04 November, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ८५

श्लोक ८५
उद्भवः सुंदरः सुन्दो रत्‍ननाभः सुलोचनः 
अर्को वाजसनः श्रृङ्गी जयन्तः सर्वविज्जयी  ।।
(७९) उद्‍भवः :  - मूलस्थान. उगमस्थान. सर्व सृजन ज्याचेपासून होते तो. पुराणांच्या मतानुसार, जो स्वइच्छा मात्रेकरून जगत् कल्याणाकरतां स्वतःसच स्वतःमधून प्रकट करतो तो अर्थातच सर्वाचा उद्भव आहे. किवा जो स्वतःस अध्यक्ष स्थानी ठेवून जीवनाच्या (प्रकृतीच्या) सर्व प्रक्रिया व त्यांचे प्रकटन साक्षीभावानें पहात असतो. तो आत्मस्वरूप नारायणच 'उद्‍भव' आहे.[1]
(७९) सुन्दरः :  - कुणीही स्पर्धा करूं शकणार नाही असे अप्रतिम सौंदर्य असलेला. सर्व धर्मामध्ये परमात्म्याचे वर्णन अत्यंत मनोहरी सौंदर्य असलेला असे केले आहे. जेव्हा आपण या जगतातील विषयांचे सौंदर्य अनुभवतो तेंव्हा त्या वस्तूची प्रमाणबद्धता किवा त्याचे साम्य संगती किवा त्यातील अत्यंत नाजूकपणा आपल्या मनाला मोहित करतो. एक क्षणभर कां होईना पहाणार्‍याच्या मनावर त्या प्रमाणबद्धतेतील सुंदर लय त्या सुसंगती मधील शांतभाव, किवा त्या दिव्य आनंदाचे तरंग, तन्मयतेचा परिणाम करतात. या सर्व घटनांमध्ये सौंदर्य ग्रहण करीत असतांना, पहाणार्‍याचे अत्यंत संवेदनाशील मन एकदम शांत होऊन जाते. आणि मनाच्या अशा अत्यंत तृप्त अवस्थेमध्येच सौंदर्याचा अनुभव हृदयांत तुडूंब भरून रहातो. लक्षांत असू द्या की हे सौंदर्य केवळ वस्तूमध्येही नाही किवा मनामध्येही नाही. मन हरण करणारा प्रसंग त्याचे मन शांत करतोपहाणार्‍याच्या मनांत सौंदर्याची संवेदना निर्माण करतो. ही शांती म्हणजे दुसरे कांही नसून मनाच्याही मागे असलेल्या श्रीनारायणाची अभिव्यक्ती असते, त्याचे प्रकटन असते. म्हणूनच त्या अनंत परमात्म्याचे दिव्यत्व वर्णन करतांना उपनिषदे म्हणतात, 'तो शान्त - शिव - सुंदर' आहे. (शान्तं शिवं सुंदरम्)
(७९) सुन्दः :  - अपार दया असलेला. आपल्या मनांत आपल्या स्वार्थी (अहंकेद्रित) व बहिर्मुखवृत्तीमुळे साठलेला वासनांचा साठा कितीही मोठा असला तरी एकदा भक्त अनन्य भावाने भगवंतास शरण गेला तर त्याच्या सर्व वासना शुद्ध केल्या जातात व तो भक्त भगवंताचे जास्त जास्त जवळ जा लागतो. जणू कांही माणसांनें अविद्येच्या आहारी जावून केलेली अनंत पापे तो परमात्मा आपल्या अपार दयेनें धुवून टाकतो.
(७९) रत्‍ननाभः :  - ज्याची नाभी अत्यंत सुंदर आहे असा. भक्ति संप्रदायाचे ग्रंथ भक्तांना भगवंताच्या नाभीवर ध्यान केंद्रित करण्याचा आदेश देतात. भगवंताचे नाभी केंद्र अत्यंत भरीव, सुंदर व तेजस्वी रत्‍न आहे’ असे ध्यान अपेक्षित आहे, व त्या ध्यान केंद्रास विशेष महत्व आहे. मनुष्याच्या शारीरिक क्रियांसंबधीचे प्र्माण व चिकित्सा भारतातील गूढवाद्यांनी फार पूर्वीच केलेली आहे. आजचे मानस शास्रज्ञही कबूल करतात की मनुष्याच्या 'क्रिया' या त्यांच्या विचाराचेच प्रकटन असते, या उघड सत्यापलीकडे त्यांनाही खोल ज्ञान उपलब्ध नाही. परंतु सूक्ष्म ध्यानमार्गी शोधक आणखी सखोल जाण्याचा प्रयत्‍न करतात व क्रियांच्या गतीचा संपूर्ण आलेख काढायचा प्रयत्‍न करतात. त्यांच्या या धाडसी प्रयत्नांमध्ये त्यांना असे समजून येते की प्रकट स्वरूपाला येण्यापूर्वी क्रियेसंबंधी सर्व विचार बीज रूपाने परेमध्ये स्थित असतात. त्या गर्भातून ते हळूहळू व्यक्त दशेला येवू लागतात. तेंव्हा मनुष्याला आपल्या विचारांचे अंधुकसे अस्तित्व जाणवू लागते. परंतु अजूनही ते अस्पष्ट अपूर्णावस्थेत असतात. या अवस्थेला 'पश्यंती' असे म्हणतात. ते विचार पूर्णपणे मनात प्रकट होतात तेंव्हा त्या अवस्थेला 'मध्यमा' असे म्हटले जाते. व शेवटच्या अवस्थेत जेव्हा ते वाणी अगर क्रियेने व्यक्त केले जातात व जगाला स्पष्ट होतात तेंव्हा त्याला 'वैखरी' म्हटले जाते. ज्यावेळी चिंतन करणार्‍या व्यक्तिला आपल्या विचार प्रक्रियेची ही साखळी प्रथम जाणवते ती पश्यंती अवस्था नाभी स्थित आहे.[2] विचारांच्या त्या विशुद्ध अवस्थेला आधारभूत असलेले ते तेजस्वी स्थान म्हणजेच 'रत्‍ननाभ'. येथे सूचित केले आहे. साधारण तार्किक बुद्धिचा विद्यार्थी ही कवी कल्पना आहे असा निष्कर्ष काढून मोकळा होतो परंतु या संज्ञेमध्ये खूपच गूढार्थ भरलेला आहे हे खरे.
(७९) सुलोचनः :  - अत्यंत रमणीय मनोहर नेत्र असलेला. जे भक्त भगवंताचे सगुण ध्यान करतात त्यांना हे नेत्रांचे सौंदर्यस्थान सुचविले आहे व ते त्याचा आनंद मिळवतातच. परंतु जे भक्त सगुणापेक्षाही सूक्ष्म ध्यान करतात त्यांन भगवंताचे डोळे केवळ त्याचा विशाल आकार, सुंदर रंग किवा त्यातील भावमधुरता याकरतांच प्रिय वाटत नाहीत तर ते नेत्र या सृजनाचे अगाध कार्य त्याच्या हेतुसहित पांहू शकतात म्हणून महत्वाचे वाटतात. [3] म्हणून  ही संज्ञा असे सुचविते की ज्याला आत्मज्ञानाची दृष्टी आहे तो सुलोचन.
(७९) अर्कः :  - ज्याने सूर्यस्वरूप धारण केले आहे असा. वैदिक देवता म्हणून सूर्यदेवाची पूजा करतात. ब्रह्मदेवही त्याची पूजा करतो म्हणूनच त्याला 'वरेण्य' सर्वात पूजनीय असे म्हटले जाते. विश्वातील सर्व वस्तूंना प्रकाश व ऊर्जा देणारा, प्रकाशित करणारा, पोषण करणारा सूर्य हा सूर्यमंडलाचा मध्यवर्ती आहे. त्याच्या प्रमाणे सर्वांतर्यामी असलेला ह्या अनंत चैतन्य श्रीनारायणाचे दिव्य तेज सर्व प्राणीमात्रांस, सर्ववेळी, सर्वज्ञान अगर अनुभव प्रत्ययास आणून देते. जीवनदायी स्वरूपाने व अध्यक्ष स्वरूपाने तोच शरीराचे भरण पोषण करतो. तो एकदा त्यातून निघून गेला तर शरीर टिकूं शकत नाही. वैद्यकिय शास्त्राचे तसे प्रयत्न चालू आहेत परंतु ते व्यर्थ होताना दिसतात.
(७९) वाजसनः :  - अन्नदाता. सृष्टीमधील सर्व प्राणीमात्रांस जीवनतत्व पुरविणारा - ज्या तत्वाच्या आधारानेच प्राणीमात्र जीवंत रहातात, वृद्धि पावतात ते तत्व स्वरुपतः श्रीनारायणावाचून दुसरे काही असूच शकत नाही. भगवतगीतेत भगवंत सांगतात की 'ते स्वतःच सूर्यातील प्रकाशरूपाने प्रकट होतात त्याचा प्रकाश पृथ्वीतलात प्रवेश करतो त्यामुळे पृथ्वीची सृजनशक्ती सुफलीत होते आणि वनस्पती निर्माण होतात. त्यांचेमध्ये चंद्रकिरणांच्या माध्यमातून भगवंतच अन्नांश व सत्वांश निर्माण करतात. तसेच उपनिषदांत आपल्याला अशा तर्‍हेचा अर्थपूर्ण उल्लेख मिळतो की, 'अग्निपूजेत अग्निला अर्पण केलेल्या आहुतीं प्रसाद होऊन मेघवर्षारूपाने खाली येतात व सृष्टिला समृद्धिचे वरदान देतात.
     तसेच जीवनाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक प्राणीमात्रास त्याच्या स्वरूपास आवश्यक अशी सर्व ज्ञान साधनांची उपलब्धी त्याला करून दिली जाते व त्यामुळेच तो जगताचे अनुभव घेवू शकतो. प्रत्येक प्राणीमात्राच्या प्रकृतीप्रमाणे त्याला आपली वासनापूर्ती करता यावी याकरतां योग्य परिस्थिती उपलब्ध करून दिली जाते. अशा या व्यापक अर्थाने संपूर्ण जगत् हे प्राणीमात्राच्या शरीर मन बुद्धि करता वस्तू भावना विचार रूपाने अन्नच होऊन राहिले आहे.
(७९) श्रृङ्गी :  - ज्याला  शृङ्ग आहे असा. साधारणतः भगवंताच्या मत्स्यावताराची आठवण करून देणारी ही संज्ञा आहे असे समजले जाते. परंतु वराह अवतारामध्येही भगवंतांनी रसातळामध्ये बुडणार्‍या पृथ्वीला आपल्या श्रृङ्गावर तोलून धरून कोरड्या पृष्ठभागावर आणले अशी कथा आहे. त्यामुळे ही कथा वराह अवताराची आठवण करून देते असे म्हणणे जास्त योग्य होईल.
(७९) जयन्तः :  - सर्व शत्रूंना जिंकणारा. तो परमात्मा सर्व शक्तिमान्, सर्व शक्तिंचे व सामर्थ्याचे उगमस्थान असल्यानें त्याला कुठलीही शक्ति कधीच जिंकू शकणार नाही. त्याच्याच कृपेने व प्रत्यक्ष सहाय्यानें अतिदुष्ट असूरांशी झालेल्या सर्व युद्धांत देवांना प्रत्येकवेळी विजय मिळालेला आहे, म्हणून तोच श्रीनारायण नेहमी विजयी ठरलेला आहे. मनुष्याच्या व्यक्तीमत्वात ज्यांची मन बुद्धि त्या आत्म्याशी एकरूप होतात त्यांनाच त्याचा कृपाप्रसाद मिळतो त्यांनाच इंद्रियांची अमर्याद वैषयिक हांव, क्षुद्र वासना व दुष्टप्रवृत्तीमध्ये आनंद मानण्याची विकृत भावना या सर्वावर विजय मिळवता येतो.
(७९) सर्वविज्जयी :  - जो एकाच वेळी सर्वज्ञानी आहे व विजयी आहे असा. ह्या दोन वेगळया संज्ञा नसून ती एकच (सर्ववित् + जयी) आहे. त्यामुळे त्या एकत्र संज्ञेचा सर्व ज्ञानवान माणसांवर विजय मिळवणारा असाही अर्थ होईल. ज्ञानाची पोकळ बडबड करणारे विद्वान तत्त्वचर्चा करण्यात कितीही पारंगत असले तरी, समाधी अवस्थेत गेल्यास, आत्मस्वरूप नारायणासमोर त्यांना पूर्णपणे शांत व्हावेच लागते.
डॉ. सौ. उषा गुणे.



[1]   सर्व योनिषु कौन्तेय मूर्तयः संभवन्ति याः । तासां ब्रह्म महद्‍योनिः अहं बीजप्रदं पिता ( गीता १४.४) – सर्व योनिंमध्ये जे आकार मूर्तिमंत होत असतात त्या सर्वांचे उगमस्थान (योनी) महत्‍ब्रह्म हेच आहे आणि हे कौन्तेया, मी बीजदाता पिता आहे.
[2]   (म्हणूनच भगवान विष्णूच्या नाभीकमलातून उत्पन्न झालेल्या कमळामध्ये सृष्टिकर्ता ब्रह्मदेव बसलेला असतो या रूपकाने विशेष अर्थ सुचविलेला दिसतो)
[3]   चक्षुषः चक्षुः - श्रुति त्याला डोळयांचाही डोळा म्हणतात.(केनोपनिषद् १.२)
गामाविश्यच भूतानि धारम्याभहमोजसा  । पुष्णामिचौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः  ।। गीता १५-१२

No comments: