10 November, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ८७

श्लोक ८७
कुमुदः कुन्दरः कुन्दः पर्जन्यः पावनोऽनिलः 
अमृतांशोऽमृतवपुः सर्वज्ञः सर्वतोमुखः  ।।
(८०) कुमुदः :  - जो धरणीला आनंद देतो असा किवा जो धरणीकडून आनंदित केला जातो असा. या ठिकाणी धरणी म्हणजे विज्ञाननियंत्रित व गतीमान् असे संपूर्ण विश्व. हे विविधतापूर्ण विश्व म्हणजे त्या नारायणाने आपल्या अनंत शक्तींचे केलेले आनंददायक प्रकटनच होय. तीच त्या सर्वशक्तिमान परमात्म्याची परिपूर्ती होय.
(८०) कुन्दरः :  - जो पृथ्वीचे विदारण करतो तो. दुष्ट व अन्यायी हिरण्याक्षाचा नाश करण्याकरतां त्याने वराह अवतारामध्ये पृथ्वीचे विदारण केले म्हणून तो कुंदर. तसेच दुसरा अर्थ होतो जो पृथ्वी (कुं) धारण करतो (दरः) तो. तिसरा अर्थ होतो कुंदाच्या फुलांप्रमाणे निर्मल सुंदर उपहार देतो तो.[1]
(८०) कुन्दः :  - या शब्दाने येथे कुन्दाचे फूल निर्देशित केले आहे व त्या संदर्भाने पाहता जो कुन्दाच्या फुलाप्रमाणे सुबक व आकर्षक आहे असा अर्थ या संज्ञेचा होईल. हरिवंशामध्ये म्हटल्याप्रमाणे भगवान परशुरामानी युद्धकृत्याचे प्रायश्चित म्हणून कश्यप ऋषींना पृथ्वी (कुं) दान दिली (द) म्हणून श्रीनारायण 'कुंद' आहेत. तसेच 'कु' या शद्बाचा अर्थ होतो पृथ्वीपती, क्षत्रिय राजे व ’द’ चा अर्थ दलन. या संज्ञेचा वरील संदर्भाने अर्थ होतो, 'परशुराम अवतार घेऊन ज्याने उन्मत्त व अन्यायी राजांचा नाश केला असा 'कुंद' श्रीनारायण.
(८०) पर्जन्यः :  - जो वर्षाव करणार्‍या मेघाप्रमाणे आहे असा. भगवान् श्रीकृष्णांचा दिव्यवर्ण घनःश्याम असल्याचे सर्वत्र वर्णन आढळते. शेतकरी व सर्व जीवंत प्राणी वर्षाव करणारे नील मेघ पाहून आनंदित होतात कारण ते सर्व समृद्धि व सुखसाधनांचा वर्षाव करणारे असतात. ज्याप्रमाणे तृषार्त भूमीची तहान पर्जन्य शांत करतो त्याप्रमाणे भक्ताचे सर्व ताप नाहीसे करतो तो पर्जन्य श्रीहरि.
(८१) पावनः :  - जो नेहमी पवित्र करतो तो. जेव्हां अहं केंद्रित वासना प्रबळ होऊन मन बुद्धि त्यांच्या नैसर्गिक पाशवी विकृतीसहित इंद्रियविषयांच्याकडे वेगाने धावत सुटतात तेव्हा व्यक्तिमत्वामध्ये अपवित्रता येते. मन त्या वैषयिक वासनांतून बाजूला करून, शांतपणे ध्यानामध्ये स्थिर होण्याकरतां, परमदिव्य स्वरूपांत लीन होण्याकरतां आत्म्यालाच त्या पवित्र वासनांचा निरास करावा लागतो. तीच आंतरिक मलीनता तो दूर करतो म्हणून श्री नारायण 'पावन' आहे.
(८१) अनिलः :  - प्राकृतिक प्राणवायूप्रमाणे श्रीनारायणही सर्वव्यापी व सर्वांचा प्राणदाता आहे म्हणून तोच 'अनिल' आहे. निलः म्हणजे अज्ञानाच्या गहनतेत शिरणे. म्हणजेच अविद्या होय. त्याचेपूर्वी नकारार्थी अ प्रत्यय लावल्याने अनिलः म्हणजे जो अज्ञानांत कधीही 'घसरत' नाही, अर्थात् सदैव ज्ञानवान् आहे तो अ-निल श्रीनारायण सर्वज्ञानी आहे.
(८१) अमृतांशः :  - ’अमृत’ शब्दाचे दोन अर्थ होतात. ते म्हणजे अमृत व अमरता. म्हणून या संज्ञेचा अर्थ ठरेल ज्याची आशा कधीही विफल होत नाही असा. किवा ज्याची सर्वात उच्च वासना अमरत्वाचीच असते म्हणून तो अमृतांश आहे.
(८१) अमृतवपुः :  - ज्याची काया (वपु) अमर्त्य आहे असा. ते परमसत्य कालातीत आहे. ते चैतन्यत्व सर्व प्राणीमात्रांच्या हृदयांत आत्मज्योती रूपानें स्थित आहे. ते केवळ अस्तित्वरूपाने असून त्याचेशी अशाश्वत व मर्त्य अशा स्थूल सूक्ष्म व कारण देहांचा काहीच संबंध नसतो. ते सर्व देहबंधना पलीकडे व कालातीत असल्यानें त्याचेमधे नैसर्गिक मरणभावातील कुठलेही बदल संभवत नाहीत. म्हणूनच आपल्या दिव्य वैभवाने युक्त असा श्रीनारायण 'अमृतवपु' आहे.
(८१) सर्वज्ञः :  - सर्वज्ञानी, जीवाच्या अनुभवास येणार्‍या सर्व घटना आत्मप्रकाशांत येतात तेंव्हाच त्या त्याला समजतात. अंतर्जगतातील अगर बाह्यजगतातील घटना समजण्याकरतां त्या आत्मप्रकाशंत येणे आवश्यक असते. ह्या शुद्ध आत्मस्थितीलाच सर्वज्ञानी श्रीनारायण असे म्हटले आहे. सर्व जीवाचे लौकीक ज्ञानही त्याचेवरच अवलंबून आहे.
(८१) सर्वतोमुखः :  - ज्याला सर्वबाजूला मुखे आहेत असा. ज्याप्रमाणे सूर्याला किवा दिपाला सर्वबाजूनें प्रकाश असतो तसे. गीतेमध्ये वर्णन आहे, ' त्याला सर्व बाजूला मुखे शिरे सर्वबाजूस हातपाय हातपाय आहेत असा.[2] डॉ. सौ. उषा गुणे.



[1]   (हिरण्य = सोने; अक्ष =दृष्टी, हिरण्याक्ष = ज्याची दृष्टी नेहमी लौकीक वैभवच पाहते तो - असा मनुष्य भौतिकवादी असल्याने त्याची दृष्टि केवळ इहवादीच असते. )
   यज्ञाद्‍भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्‍भवः । कर्मब्रह्मोद्‍भवंविद्धी ब्रह्माक्षर समुद्भवम्  ।। - पर्जन्यामुळे अन्नाची निर्मिती होते तर यज्ञापासून पर्जन्य निर्मित होतो. यज्ञ कर्मातून उद्‍भवतो तर कर्म ब्रह्मापासून (ब्रह्मदेव) उद्‍भवते व ब्रह्म अक्षरापासून उद्‍भवते असे जाण.
[2]   सर्वतः पाणिपादं तत्सर्वतोऽक्षि शिरोमुखम् – गीता १३.१३

No comments: