22 January, 2008

अमृतरस

अमृतरस


श्रीगुरुंनी आपल्याला आत्मशक्तिसहीत नाममंत्र दिला; आणि अपल्याला मोठ्या प्रेमाने आपल्या करीं धरिले; आपल्या मस्तकावर त्यांनी त्यांचा कृपामृतकोमल तळहात साशिर्वाद धरला. मग याचा परिणाम काया झाला ? नामशब्द हृदयपटलावर उमटू लागले; आणि त्याचबरोबर हृदयाकाशांत नाना ध्वनि उठले.

'हे ध्वनि तरी कसें ?' असं म्हणशील तर कधी पैंजणांच्या घागर्‍यांचा ऋणझुणाट, कधी मोकळी घागर फुंकण्याचा आवाज/घोष, कधीतरी मंदिरांतील असंख्य लहान-मोठ्या घंटांचा घणघणाट, केव्हां बासरीचे मंजूळ सूर, कित्येकदा सुरांत लावलेल्या विणेचा झणत्कार, कधी दुंदुमीची गर्जना, कधीतरी सागराच्या लाटांचा गंभीर शब्द, तर कधी नभांचा गडगडाट, कधीमधी शंखनाद तर मध्येच केव्हांतरी सिंहनाद सुद्धां .

त्यांच्या कृपेने मन स्वस्वरूपी लुब्ध होते. अंगणांत स्वानंदाभिरामाचे वारे भरते, आणि आनंदाची काही बाही अशी जी स्वस्थिती होतें कीं 'वाचेनी बोलतां नये'. बारा- सोळा [अंतःकरणवृत्ति] हातांमध्ये भक्तिप्रेमाच्या ज्योति/ बोध कांकडे घेऊन आपल्या भोंवती गोळा होतात, फेर धरतात. त्यांची ताल- लय- स्वर यांच्याबरोबर एकच दाटणी (गर्दी) होते; त्यांच्या हातीं असणार्‍या आत्मबोधाच्या ज्योतींचा सभोंवार एकच दाट स्वच्छ, लखलखीत प्रकाश पडतो. आपण त्या प्रकाशजलांत सचैल न्हाऊन निघतो व भक्तिप्रेमभावाने निथळतो.

इतका हर्ष होतो कीं बस्स !!! दशमद्वारींचे अमृतपान होते. हृदयआकाशांत लक्ष लावून पाहतां पाहतां तटस्थता प्राप्त होते. एक आगळा वेगळा निवांतपणा लाभतो; त्याचबरोबर परमशांतीच्या साम्राज्यभुवनी सुखासनावर स्वानंदरसाचा पट्टाभिषेक होतो. परमसिद्धी चवर्‍या ढाळतात. महासुखे अबदागिरी धरतात.

श्रीगुरुप्रसादे अंतर्मौन लाभते. नक्षत्रांचा सडा भरदिवसा अनुभवास येतो. कधी अति ज्वलंत अग्निच्या ज्वाळा दिसतात, तर कधी पौर्णिमेचा पूर्ण शुभ्र चंद्रमा डोळ्यांसमोर चकाकत असतो. त्या आत्मचंद्राचा ललित प्रकाश पाहून मन वेडावून जाते. मनाचा राजहंस ह्या चंद्राच्या चांदण्यातील अमृतकणांचा अति मवाळपणे आस्वाद घेतो. हा मानसीचा राजहंस मोठ्या दिमाखाने सारखा डोलत असतो, झुलत असतो.

हा आत्मस्वरूप, आनंद राजहंस उडून जाऊं नये म्हणून, एका भक्तिप्रेमभावाच्या एकांती त्याला आपल्या डोळ्यांत सांठवून ठेवावयाचा. त्याला नाहाळून न्याहाळून, पुनः पुनः पहात रहायचं. मग तो आपल्या डोळ्याच्या बाहुलींतच कायमस्वरूपी स्थानापन्न होतो.

श्रीगुरुंनी दिलेल्या दिव्य "नामाचे" अखंड स्मरणांत हा सगळा स्वानंदानुभव घडोघडीं घ्यावयाचा. ज्याचे त्यानें, आपण आपणांत हे महासुख भोगावयाचे. हा सुखानुभव काय सांगावा ?? "तें सुख काय सांगो । वाचें बोलतां न ये ॥ " श्रीसद्‍गुरुनाथांच्या कृपाशिर्वादाने आनंद बाळ नामसंकीर्तन करतो, सुखात डोलतो. गुरुकृपेनीच या आनंद महासागरीं अवभृथस्नान करण्याचे महद्‍भाग्य लाभते.

आपल्या श्रीगुरुंनी दिलेल्या नाममंत्राचा हा सगळा अनाकलनीय महिमा. त्यांच्याच असीम कृपेमुळे हें सर्व अमृत अनुभव येत असतात; आणि थोर नवलाव वाटतो. हे अनुभवत असतांना कानांत वारे भरलेल्या वासरासारखी गत होते. शब्दांनी जरी व्यक्त केले असले तरी खरे पाहतां तें शब्दांच्या पलिकडचें आहे. श्रीगुरुंच्या कमलाकर स्पर्शांनी मात्र ते आपल्या शुद्ध जाणीवेला भावल्याशिवाय राहात नाही.

या तेजाने तेजाची दाटणी होते, अत्यंत थोर अशा आनंदाची कारंजी सहस्रधारांनी थुईथुई उडत असतात. स्वरूप दर्शनाने, विस्मयकारक प्रकाशदर्शनाने मन तटस्थ होते. चित्ताला या दर्शन सोहळ्याचे वेडच लागते ना !!!

अमृतरस सतत झिरपतो. त्याने सहस्रदलांतील तळें भरते; ओसंडून वाहते. मधुरवाणीने 'भगवत्‌नाम' अनाहत्‌ध्वनि रूपानी उमटते. तेजाचा पाऊस पडतो. भगवंताचे समग्र वैभव प्रकटते. मग सहजच मुखांतून त्या गुणवंताची, त्या भगवंताची स्तुति बाहेर पडते (अण्णाच्या बाबतीत ती कागदावर अक्षर रुपाने अवतरते) या फार सूक्ष्म, तरल गोष्टी आहेत. अनुभवाच्या आहेत. सतत.

-- अण्णा

No comments: