12 January, 2008

नामाचे विस्मरण

नामाचे विस्मरण

श्रीहरीची अखंड प्राप्ती व्हावी असं वाटत असल्यास, त्याचेच अखंड नामस्मरण करावयास पाहिजे. सगळ्या वेद, शास्त्र, पुराणे, संतश्रेष्ठांनी हे नामस्मरणाचे महत्त्व कळवळून सांगितले आहे. श्रीगुरु तर नामाशिवाय काहीच बोलत नाहीत ना ??
भगवंताचे नामस्मरण अखंड होण्यासाठी त्याचा क्षणभरही विसर पडता कामा नये. आणि श्रीहरीचा कधीच विसर पडू नये असं वाटत असेल तर त्याचे आत्मवत अखंड प्रेम लागणे अत्यंत जरूरीचे आहे. कोणत्याही वस्तूचे ज्या मानाने आपल्याला प्रेम असेल त्याच आणि तेव्हढ्याच प्रमाणात त्या वस्तूचे मनात स्मरण होत असते.
आपल्या स्वतःचे आपल्याला निःसीम प्रेम आहे, आणि त्यामुळे आपल्याला आपला विसर कधीच पडत नाही. जेव्हढे काही आपण करतो ते सर्व आपण आपल्यावर असलेल्या आपल्या प्रेमाकरिता करत असतो. आपले आपल्या स्वतःवरचे प्रेम कधीच नाहीसे होत नाही. म्हणून आपल्याला आपला विसर कधीच पडत नाही, तर सतत आठवच राहतो.
पण स्थावर-जंगम आदि वस्तूचे प्रेमात खंड पडतो, कां तर जो पर्यंत ते आपल्या सुखाला कारणीभूत होतात, अनुकूल असतात तोपर्यंत त्यांचे प्रेम राहते. मधुमेह नाही तो पर्यंत साखर/गोड हवीशी वाटते. पण मधुमेहाला साखर गोडच असून सुद्धा नकोशी वाटते. कां तर ती प्रतिकूल असते, दुःखाला कारणीभूत होते. म्हणूनच एकाच वस्तूचे आपल्याला सारखेच अखंड प्रेम राहत नाही. कधी घराचे तर कधी धनाचे, तर कधीतरी अन्य कोणत्या तरी वस्तूचे. ज्या वस्तूचे ज्या वेळी प्रेम असते त्यावेळी त्या एका वस्तू वाचून दुसर्‍या वस्तूचा आपल्याला सहजच विसर पडतो.
या सगळ्याचे तात्पर्य हे की, आपले आपल्यावर अखंड - निर्हेतुक - निरालस - निरामय प्रेम आहे, आणि त्यामुळेच आपल्याहून ज्या वस्तू भिन्न आहेत, त्यावरील प्रेमभाव खंडित होत असतो व आपल्याशी ज्याचे ऐक्य होईल त्या वस्तूचे प्रेम अखंड राहते. याचे साधे प्रत्यंतर आपण आपल्या देहाच्या ठिकाणी सतत पाहतो. "देहच मी" असे देहाशी ऐक्य - तादात्म्य - एकरूपता केल्याने बाह्य देहभिन्न वस्तूंपेक्षा देहाचे प्रेम अखंड असते.
म्हणूनच भगवंताला - श्रीगुरुला आपण आपल्याहून जोपर्यंत भिन्न पाहू, तोपर्यंत भगवंताचे / श्रीगुरुचे ठायी अखंड भक्तीप्रेमभाव जडणे शक्य होत नाही, व त्याचे अखंड नामस्मरणही होणे जमत नाही.
म्हणजेच भगवंताचे अखंड नामस्मरण घडावयास हा श्रीहरी / श्रीगुरु माझ्याहून यत्‍किंचितही भिन्न नाही, तो माझेच स्वरूप आहे किंवा माझे खरे स्वरूप म्हणजे श्रीहरी / श्रीगुरुच होय. मी श्रीहरी / श्रीगुरुहून एव्हढासुद्धा निराळा नाही, असे एकाकारतेचे ज्ञान अनुभवास येणे आवश्यक आहे.
एव्हढेच नाही तर जो पर्यंत श्रीहरी / श्रीगुरुपासून आपण भिन्न-वेगळे आहोत अशी द्वैतबुद्धी जोपर्यंत आहे, तोपर्यंत पूर्वसंस्कारानुसार भगवंताचे प्रेम व स्मरण यात खंड पडत राहणार. श्रीहरी / श्रीगुरुची अद्वैत सत्ता असून त्याचा आपला अभेद संबंध असून त्याचीच सर्वत्र व्याप्ती आहे अशी एकसत्ता अनुभवास आली, की मग त्याचे स्मरण-भक्तिप्रेमभाव, अखंड नामस्मरण सहजच होते - होतच राहते.
अण्णा -


No comments: