20 January, 2008

स्थितप्रज्ञ

स्थितप्रज्ञ


"निर्वातीचा दीपू । सर्वथा नेणें कंपू ॥" निर्वात स्थळी तेवत असलेला दीप जसा निश्चल असतो, तसा स्थितप्रज्ञ निश्चल असतो. भगवान श्रीकृष्णांनी गीतेत दुसर्‍या अध्यायाच्या अखेरीस स्थितप्रज्ञाचे वर्णन केले आहे, ते अर्जुनाची दोलायमान मनःस्थिति सावरण्याकरिता. गीतेपेक्षा माऊलींनी 'स्थितप्रज्ञ' अधिक स्पष्ट केला आहे.

अटीतटीच्या संघर्षप्रसंगी माणसाचे मन कसे असावे याचा हा एक उत्कृष्ट आदर्श आहे. सामान्य माणूस असल्या प्रसंगी असाच गोंधळतो, बावरतो, किंकर्तव्यमूढ होतो. अर्जुनासारखा मोहाने अगदी वेढला जातो. भावविवश होतो. अंती "स्वधर्माचा" विसर पडतो, बुद्धिभ्रंश होतो, आणि या सर्वातून आत्मनाशाची वाट चालू लागतो. कधी ? ते त्याचे त्यालाच उमजत नाही.

सर्व प्राणीमात्रात मनुष्य हा अत्यंत बुद्धिमान प्राणी आहे. पण जनावरापेक्षांही तो बहिर्मुख होतो. सुखाने हुरळून जातो, आनंदाने उड्या मारतो. कधी तो चिडतो, संतापतो वा क्रोधाविष्ट होतो नाही कां ? कधी हर्षाने तर कधी विशादाने त्याची बुद्धि सारखी हेलकावे खात असते. सोसाट्याच्या वार्‍यात सांपडलेल्या पाण्यावरील नावेसारखी. आणि या सगळ्याचा परिणाम काय तर 'आत्मारामाची' विस्मृती. रात्र जशी सूर्याला गिळून टाकते तसा अस्थिर माणसाचा स्मृतिभ्रंश आत्मारामाला झांकोळून टाकतो.

याच्या अगदी उलट "स्थितप्रज्ञ". तो अंतर्मुख वृत्तीचा असतो. भौतिक सुखाने तो नाचत नाही, तसाच दुःखप्रसंगी हतबलही होत नाही. तो आत्मानंदाने परिपूर्ण असतो. सूर्याची किरणे जगातील अणूरेणूला स्पर्श करतात, पण जगात लिप्त मात्र होत नाहीत. तसाच हा स्थितप्रज्ञ. सर्वदा 'आत्मरते निर्भिन्नं, संगदोषे न लिंपते".

हा स्थितप्रज्ञ आणि कसा असतो ? तर निरहंकारी असतो. आपला अहंकार तर नेहमी एवढ्या तेवढ्या कारणांवरून फणा काढत असतो, होय की नाही ? अहंकार गेला की काय होते ? तर मग सर्व प्राणिमात्राबद्दल स्थितप्रज्ञ्याला आत्मीयता असते. विश्वात्मक वृत्तीने तो उजळून निघालेला असतो. "विचरे विश्व होऊनि । विश्वामाजी ॥". संयम , अभ्यास, यम-नियम यांमुळे त्याचे मन त्याच्या मुठीत असते.

कोणाबद्दल राग आणि द्वेष त्याच्या ठायी नसल्याने 'आत्मप्रसन्न' असतो. चेहरा जरी उदास दिसला तरी आत्मारामाची प्रसन्नता कायमस्वरूपीच असते. पाणी कधीतरी पाण्याला बुडवते का ? त्याचप्रमाणे हा परिपूर्ण स्थितप्रज्ञ.

बुद्धी आत्मस्वरूपी स्थिरावली की अंतःकरण, मन कधीही किंचितदेखील विचलीत होत नाही. बुद्धी आत्मारामाच्या ठायी कायमस्वरूपी स्थिर होण्यास सोन्यासारखा उपाय म्हणजे नाम. जातां जातां तुला नामाचा गूढार्थ सांगतो. "राम-कृष्ण-हरि" एवढेच नाम नाही तर "अखंड आत्मारामचे भान" म्हणजे नाम आणि नाम तेच रूप, अत्मरूपाचे दर्शन. म्हणून "नाम तेचि रूप । रूप तेचि नाम ॥" अशी नाम-रूपाच्या एकरसतेची अनुभूती.

सर्व नद्या जरी सागराला मिळाल्या तरी समुद्राची पातळी वाढत नाही का त्याला कधी महापूर येत नाही. किंवा याच्या उलट उन्हाळ्यात नद्या आटल्या आणि त्यांचे पाणी सागराला मिळेनासे झाले तरी त्याची पातळी कमी होत नाही. कधी तो आटतही नाही. ह्या सागरा सारखा स्थितप्रज्ञ अक्षुब्ध असतो.

स्थितप्रज्ञाच्या पुढ्यात साक्षात रंभा उर्वशी अगर ऋद्धि सिद्धि जरी उभ्या ठाकल्या, अगदी कर जोडून ! तरी त्याच्या मनाची जराही चलबिचल होत नाही. एका आत्मबोधानेच तो इतका संपन्न झालेला असतो की त्यापुढे इतर कोणतेही ऐश्वर्य फिके पडते. ज्ञानोबाराय म्हणतात 'सूर्याच्या घरी प्रकाशाकरितां कधी वातीचा दिवा लावावा लागतो कां ?' समजा दिवा लावला नाही, तर काय सूर्य अंधारात कोंडला जाऊ शकतो थोडाच ? हे जितके असंभव तितकेच स्थितप्रज्ञ विचलीत होणे असंभव आहे.

हा अंतरीक महासुखाने तृप्त असतो, आत्मबोधाने संतुष्ट असतो, परमानंदाने पुष्ट असतो. असा असूनही केवळ स्वकेंद्रित नसतो तर विश्वात्मक पातळीवर आरूढ झालेला असतो.

अण्णा -

3 comments:

Anonymous said...

आण्णा चि पत्रे पुस्तक रुपात उपलब्ध आहेत का ?

-- उदय

एकोहम् said...

अण्णा म्हणजे अण्णा घाणेकर निरूपणकार आहेत. ते आपल्या एका शिष्याला पत्रातून उपदेश करतात. त्या प्रबोधनाचा इतरांना लाभ व्हावा म्हणून हा एक प्रयत्न. पण अण्णांची वृत्ति अतिशय प्रसिद्धी पराङ्‍मुख असल्यामुळे त्यांच्या ह्या साहित्याचे पुस्तक रुपाने कसे प्रकटन करायचे हा प्रश्नच आहे.
एकोऽहम्‌

Anonymous said...

अण्णा म्हणजे कोण हा प्रश्न अनेकांना पडला असेल.
अण्णा म्हणजे दत्ताण्णा किंवा अण्णा वर्टीकर तर नाहीत? अशी शंका कोणाला आली असेल! आपण हा खुलासा केला ते फार बरे झाले...