वेदविदेव चाहम् ॥ (गीता १५.१५ )

No comments: