07 November, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ८६

श्लोक ८६
सुवर्णबिन्दुरक्षोभ्यः सर्ववागीश्वरेश्वरः 
महाह्रदो महागर्तो महाभूतो महानिधिः  ।।
(८००) सुवर्णबिन्दुः :  - ज्याचे अवयव सुवर्णाप्रमाणे अत्यंत तेजस्वी आहेत असा. छादोग्य उपनिषत् म्हणते, 'ज्याचे शरीर अगदी नखापर्यंत तेजस्वी आहे असा.[1] वैदिक वाङ्‌मयात उल्लेखिलेले परमात्म्याचे महान नाम म्हणजे 'कार. त्यामध्ये अ, उ व बिन्दुयुक्त म अशी अक्षरे समाविष्ट झालेली आहेत.
 (८०१) अक्षोभ्यः :  - कधीही क्षुब्ध न होणारा. सामान्यतः मनुष्याचे आंतरिक समाधान स्वतःच्याच प्रबळ इच्छा, राग, वासना इत्यादि विकारांनी विचलीत होते. तर बाह्यात्कारी सामान्य माणूस आजूबाजूच्या परिसरातील मनोहारी सुंदर वस्तूंच्या प्रलोभनाने क्षुब्ध होतो. परंतु आत्मस्थिती ही अशी एक अवस्था आहे की ज्यामध्ये मनाला क्षुब्ध करणारे कुठलेही आंतरिक विक्षेप उपस्थितच नसतात. किंवा इंद्रियांच्या विषय मोहाने निर्मित झालेली बंधनात्मक स्थितीही त्या परमात्म्याच्या पूर्णतेला व शांती वैभवाला धक्का लावूं शकत नाही. या स्थितप्रज्ञ स्थितीचे वर्णन करतांना भगवंत गीतेमध्ये सांगतात की तो 'समुद्राप्रमाणे अक्षोभ्य [2]आहे. ज्याप्रमाणे सर्व दिशांनी येणारे पाणी समुद्रामध्ये सतत प्रवेश करीत असते तरीही तो समुद्र अचल रहातो, त्याप्रमाणे शांत स्थितीला प्राप्त झालेला मनुष्य कितीही कामना त्याच्यात प्रविष्ठ झाल्यातरी क्षुब्ध होत नाही, परंतु कामना करणारा मात्र शांत राहू शकत नाही.
(८०) सर्ववागीश्वरेश्वरः :  - 'वाग्देवतेचा स्वामी'. [3]केनोपनिषदांत हे खूपच स्पष्ट केलेले आहे की कुठलेही क्रिया करणारे किवा संवेदना ग्रहण करणारे इंद्रिय स्वसामर्थ्याने त्याचे कार्य करू शकत नाही. कारण इंद्रियेसाधन स्वरूपतः जड असतात. त्यांना प्रत्यक्ष कार्यकारी चेतना आंतरीक चैतन्याने दिलेली असते. सर्व  ज्ञानेंद्रिये, मन बुद्धिची एकएक चैतन्यदायी देवता असते. परंतु या सर्व सूक्ष्म देवतांना त्यांची कार्यकारी शक्ती केवळ आत्म्यापासून म्हणजेच अंतस्थ नारायणापासूनच मिळते. अर्थातच सर्व प्राणीमात्रांच्यामध्ये असलेल्या आत्म्याचाही तो आत्मा आहे, स्वामी आहे अशी ज्याची प्रार्थना केली जाते ती यर्थार्थच आहे. अनेकवेळा 'वागीश्वर' ही संज्ञा कवी, लेखक अगर उत्कृष्ठ वक्तृत्व असलेल्या व्यक्तींचे वर्णन करण्याकरतां वापरली जाते. म्हणून वरील संज्ञेचा अर्थ असा होईल की ज्याच्यापासून सर्व वक्ते (वागीश्वर) आपली शक्ति मिळवतात तो त्यांचा स्वामी - सर्ववागीश्वरेश्वर. तसेच काही टीकाकार दार्शनिकदृष्ट्या आणखी एक अर्थ शोधून काढतात,  तो म्हणजे वागीश्वर - ब्रह्मदेवाचाही स्वामी श्रीनारायण.
(८०) महाह्रदः :  - अत्यंत आनंद देणारा महासरोवरा सारखा. कडक उन्हाळयाचे दिवसांत एखाद्या स्वच्छ शीतल, उत्साह व प्रसन्नता वाढविणार्‍या सरोवरांत डुबकी मारल्यावर जसे पोहोणार्‍या माणसाला ते जल सर्वांगाने वेढते व आनंदित करते. त्याचप्रमाणे नारायणाचे ध्यान करणार्‍या साधकास त्या नारायणस्थितीमधील शांती, प्रसन्नता पुनःपुन्हा उत्साहित व शुद्ध करते. भक्तीच्या फळीवर उभे राहून योगीजन सरळ त्या ध्यान स्थितीत बुडी मारतात. व अत्यंत प्रसन्न, शुद्ध व शांत होऊन बाहेर पडतात. म्हणूनच रूपकानें श्रीनारायणास महाहृद (मोठे सरोवर) म्हटले आहे.
(८०) महागर्तः :  - मोठी पोकळी असलेला. येथे मोठी पोकळी अगर गर्ता म्हणजे भगवंताची माया.  भगवंत स्वतःच गीतेमध्ये सांगतात, 'माझी माया (अज्ञान व विपरीतज्ञान) अत्यंत दुस्तर अशी आहे.[4] कांही निरूक्तार्थ काढणार्‍या विद्वानांनी 'गर्त' या शद्बाचा 'रथ' असाही अर्थ सांगितला आहे. व त्याप्रमाणे या संज्ञेचा अर्थ होईल ज्याचा रथ महान आहे असा महारथ श्रीविष्णु.
(८०) महाभूतः :  - महान् अस्तित्व. त्याच्याच पासून सर्व पंचमहाभूतांची उत्पत्ती होते व ती व्यक्त दशेला येतात म्हणून त्या सर्वव्यापी अनंत स्वरूपास श्री नारायणास महाभूत म्हटले आहे. तो आधारभूत असल्यानें जन्ममरणाची संपूर्ण क्रिडा त्याच्यामध्येच चालते. त्याच्याच समर्थ आधाराने संघात (एकत्र येणे) व विघात (एकमेकापासून विलग होणे) या क्रिडा घडून येतात. म्हणूनच भक्तगण त्या परमेश्वरास 'महाभूत' म्हणतात, ते अगदी यथार्थच आहे.
(८०) महानिधिः :  - महान आश्रय. ज्या मूल उगमस्थानापासून सर्वांची उत्पत्ती होते व ज्या समर्थ आश्रयाने क्षणभंगूर विषयांच्या सर्व क्रीडेला सतत चालना देऊन व ती क्रीडा जीवंत ठेवली आहे, त्याला 'महानिधी' म्हटले आहे. तसेच निधी म्हणजे संपत्ती. जो भक्तगणांची सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे असा. तो 'महानिधी'. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना अगदी लुटता येतो.
डॉ. सौ. उषा गुणे.



[1]   आप्रणखात् सर्व एव सुवर्णः । (छांदोग्य उप. १.६.६.)
[2]   आपूर्यमाणमचलं प्रतिष्ठं - समुद्रमापः प्रविशंतियद्वत् 
    तद्वत कामा यं प्रविशंती सर्वे शान्तिमाप्नोति न कामकामी  ।। गीता २-७०
[3]   येन वाचा अनभ्युदितं येन वागभ्युदते (केन. १.४)
[4]   मम माया दुरत्यया । (गीता ७.१४)

No comments: