13 November, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ८८

श्लोक ८८
सुलभः सुव्रतः सिद्धः शत्रूजित् शत्रूतापनः 
 न्यग्रोधोदुंबरोऽश्वत्थश्चाणुरांध्रनिषूनः ॥
(८१) सुलभः  :  -  जो अत्यंत सहजतेनें प्राप्त होतो असा. ज्याचे जवळ खरी भक्ति आहे त्यांना, ज्यांचे पुरुषार्थ प्रयन परमेश्वराला जड प्रकृतीच्या दुःखदायक अवस्थेपेक्षा वेगळेपणाने पहाण्याच्या कामी लागतात. अशांना तो लवकरच सहजतेने प्राप्त होतो. ध्यानमग्न झालेल्या मनाला 'सत्य' स्वतःमध्येच प्रतीत होते व सर्व [1]साधना मन ध्यानामध्ये स्थिर करण्याकरतांच असतात.
(८१) सुव्रतः :  - ज्याने अत्यंत शुभ (मंगल) आकार धारण केला आहे असा. सर्व अमंगलाचा नाश करणे व सर्व शुभंकर असेल त्याचे रक्षण करणे हाच भगवंताच्या अवतार कार्याचा हेतू असतो. साधक स्वतःही भगवंताच्या व्यक्ततेचा एक अंश असतो. त्यामुळे परमार्थाच्या अभ्यासूला हे शेवटी स्पष्टपणे जाणवते की स्वतःमधील अहंचा नाश करणे व ज्या शुद्ध अवस्थेमधून त्याची आत्ताची व्यक्तावस्था उगम पावली आहे तीचा पुन्हा शोध घेणे म्हणजेच 'स्व' रूपाचा शोध घेणे होय, हेच सुव्रत.
(८१) सिद्धः :  पूर्णता. त्याने ही पूर्णावस्था प्राप्त केली आहे असे नाही तर तो नित्य सिद्धच आहे. श्रीनारायणाची ती पूर्णावस्था त्याच्या अवतार कार्यामधील लीलेमध्येही कधीच ढळत नाही, त्याला आपल्या अनंत अखंड अविकारी पूर्णावस्थेचा कधीच विसर पडत नाही.
(८२०) शत्रुजित् :  - जो आपल्या शत्रूच्या झुंडीवरही सतत विजय मिळवतो असा. मनुष्याच्या अंतःकरणातील त्याचे शत्रू म्हणजे दुसरे कोणी नसून त्याचीच देहबुद्धि व परिणामतः तिच्यामधून उत्पन्न होणार्‍या आतंरिक व बाह्यजगतातील वासना. या सर्व वासनांचे एक आक्रमक सैन्यच असून त्यांच्या एकत्रित हल्ल्यापुढे आपण अगदी असहाय्य आहोत असेच जणूं साधकांस वाटत असते. परंतु अत्यंत सावध असा साधक जेव्हा आपल्या अंतरंगामध्ये वास करणर्‍या सत्यस्वरूप परमात्म्याकडे धाव घेतो तेंव्हा सर्व संकटे तात्काळ नाहीशी होतात. म्हणूनच या ठिकाणी सर्व शत्रूंना जिंकणार्‍या श्रीनारायणास 'शत्रूजित्' या संज्ञेने आवाहन केले आहे.
(८२) शत्रुतापनः :  - शत्रुंना ताप देणारा. जेव्हा एकादा भक्त स्वतःस भगवंताच्या पायाशी समर्पित करतो तेंव्हा त्याच्यामधील सर्व अपप्रवृत्ती - ज्यांच्यामुळे भक्ताचे अंतःकरण अशुद्ध झालेले असते – त्या सर्व भगवंत जाळून टाकतो.
(८२) न्यग्रोधः :  - जो सर्व प्राणीमात्रांचे नियमन करतो, पण त्याचवेळी स्वतःस मायेच्या आवरणानें झाकून ठेवतो असा. आपणामधील चैतन्य सतत कार्य करीत असते परंतु आपल्यामधील वासनां (अविद्या) मुळे आपले लक्ष सतत बाहेर विषयानुभवाकडे खेचले जाते. व अंतस्थ दिव्य परमात्म्याकडे दुर्लक्ष होते.  जगताचे प्रत्यक्ष जीवनच असलेल्या आत्मस्वरूप नारायणामुळेच ही सर्व सृष्टी व्यक्त झाली आहे, तरीही त्याच्या लीलेमुळे आपण त्याला पाहूं शकत नाही. याच संज्ञेचा दुसर्‍या दृष्टिकोनातून अर्थ होतो 'जो सर्वांचे वर आहे असा.' एकाद्या सुनियोजित कार्यावर नियंत्रण करणार्‍या सामर्थ्यशाली उदार व्यक्तिचे आकलन मनुष्याच्या बुद्धिला होते तेंव्हा तिचे वर्णन 'उच्चस्तरी, सर्वांचे वर' असेच केले जाते व त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या संज्ञेचा मतितार्थ स्पष्ट होतो.
(८२) उदुम्बरः :  - सर्व प्राणीमात्रांचा पोषणकर्ता. तो प्रत्येक प्राणीमात्रास त्याचे आवश्यकतेप्रमाणे अन्न देऊन त्याचे पोषण करतो. तसेच दुसरा अर्थ होतो जो पंचमहाभूतांपैकी सूक्ष्मतम अशा आकाशाच्या (अंबराच्या)ही पलीकडे आहे असा. श्रीनारायण हा सर्व सृष्टिचे उगमस्थान असल्यानें त्याचेपासून सर्व प्राणीमात्रांची उत्पत्ती झाली आहे. अर्थात तोच महाकारण असल्यानें त्याचेपासूनच अत्यंत सूक्ष्मतर असे आकाश (अंबर) तत्वही उत्पन्न झाले. कारण हे कार्यापेक्षा सूक्ष्म असते त्यामुळे परमतत्व असलेला श्रीनारायण अंतरिक्ष संकल्पनेच्याही पलीकडे आहे.
(८२) अश्वत्थः :  - कठोपनिषत् व गीतेच्या १५व्या अध्यायांत भगवंताचे वर्णन ’जीवनवृक्ष’ म्हणजेच  'अश्वत्थ वृक्ष' या नामाभिधानाने केलेले आहे. इतर अप्लजीवी प्राणीमात्र व वनस्पतींपेक्षा बारमाही बहरणार्‍या वृक्ष सापेक्षतः अमरच आहे असे मानले जाते. त्यामुळेच क्षणभंगूर आयुष्य असलेल्या माणसांच्या अनेक पिढ्या, लाटामागून लाटा याव्या त्याप्रमाणे या वृक्षाच्या सावलीमध्ये क्रीडा करण्यास येतात, त्याच्याच पायाशी बसून प्रेमाचा वर्षाव करतात. त्याच्याच सुखद लहरींमध्ये जीर्णशीर्णही होतात. व मृतप्राय झाल्यावर त्याच्याच खालून त्यांची मरण यात्रा स्मशानभूमीकडे जाते. रात्रीच्या चंद्रप्रकाशांत, वार्‍याच्या झुळकेबरोबर नाचणार्‍या पानांमुळे छायाप्रकाशाचे भयकारी नृत्य प्रत्येक चैतन्यहीन चेहर्‍यावर विलसत असते. दूर निघून गेलेल्या व्यक्तिंची मुलेही आपली वेळ येताच त्याच अंतहीन जीवन मरणाच्या खेळाची आवृत्ती करतात व त्याच जुन्या वृक्षाखालून पुढे जातात. हर्ष विषादांच्या या येणार्‍या जाणार्‍या लाटांकडे पाहून त्या वृक्षाच्या डोलणार्‍या शाखा तुच्छतेनें हसत रहातात. हा वृक्ष जणू अनंतामध्ये चालणार्‍या असंख्य क्षणभंगुर क्रीडांचेच प्रतिनिधिक स्वरूप आहे असे वाटत रहाते. त्यालाच अश्वत्थ[2] असे म्हटले आहे. व त्या संज्ञेचा अर्थ होतो जे उद्या त्याच स्वरूपांत रहाणार नाही असे. अश्वत्थ सर्व वृक्षाणाम् (गीता १०-२६)
(८२) चाणूरान्ध्रनिषूदनः :  - मल्लविद्येत पारंगत असणार्‍या चाणूराचा नाश करणारा. आन्ध्र म्हणजे मल्ल.
डॉ. सौ. उषा गुणे.



[1]   अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः  ।। भ.गी. ८.१४  -  अर्थ -  जो माझे अनन्य चित्ताने रोज स्मरण करतो, अन्य कशाचेही स्मरण करत नाही अशा नित्ययुक्त योग्यास मी सुलभतेने प्राप्त होतो.
[2]   श्वः = उद्या, श्वत्थ = उद्याही राहणारा, अश्वत्थ – जो उद्या त्याच स्वरूपात राहणार नाही असा. क्षणभंगूर –

No comments: