08 January, 2008

गुणातीत

गुणातीत


गुणातीत होता आलं, की, मग अधिकाधिकच आत्मसंमुखता लाभते आणि मग अशा आत्मनिर्भर अवस्थेत गुणांची [म्हणजे त्रिगुणांची] काळजी करण्याचे कारणच राहात नाही. सापाने एकदा कात टाकली की मग ती कात सतत सांभाळून ठेवण्याची त्याला कांहीच आवश्यकता नसते. अगदी त्याचप्रमाणे गुणांना ओलांडून पलिकडे गेलेला गुणातीत गुणांची पर्वा करीत नाही.
सांडूनि आंगिची खोळी । सर्पु रिगालेया पताळी ।
ते त्वचा कोण सांभाळी ? । तैसे जाले ॥
तसेच हे सत्त्व, रज, तम हे प्रकृतीचे तीनही गुण आपापल्या सामर्थ्याद्वारा देहाची सोंगे नाचवीत असतात. सूत्रधार आत्माराम मात्र गुणांच्या पडद्यामागे अदृश्यच असतो. गुणातीताचे सारेच्या सारे अवधान - अनुसंधान आत्मवस्तूकडेच असते. गुणप्रभावामुळे जीवाचे जे नर्तन होत असते तिकडे मात्र त्याचे लक्ष किंचितमात्रही नसते. कां ? तर त्याचा अहं लोपलेला असतो. " तिन्ही गुण आपुलिया प्रौढी । देह नाचविती बागडी । तो न पाहे धडी । अहंते ते ॥ "

असा हा शरीरधारी असूनही निरहंकारी असतो. देह असूनही त्याला देहबुद्धी नसते. कारण गुणांपासून तो सर्वथैव अलिप्तच राहतो. ज्ञानराजांनी योगी पुरुषाचे वर्णन करतांना आलेला घटाकाशाचा दाखला, गुणातीताच्या वर्णातही येतो बघ. घट फुटला की मग घटात प्रतिबिंबित झालेले घटाकाश हे महदाकाशात सामावते. त्याचप्रमाणे देहभिमानाचा लोप झाला की निखळ एक आत्मस्वरूपच राहते. देहधारी असूनही मग केवळ आत्मबोधानेच देहात राहणे होते. आत्मबोध कायम जागता असतो, आणि म्हणूनच त्याला भगवान श्रीकृष्ण गुणातीत म्हणतात.
गुणातीताचे गुणगान श्रीज्ञानराजांनी असे भरभरून केले आहे पहा. अर्जुनाने गुणातीताची लक्षणे विचारतांच श्रीज्ञानोबारायांचा श्रीकृष्ण अधिकच उल्हास पावतो आणि - "परिस आता तेथासि । रूप करू ॥ " असे म्हणतो. "रूप करणे" हा माऊलीचा अतिशय आवडता शब्दप्रयोग आहे. खरेच, काय सामर्थ्य आहे त्यांच्या शब्दकळेचे !!!
रजोगुणामुळे माणूस कार्यप्रवृत्त होतो. कार्य करतां करतां कर्तेपणाच्या अहंकारामुळे तो वेढला जातो. उन्मत्त होतो. सत्त्वगुणाने सर्वेंद्रियांवर ज्ञानाचे तेज फाकते. विद्येच्या अभिमानाने मनुष्य खुंट्यासारखा ताठतो. तमोगुणाच्या प्रभावाने माणूस मोहवश होतो. अज्ञानाच्या गर्तेत फसत जातो. गुणातीत मात्र या तीनही गुणांच्या कर्तृत्वाकडे तटस्थपणे पाहतो. एका आत्मतत्त्वाच्या सत्तेनेच या तीन गुणांचा वावर सर्वत्र होत असलेल्याचे तो जाणतो. सूर्य जसा अलिप्तपणे समस्त लोकव्यवहार पाहतो, तसा हा गुणातीत गुणांचा खेळ बघत असतो.
सागराला चंद्रामुळे भरती येते. चंद्रामुळे सोमकांत मणी पाझरतो. याच चंद्र प्रकाशाने कमळे उमलतात. पण चंद्र मात्र आपल्याच जागी निवांत आणि अलिप्त असतो. गुणातीताच्या संदर्भातही सत्व-रज-तम आपापला स्वभाव प्रकट करत असतातच पण गुणातीत मात्र या सगळ्यापासून अत्यंत अलिप्तच असतो. सूर्याच्या घरी जसा अंधार नसतो किंवा दिवाही नसतो तसाच हा गुणातीत. रात्रीला कधी प्रकाश दिसतो का ? सूर्याला कधी अंधार कळतो का ? अंधारच काय तर त्याला प्रकाश पण कळत नाही, इतका स्वयंप्रकाश ! आहे की नाही गंमत !
गुणातीत एका अर्थाने दगडासारखा (?) निश्चल असतो, पण तो चेतनाशून्य, संवेदनाशून्य नसतो, तर अत्यंत तरल असतो. गुणातीत अवस्थेतही तो ज्ञानी भक्तांप्रमाणे भगवंताची अव्यभिचारी भक्ति अखंडत्त्वाने करीतच असतो. ही फार महत्त्वाची बाब आहे.
हा परमतत्त्वाची निश्चल ऐकांतिक भक्ति करतो. विश्वासह विश्वात्म्याचे त्याचे भान (म्हणजे अनुभव) अचल असते. असा हा गुणातीत ज्ञानोत्तर भक्ति करणार्‍या भक्ताप्रमाणेच परमतत्त्वाच्या ठायी तो भक्ति-प्रेम सुखाचा भुकेला असतो. त्याला भगवंताची व भगवंताला अशा भक्ताची भूक असते. हेच भक्ति-प्रेम सुखाचे ऐश्वर्य !
--- अण्णा.

No comments: